गडहिंग्लज-संकेश्‍वर मार्गावर सहा महिन्यानंतर बस सुरू

दीपक कुपन्नावर
Thursday, 24 September 2020

गडहिंग्लज येथील आगारातून संकेश्‍वरला बस सुरू झाल्या आहेत. तब्बल सहा महिन्यानंतर या मार्गावरून बस धावू लागली. सध्या रोज 14 फेऱ्या सुरू आहेत.

गडहिंग्लज : येथील आगारातून संकेश्‍वरला बस सुरू झाल्या आहेत. तब्बल सहा महिन्यानंतर या मार्गावरून बस धावू लागली. सध्या रोज 14 फेऱ्या सुरू आहेत. कोल्हापूर फेरी देखील निपाणी मार्गे पुर्वतत सुरू झाली. यामार्गे बस सुरू झाल्याने प्रवाशांची आर्थिक भुर्दंडातुन सुटका झाली. सर्वाधिक उत्पन्न देणारे संकेश्‍वर, कोल्हापूर मार्ग सुरू झाल्याने कोरोनामुळे विस्कळीत झालेली आगाराची आर्थिक घडी सावरण्याल्या हातभार लागण्याची चिन्हे आहेत. 

मार्च मध्यापासून लाकडाऊन सुरू झाल्यानंतर आगाराचे सुरू झालेले दृष्टचक्र अद्याप सुरू आहे. तब्बल अडीच महिन्याहुन अधिक काळ संचारबंदी असल्याने बस बंद राहिल्या. जुन महिन्यात जिल्हाअंतर्गत बससेवेला प्रारंभ झाला. कोरोनाच्या भितीने प्रवाशांची प्रवासाची मानसिकता नसल्याने याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यातच केवळ 50 टक्के प्रवाशी वाहतुकीस परवानगी असल्याने तोट्यातच बस धावत होती. केवळ नोकरदारामुळे गडहिंग्लज-कोल्हापूर फेरी जिल्ह्यात अव्वल ठरली.

एसटीच्या मालवाहतूकीच्या प्रयोगाला व्यापाऱ्यांची चांगली साथ मिळाली. 
गेल्या आठवड्यापासून आंतरजिल्हा बससेवा सुरवात झाली. या आगाराला सर्वाधिक उत्पन्न देणारा मार्ग म्हणजे कोल्हापूर होय. रोज 15 बस या मार्गावरून धावत होत्या. त्यातुन सुमारे दीड लाखाचे उत्पन्न आगाराला मिळायचे. आंतरराज्य बंदी असल्याने कोल्हापूर बस कापशी, मुरगुड, कागल मार्गे सुरू होती.

या मार्गाने अंतर वाढल्यामुळे वेळेसह आर्थिक भुर्दंड सोसुन प्रवाशांना नाईलाजाने प्रवास करावा लागला, एकतास उशिरा पोहचण्यासह नेहमीच्या दराच्या तुलनेत 50 रुपये आधिक मोजावे लागले. आंतरराज्य बससेवा सुरू झाल्याने कोल्हापूर गाडी पुर्वीप्रमाणेच निपाणी मार्गे धावू लागली आहे. सध्या सात बस यामार्गावर धावत आहेत. 

या आगाराचा सर्वाधिक उत्पन्नाचा दुसरा मार्ग म्हणजे संकेश्‍वर होय. नातेसंबधासह व्यापारामुळे या मार्गावर रोज प्रवास करणायांची संख्या मोठी आहे. रोज 48 फेऱ्यांतुन या मार्गावर सुमारे 65 हजाराचे उत्पन्न मिळायचे. आठ बस या मार्गावर कार्यरत होत्या. गेल्या दोन महिन्यात केवळ हिटणीपर्यंतच बस सुरू होत्या.

महिन्याभरापासुन कर्नाटक शासनाने अनलॅक करुन सर्व व्यवहार सुरळीत केले. पंरतु, आंतरराज्य सेवा बंद असल्याने सर्वाचींच कुंचबना होत होती. कालपासून (ता. 22) या मार्गावर बस सुरु झाल्या. सध्या दोन बसव्दारे 14 फेऱ्या सुरू असल्याचे आगार व्यवस्थापक एस. एस. मनगुतकर यांनी सांगितले. संकेश्‍वर आगाराच्या दोन बस सुरू झाल्या आहेत. 

सुरक्षिततेला प्राधान्य 
कोरोनामुळे लोकांत प्रवासाबद्दल भिती आहे. या पार्श्‍वभुमीवर आगारातर्फे विशेष दशता घेतली जात आहे. रोज बस सॅनिटाइझ केल्या जातात. तसेच प्रवासा अगोदर सर्व खबरदारी घेऊनच बस सोडली जाते. पुर्ण क्षमतेने प्रवाशांसह तालुक्‍यातील सर्वच मार्गावर बस सुरू झाल्या आहेत. पुणे, मुंबईसाठी जादा गाड्या सोडल्या जात आहेत. 

 

संपादन - सचिन चराटी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bus Starts On Gadhinglaj-Sankeshwar Route After Six Months Kolhapur Marathi News