झाड तोडताय, मग दंड भरा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 एप्रिल 2020

बेसुमार वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा समतोल बिघडला आहे. त्यामुळे शासनाने वृक्षतोडीला आळा घालण्यासाठी कंबर कसली आहे. 

धामोड ः धामोड-राशिवडे खुर्द बेले (ता. राधानगरी) दरम्यानच्या हद्दीत 450 वृक्षांची विनापरवाना तोड केल्याबद्दल दोघांवर दंडात्मक कारवाई केली. दोघांना 90 हजार रुपये दंड केला. अद्याप एकाचा जबाब नोंदवला नसल्याने त्याच्यावरील दंडात्मक कारवाई प्रलंबित आहे, अशी माहिती राधानगरी वनक्षेत्रपाल एस. बी. बिराजदार यांनी "सकाळ'शी बोलताना दिली. याबाबत सचिन पाटील व नरेश पाटील यांनी वन विभागाकडे तक्रार केली आहे.

सचिन पाटील व नरेश पाटील यांच्यासह चार हिस्सेदार यांच्या सात हेक्‍टर क्षेत्र सामायिक आहे. यामध्ये आंबा, फणस ,साग ,खैर व शिसव अशा साडेचारशे वृक्ष होते. यामधील सहहिस्सेदार वेताळ पाटील, दिनकर पाटील यांनी वृक्षांची परस्पर विल्हेवाट लावल्याची तक्रार सचिन पाटील यांनी वन विभागाकडे केली होती. यानुसार वृक्षतोड झालेल्या घटनेचा पंचनामा वन विभागाने केलेला आहे. 
राधानगरी वन कार्यालयाला अहवाल प्राप्त झाल्यानंतर वन अधिनियमानुसार दिनकर पाटील व हिस्सेदार यांच्यावर 45 हजार रुपये तसेच ठेकेदार चंद्रकांत बाळू चौगुले याच्यावर 45 हजार रुपये दंडात्मक कारवाई केली आहे. वेताळ पाटील यांचा अद्यापही जबाब नोंदविला नसल्याने हे प्रकरण प्रलंबित ठेवल्याची माहिती अशी माहिती श्री. बिराजदार यांनी दिली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Break the tree, then pay the fine