आधी ना हरकत प्रमाणपत्र आणा, मगच पगार मागा... 

ओंकार धर्माधिकारी 
बुधवार, 1 जुलै 2020

शिवाजी विद्यापीठातील कंत्राटी प्राध्यापकांना मे महिन्याचा पगारच देण्यात आलेला नाही.

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील कंत्राटी प्राध्यापकांना मे महिन्याचा पगारच देण्यात आलेला नाही. आधी ना हरकत प्रमाणपत्र आणा, मगच पगार मिळेल, अशी भूमिका विद्यापीठाने घेतल्याने या प्राध्यापकांना मे महिन्याचा पगार मिळाला नाही. त्याचबरोबर पुढच्या वर्षीची कंत्राटी नियुक्तीही अद्याप झालेली नाही. त्यामुळे विद्यापीठातील हे 70 प्राध्यापकांची विद्यापीठाने वाऱ्यावरच सोडले असल्यासारखी परिस्थिती आहे. 

विद्यापीठातील कायम प्राध्यापकांच्या निवृत्तीनंतर नवीन भरती झालीच नाही. त्यामुळे त्यांच्या जागी कंत्राटी प्राध्यापक घेण्यात आले. 11 महिन्यांचे कंत्राट या धर्तीवर त्यांनी विद्यापीठात शिकवण्यास सुरुवात केली. दरवर्षी वर्षाच्या सुरुवातीला जाहिरात निघते. मग निवड प्रक्रिया केली जाते. त्यातून नियुक्ती होणारे प्राध्यापक त्या शैक्षणिक वर्षात शिकवतात. या वर्षी या प्राध्यापकांना मे महिन्याचे वेतनच मिळाले नाही. कारण ना हरकत प्रमाणपत्र (नो ड्युस) सादर करण्याची अट त्यांना आहे. कोरोनामुळे मार्च आणि एप्रिलमध्ये लॉकडाऊमुळे विद्यापीठ बंद असल्याने त्यांना ना हरकत प्रमाणपत्र देता आले नाही. मात्र ही बाब लक्षात घेऊन विद्यापीठ प्रशासनाने वेतन देणे अपेक्षीत होते. मात्र त्यांना मे महिन्याचे वेतन मिळाले नाही. या कंत्राटी प्राध्यापकांचे पुढील वर्षाची नोकरीही अनिश्‍चितच आहे. कारण प्रशासनाने कंत्राटी प्राध्यापकांऐवजी तासिकातत्वावरील प्राध्यापक घेण्याचा प्रस्ताव दिला आहे. 

मुळात यंदा विद्यापीठातील वर्ग उशिरा म्हणजे ऑगस्टमध्ये सुरू होतील. कंत्राटी शिक्षकांची निवड प्रक्रिया ही सर्वसाधारणपणे तीन महिने असते. त्यामुळे जुलैमध्येही जर प्रक्रियेला सुरुवात झाली तरी सप्टेबरमध्ये या शिक्षकांची नियुक्ती होईल. त्यामुळे या शिक्षकांना प्रत्यक्षात सात महिन्यांचा कालावधीच मिळणार आहे. मे पासून या शिक्षकांना वेतन नाही. पुढील नोकरी अनिश्‍चित आहे. अशा काळात या उच्चशिक्षीत तरुणांचे भवितव्य अंधकारमय झाले आहे. पुणे, मुंबई, नागपूर या विद्यापीठांच्या धर्तीवर 5 वर्षांसाठी यांची नियुक्ती करावी, अशी मागणी या कंत्राटी प्राध्यापकांकडून होत आहे. 

विद्यापीठातील कंत्राटी स्वरुपाच्या प्राध्यापकांच्या प्रश्‍नाची कल्पना आहे. याबाबतची अधिक माहिती घेऊन याबाबत पुढील कार्यवाही करू. विद्यापीठातील वर्ग सुरू होण्यापूर्वी त्यांची उपलब्धता होईल याची दक्षता घेऊ. 
- प्रा. डॉ. नितीन कळमरकर, प्रभारी कुलगुरू. 

दृष्टीक्षेपात कर्मचारी 
कायम प्राध्याक जागा - 210 
सध्या कार्यरत प्राध्यापक - 84 
कंत्राटी शिक्षक - 70 
प्राध्यापकांच्या रिक्त जागा - 126 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bring a no-objection certificate first