लग्न सराई, शाळांचा हंगाम आणि गणेशोत्सवही गेला कोरडाच, वाचा छपाई व्यवसायिकांची व्यथा

गणेश बुरुड
Wednesday, 16 September 2020

डहिंग्लज, आजरा व चंदगड तालुक्‍यातील 50 हून जास्त छपाई व्यावसायिक आणि या व्यवसायावर अवलंबून असणारे दोनशे कामगार आता संकटात सापडले आहेत.

महागाव : कोरोनामुळे सण, उत्सव सार्वजनिक कार्यक्रम साजरे करण्यावर मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे छपाई व्यवसाय पुर्णत: ठप्प झाला आहे. गडहिंग्लज, आजरा व चंदगड तालुक्‍यातील 50 हून जास्त छपाई व्यावसायिक आणि या व्यवसायावर अवलंबून असणारे दोनशे कामगार आता संकटात सापडले आहेत. छपाई व्यवसायिकांचे दीड ते दोन कोटीचे नुकसान झाले आहे.

लग्न सराई, शाळांचा प्रवेशाचा हंगाम आणि आता गणेशोत्सवही कोरडा गेल्याने व्यवसायिक हतबल झाले आहेत. छपाई व्यवसायाची संपूर्ण वर्षांची आर्थिक गणिते ही लग्नसराईत अंवलबून असतात. त्यामुळे या लग्नसराईच्या हिशोबाने छपाई व्यवसायिक लग्नपत्रिकेच्या कच्चा माल खरेदी करुन ठेवतात. त्यासाठी मोठे भांडवल गुंतविले जाते, मात्र यंदा कोरोनामुळे लग्नाचा हंगाम कोरडा गेला. जूनमध्ये शाळा सुरू होतील मग दरवर्षीप्रमाणे शाळांची कामे मोठ्या मिळतील, अशी आशा छपाई व्यवसायिकांना होती.

मात्र कोरोनामुळे शाळाही सुरू झाल्या नाहीत त्यामुळे शाळांची कोणतीच कामे मिळाली नाहीत. त्यानंतर गणेशणेत्सवामध्ये गणपती मंडळाचे अहवाल, पावती पुस्तके व पतसंस्था व बॅकांचे वार्षिक अहवालांची कामे मिळतील अशी आशा होती, पण या सर्वांवर मर्यादा आल्या. त्यामुळे हा व्यवसाय झालाच नाही. त्यामुळे त्यावर आधारित मालक व कामगार अडचणीत आहेत. पुढील काही काळ छपाई व्यवसायिकांची घडी पूर्वरत बसण्याची शक्‍यता कमी असल्याने शासनाकडून मदत मिळावी, अशी व्यावसायिक व कामगांराची मागणी आहे. 

पगार भागविणे अवघड
कोरोनामुळे सध्यातरी छपाई व्यवसायिक पूर्णपणे हतबल झाले आहेत. अनेकांनी कर्ज काढून हा व्यवसाय सुरू केला आहे, मात्र व्यवसाय ठप्प झाल्याने कर्जाचे हप्ते, वीजबील, घरखर्च व कामगारांचे पगार भागविणे अवघड झाले आहेत. 
- सतिश सुर्वे, व्यावसायिक

 

संपादन - सचिन चराटी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The business of printing professionals stalled Kolhapur Marathi News