...अन् एक बस भरायला लागले साडेचार तास

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 मे 2020

साठ दिवसांच्या लॉकडाऊननंतर आजपासून एसटी सेवेला प्रारंभ झाला. येथील आगारातून आज पहिल्या दिवशी गडहिंग्लज-कोल्हापूर ही एकच एसटी धावली. त्यातसुद्धा 19 प्रवाशांचे भारमान होण्यासाठी तब्बल साडेचार तासाची प्रतीक्षा करावी लागली. 

गडहिंग्लज : साठ दिवसांच्या लॉकडाऊननंतर आजपासून एसटी सेवेला प्रारंभ झाला. येथील आगारातून आज पहिल्या दिवशी गडहिंग्लज-कोल्हापूर ही एकच एसटी धावली. त्यातसुद्धा 19 प्रवाशांचे भारमान होण्यासाठी तब्बल साडेचार तासाची प्रतीक्षा करावी लागली. 

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 23 मार्चपासून लॉकडाउन जाहीर झाल्यानंतर राज्यातील सर्व सार्वजनिक वाहतूक बंद केली. 30 मे पर्यंत लॉकडाउन असला तरी आजपासून एसटी सुरू करण्याची सूचना शासनाकडून करण्यात आली. त्यानुसार आज येथील एसटी आगारप्रमुख मनगुतकर यांनी सर्व कर्मचाऱ्यांना सज्ज राहण्याची सूचना केली. बसेसही सकाळी फलाटावर लावल्या. परंतु, एक प्रवासी चौकशीसाठीसुद्धा आला नाही. परिणामी ड्युटीवर आलेले कर्मचारी बसूनच राहिले. 

कोल्हापूर नॉनस्टॉप बस सकाळी साडेआठ वाजता फलाटावर लावण्यात आली होती. परंतु, त्याचे भारमान होण्यासाठी तब्बल साडेचार तास प्रतीक्षा करावी लागली. अखेर भारमानासाठी तीन प्रवासी कमीच पडले. अखेर साडेबारा वाजता ही बस गडहिंग्लजमधून सुटली. कापशी, गोरंबे, कागलमार्गे ही बस धावणार असल्याने त्याचे तिकीट दर 110 रुपये इतके होते. कोल्हापूरहून परतताना अवघे दोनच प्रवासी मिळाले. ही एक एसटी वगळता इतर कोणत्याही मार्गावर एसटी धावली नसल्याचे आगार प्रमुख मनगुतकर यांनी सांगितले. 

चार कोटींच्या उत्पन्नावर पाणी... 
आधीच तोट्यात असणाऱ्या एसटी महामंडळाला अधिक आर्थिक घाट्यात नेण्यात लॉकडाउनचा हातभार लागला. गडहिंग्लज आगाराला दर महिन्याला दोन ते सव्वा दोन कोटीचे उत्पन्न मिळायचे. या लॉकडाउनमुळे साठ दिवसाचे चार कोटींहून अधिक रक्कमेच्या उत्पन्नावर पाणी फिरले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bus took Four Hour And A Half Hours To Fill Kolhapur Marathi News