कोल्हापूरच्या खेळाचे यांनी केले ब्रँन्डीग

संदीप खांडेकर
Saturday, 18 July 2020

क्रीडा क्षेत्रात कोल्हापूर मागे नाही. खेळ कोणताही असो, त्यात जिगरबाज खेळ करणारे कोल्हापूरचे खेळाडू नक्की आढळतात. कुस्ती, फुटबॉल, नेमबाजी, जलतरण, हॉकी, कबड्डी, क्रिकेटमध्ये इथल्या खेळाडूंनी चमकदार कामगिरीचे दर्शन घडवले आहे. आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्तरावर पदके मिळवून कोल्हापूरचे नाव उंचावले आहे. परिस्थितीशी संघर्ष करत खास कोल्हापुरी ब्रॅंड या खेळाडूंनी निर्माण केलाय. खेळ कोणताही असो, त्यात स्वत:चे टेक्‍निक निर्माण करणे, ही इथल्या खेळाडूंची खासियत आहे. 

क्रीडा क्षेत्रात कोल्हापूर मागे नाही. खेळ कोणताही असो, त्यात जिगरबाज खेळ करणारे कोल्हापूरचे खेळाडू नक्की आढळतात. कुस्ती, फुटबॉल, नेमबाजी, जलतरण, हॉकी, कबड्डी, क्रिकेटमध्ये इथल्या खेळाडूंनी चमकदार कामगिरीचे दर्शन घडवले आहे. आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्तरावर पदके मिळवून कोल्हापूरचे नाव उंचावले आहे. परिस्थितीशी संघर्ष करत खास कोल्हापुरी ब्रॅंड या खेळाडूंनी निर्माण केलाय. खेळ कोणताही असो, त्यात स्वत:चे टेक्‍निक निर्माण करणे, ही इथल्या खेळाडूंची खासियत आहे. 

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन दिले. कुस्तीला त्या काळात राजाश्रयच होता. उत्तरेतील पैलवान महाराष्ट्रातल्या किंबहुना कोल्हापुरातल्या मल्लांशी लढत होते. ईर्षा, जिद्द व चिकाटी पैलवानांत निर्माण होण्याचा तो काळ होता. कोल्हापूर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात कुस्तीला सोन्याचे दिवस होते. आजही कुस्ती कोल्हापुरातल्या तालमीत शिकवली जाते. ग्रामीण भागातल्या पैलवानांना तंत्रशुद्ध मार्गदर्शन करणारे आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्तरावरचे प्रशिक्षक येथे उपलब्ध आहेत. कुस्ती केवळ मातीतील नव्हे, तर मॅटवरची देखील येथे शिकवली जाते. महाराष्ट्र केसरी, हिंदकेसरी किताब पटकावणारे पैलवान येथे घडवले जातात. हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे, हिंदकेसरी दीनानाथ सिंह, हिंदकेसरी गणपतराव आंदळकर, रुस्तम-ए-हिंद दादू चौगले, राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेते राम सारंग यांच्यापासून ते अलीकडच्या डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी कुस्तीत कोल्हापूरचे नाव उज्ज्वल केले आहे. 

नेमबाजीत कोल्हापूरचा ब्रॅंड तयार झाला आहे. सामान्य कुटुंबातील तेजस्विनी सावंतने त्याचा पाया रचला. नवनाथ फरताडे, राधिका बराले, संदीप तरटे, फुलचंद बांगर, राही सरनोबत, अनुष्का पाटील, अभिज्ञा पाटील यांनी प्रशिक्षक जयसिंग कुसाळे यांच्या प्रेरणेतून नेमबाजीत आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःची प्रतिमा तयार केली आहे. महापालिकेच्या दुधाळीवरील छत्रपती संभाजी महाराज नेमबाजी प्रशिक्षण केंद्राचे रूपडे ही बदलले आहे. विभागीय क्रीडा संकुलात नेमबाजीचे सेंटर सुरू झाले आहे. 
छत्रपती घराणे फुटबॉलवर नितांत प्रेम करणारे आहे. आजही फुटबॉलचे सामने छत्रपती शाहू स्टेडियमवर पाहायला प्रेक्षकांची गर्दी उसळते. इथले फुटबॉलपटू पुणे, मुंबई, बंगळूर, कोलकत्ता येथील संघात खेळले आहेत. आजही नव्या दमाचे खेळाडू परजिल्ह्यातील संघात स्वतःचे स्थान बळकट करून आहेत. कैलास पाटील, निखिल कदम, सुखदेव पाटील यांनी त्यांची कारकीर्द गाजवली आहे. अनिकेत जाधवने 19 वर्षांखालील भारतीय संघात प्रवेश करत आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःची क्षमता सिद्ध केली आहे. 
जलतरणात बुधवार पेठेतल्या अवनी सावंतचा लौकिक होता. पूजा नायर, मंदार दिवसे यांच्यासह वीरधवल खाडेने जलतरणात कोल्हापूरचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचावले. 
थेट ऑलिंपिक स्पर्धेत त्याने प्रवेश केला. आज तहसीलदार म्हणून तो मुंबईत कार्यरत आहे. क्रिकेटमध्ये संग्राम अतितकर, विशांत मोरे रणजी क्रिकेट स्पर्धा खेळले आहेत. तत्पूर्वी कोल्हापूरच्या क्रिकेटपटूंनी रणजीमध्ये अष्टपैलू कामगिरीचे दर्शन घडवले आहे. त्यांच्या नावांची यादी मोठी आहे. क्रिकेटवीर भाऊसाहेब निंबाळकर कोल्हापूरमधले क्रिकेटमध्ये गाजलेले व्यक्तिमत्त्व आहे. त्यांचा वारसा नवी पिढी चालवत आहे. कबड्डीमध्येही प्रा. डॉ. रमेश भेंडिगिरी यांनी कमाल केली आहे. भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक म्हणून त्यांनी काम केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय महिला संघाने विश्वविजेतेपद पटकावले होते. 
कबड्डीमध्ये खास कोल्हापुरी टेक्‍निक त्यांनी निर्माण केले आहे. ज्याची भुरळ थायलंड देशालाही आहे. त्यामुळेच थायलंडने त्यांना तिथल्या कबड्डी संघांना मार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रित केले होते. हॉकीपटूंसाठी मेजर ध्यानचंद स्टेडियमची निर्मिती झाली आहे. जिल्हा हॉकी संघटनेचे अध्यक्ष विजय साळोखे-सरदार यांच्या काबाडकष्टातून हॉकीपटूंसाठी हक्काचे स्टेडियम आकाराला आले आहे. स्टेडियममध्ये येत्या काही दिवसांत ऍस्ट्रो टर्फ उपलब्ध होणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील हॉकीपटूंना त्याचा पुरेपूर फायदा उठवता येणार आहे. 

टेबल टेनिससारख्या वैयक्तिक खेळातही कोल्हापूर मागे राहिलेले नाही. शैलजा साळोखे यांनी या खेळात चमकदार कामगिरी करत अर्जुनवीर पुरस्कार मिळवला आहे. बेसबॉलपटू गिरीजा बोडेकर हिने शिवछत्रपती पुरस्कार मिळवला आहे. शरीरसौष्ठव क्रीडा प्रकारात सुहास खामकरने "भारत श्री'चा किताब पटकावलाय. स्नेहांकिता वरुटे हिने पॉवरलिफ्टिंगमध्ये कौशल्य दाखवले आहे. शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त बिभीषण पाटील यांच्याकडे आजही मुले-मुली वेटलिफ्टिंग, पॉवरलिफ्टिंगसह शरीरसौष्ठवाचे धडे घेत आहेत. संतोष बाबर यांनी तायक्वांदोत देशाचा झेंडा फडकवला आहे. मल्लखांब व जिम्नॅस्टिक्‍सचे खेळाडूही येथे घडत आहेत. प्रशिक्षक विश्‍वास चोपडे, संजय तोरस्कर त्यांना मार्गदर्शनाचे काम करत आहेत. ऍथलेटिक्‍सचे हजारो खेळाडू कोल्हापूर जिल्ह्यात आहेत. परशराम भोई, दीपक कुंभार यांनी अनेक स्पर्धा जिंकल्या आहेत. प्रौढ गटातही कोल्हापूरचे खेळाडू मागे हटत नाहीत. महिपती संकपाळ यांनी मुंबई मॅरेथॉन, सातारा हिल मॅरेथॉनमध्ये सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. पॅरालिंपिक प्रकारात कोल्हापूरचे दिव्यांग खेळाडू दमदार कामगिरी करताना दिसत आहेत. कमलेश कराळे व्हिलचेअर क्रिकेटचा बादशहा आहे. अनिल पोवार यांनी शिवछत्रपती पुरस्कारावर मोहोर उमटवली आहे. पॅरा जलतरणपटू स्वप्नील संजय पाटील याने पदके मिळवून स्वत:ला सिद्ध केले आहे. 
कोल्हापूरच्या खेळाडूंनी जिद्द व कठोर मेहनतीच्या जोरावर हे यश मिळवले आहे. आजही ग्रामीण भागातील खेळाडू वेगवेगळ्या खेळातून स्वतःला घडविण्यासाठी झटत आहेत. सोयीसुविधा मिळाल्या नाहीत, म्हणून ते थांबणारे नाहीत. त्याबद्दल तक्रारही करत नाहीत. कोल्हापूरचे नाव उंचवायचे आहे, या ध्येयाने त्यांना पछाडलेले आहे. त्यामुळेच महाराष्ट्रात कोल्हापूरची क्रीडा क्षेत्रात वेगळी ओळख आहे. कोल्हापूर ही क्रीडापंढरी का आहे, याचे उत्तर इथल्या खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्यस्तरावर मिळविलेल्या पदकांत आहे. 

संपादन - यशवंत केसरकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Branding by Kolhapur Sports