थरारक... मगरींच्या हल्लातुन बैलाने वाचवले आपल्या धन्याचे प्राण...

The bull survives the life of farmer from the attack of the crocodile
The bull survives the life of farmer from the attack of the crocodile

सातवे ( कोल्हापूर ) - भर दुपारी उन्हाच्या तडाख्यात तहान भागविण्यासाठी नदी पात्रात उतरलेल्या महेश सर्जेराव काटे (वय २७) या शेतकऱ्यावर व त्याचा जिवलग सोबती असलेल्या बैलावर आज मगरींनी प्राणघातक हल्ला केला; पण प्रसंगावधान राखत जोराची मुसंडी मारून बैलाने स्वतः बरोबर आपले दावे अर्थात जीवन ज्याच्या हातात आहे, अशा धन्याला वाचविले. ही घटना आज दुपारी सातवे (ता. पन्हाळा) येथील वाणी मळ्यातील वारणा नदीच्या पात्रात दुपारी बाराच्या सुमारास घडली. 
ही बातमी वाऱ्यासारखी वारणा खोऱ्यात पसरली. बैलाच्या कौतुकाबरोबरच या घटनेने मगरीचे भयही नदीकाठच्या गावात मात्र पुन्हा निर्माण झाले. एखाद्या ग्रामीण चित्रपटातील बळी राजाच्या जीवनातील परिस्थितीनुरूप येणारा थरार, जंगली प्राणी, हिंसक जलचरांचे हल्ले याचा आँखो देखा हाल आज नदीकाठावरील लोकांना पहायला मिळाला.

पाण्यात ओढून नेण्याचा केला प्रयत्न

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी - महेश हा युवा शेतकरी साथीदार सागर कार्वेकर, अण्णा  निकम, संग्राम पोवार, अरविंद मोरे शेतीच्या मशागतीसाठी तीन बैल जोड्या घेवून वसंत पाटील यांच्या नदीकाठच्या शेतात गेले होते. सकाळी शेतीतील मशागतीची कामे करुन दुपारी बाराच्या सुमारास सर्वजण येथील वाण्याची मळी म्हणून असलेल्या ठिकाणी नदीमध्ये बैलांना पाणी पाजण्यासाठी गेले. सुरवातीला तीन बैलांना पाणी पाजून त्यांनी पात्राबाहेर आणले. नंतर महेश बैलाला घेऊन पात्रात गेला. यापूर्वी त्यांना येथे एकदाही मगरीचे दर्शन झालेले नव्हते. नेहमी याच ठिकाणी बैलांना पाणी पाजण्यासाठी घेवून जात असल्याने ते निर्धास्तपणे पात्रात उतरले. महेश बिनधास्त असताना अचानक मगरीने त्याच्या डाव्या पायावर प्राणघातक हल्ला करून त्याला पाण्यात ओढून नेण्याचा प्रयत्न केला. याचवेळी महेशने प्रचंड आरडाओरडा केला. यावेळी अन्य काही मगरी बैलाच्या दिशेने आल्या.

बैलाने पाण्यातून बाहेर ठोकली धूम

त्याचवेळी प्रसंगावधान राखत बैलाने पाण्यातून बाहेर धूम ठोकली. सवयीप्रमाणे यावेळी महेशने बैलाचा कासरा आपल्या हाताला गुंडाळला असल्याने बैलासोबत तोही फरफटत पाण्यातून बाहेर आला. तरीही मगरींनी त्याचा पाठलाग केला; पण दैव बलवत्तर म्हणूनच बैलाचा व मालकाचा जीव वाचला. अन्य शेतकऱ्यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी महेशला बाजूला घेतले. मगरींच्या हल्ल्यात महेशच्या डाव्या पायाला इजा झाली. मगरीचे तीन दात लागले आहेत. शरीरावर अन्य काही किरकोळ जखमा झालेल्या आहेत. त्याला गावातीलच खासगी दवाखान्यात उपचार केल्यानंतर कोडोली येथील यशवंत हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले.

महेश अविवाहीत असून त्याची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. त्याच्यावर कुटुंबाची जबाबदारी असल्याने त्यांच्या कुटुंबावरील मोठे संकट टळले. त्याच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी गावकऱ्यांनी रुग्णालयात गर्दी  केली. 
या घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे वनपाल व्ही. टी. दाते व वनरक्षक के. बी. बादरे यांनी रुग्णालयात येवून महेशच्या प्रकृतीची चौकशी केली. या घटनेची माहिती समजताच विविध सामाजिक संघटना व कार्यकर्त्यांनीही रुग्णालयात धाव घेतली. महेशला सध्या आर्थिक मदत मिळणे गरजेचे आहे.

जीवावरचे निभावले पायावर!

  •  दुपारी बाराला मगरींचा हल्ला 
  •  एका मगरीने महेशचा पाय ओढला
  •  जबरी चाव्याने महेश किंचाळला
  •  बिथरलेला बैल उसळी घेत पाण्याबाहेर
  •  कासऱ्यामुळे महेश त्यामागे फरफटत
  •  मगरीच्या पकडीमुळे पायाचा लचका तुटला


मगरींचा बंदोबस्त करण्याची मागणी

वारणा नदी पात्रता कोडोली, निलेवाडी, चावरे, घुणकी, भादोले, भेंडवडे, खोची परीसरातील शेतकऱ्यांना मगरीचा वावर वारंवार दिसून येतो. एखाद्या शेतकऱ्यांची बळी गेल्यानंतर शासन, वनविभाग जागे होणार काय, अशी चर्चा आता परिसरात सुरू झाली आहे. आता तरी वनविभागाने मगरींचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. दरम्यान, वनविभागाचे वनपाल, कर्मचाऱ्यांनी भेट देऊन घटनेची पाहणी केली.

मगरीच्या हल्ल्यात जखमी झालेले महेश यांना शासकीय नियमानुसार नुकसान भरपाई देण्यात येईल.
-व्ही. टी. दाते, वनपाल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com