
शहरातील भटक्या कुत्र्यांपासून निर्माण होणारा रेबीजचा धोका टाळण्यासाठी त्यांनाच ऍन्टी रेबीज व्हॅक्सीन देण्याची मोहीम महापालिकेने सुरू केली आहे. तसेच निर्बीजीकरणाचे कामही सुरू आहे.
कोल्हापूर : शहरातील भटक्या कुत्र्यांपासून निर्माण होणारा रेबीजचा धोका टाळण्यासाठी त्यांनाच ऍन्टी रेबीज व्हॅक्सीन देण्याची मोहीम महापालिकेने सुरू केली आहे. तसेच निर्बीजीकरणाचे कामही सुरू आहे. या दोन्ही उपक्रमांद्वारे भटक्या कुत्र्यांचा धोका व उच्छाद कमी होण्याची शक्यता आहे. शहराच्या सर्वच भागांत भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. मध्यरात्री दुचाकी अथवा मोटार नजरेस पडल्यास कुत्री धावून जातात. पिसाळलेले कुत्रे चावल्यास जीवघेण्या आजाराला सामोरे जावे लागते. भविष्यात हा प्रश्न गंभीर होऊ नये, यासाठी रेबीज लसीकरण मोहीम सुरू करण्यात येणार आहे, पण त्यांना पकडण्याचे आव्हान महापालिकेसमोर आहे. लस देतानाही जाळीत बंदिस्त करून लस द्यावी लागते. लसीकरण ओळखण्यासाठी कुत्र्याच्या गळ्यात पट्टा बांधला जातो.
खाद्यपदार्थांच्या गाड्यांमुळे गर्दी
मटण दुकानाच्या परिसरात कुत्री दिसायची. आता मांसाहारी खाद्यपदार्थाच्या गाड्यांची संख्या वाढली. त्यांनी शिल्लक अन्न टाकले की कुत्री तिथे गर्दी करतात. एक दिवस खाण्यासाठी मिळाले नाही की ती आक्रमक होतात.
शहरातील भटक्या कुत्र्यांचे शंभर टक्के रेबीज लसीकरण सुरू केले आहे. तसेच निर्बीजीकरणाचेही काम सुरू आहे. लसीकरणाद्वारे भटक्या कुत्र्यांचा उपद्रव कमी करण्याचा प्रयत्न आहे.
- डॉ. विजय पाटील, पशुवैद्यकीय अधिकारी, महापालिका