ब्रेकिंग - इचलकरंजी शहरासाठीची बहुचर्चित वारणा नळपाणी योजना अखेर रद्द

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 18 June 2020

वारणा दुधगंगा नदीतून इचलकंजी शहरासाठी नळाने पाणी नियोजनाचा आराखडा तयार करण्यात येणार आहे.

इचलकरंजी : शहरासाठी बहुचर्चित असणारी वारणा नळपाणी योजना अखेर रद्द करण्याचा निर्णय आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. दुधगंगा नदीतून इचलकंजी शहरासाठी नळाने पाणी नियोजनाचा आराखडा तयार करण्यात येणार आहे. हा आराखडा येत्या 31 जुलैपर्यंत पूर्ण करण्याचा आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या  बैठकीस खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आवाडे, माजी आमदार सुरेश हाळवणकर, मदन कारंडे, नगराध्यक्ष अलका स्वामी यांच्यासह राजकीय नेते उपस्थित होते. या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार व जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभाग घेतला.

सुमारे तीन लाख लोकसंख्या असलेल्या इचलकरंजी शहराला गेली अनेक वर्ष दूषित पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे. सध्या इचलकरंजी शहराला पंचगंगा नदी पाणी दूषित नसताना पंचांगा पात्रातील व शिरोळ तालुक्‍यातील मजरेवाडी या ठिकाणाहून कृष्णा नदीतून पाण्याचा उपसा केला जातो. मात्र अलीकडच्या काळात कृष्णा नदी ही प्रदूषित होऊ लागली आहे. त्यामुळे लाखो लोकांचा प्रश्न गंभीर बनला आहे. अशातच इचलकरंजी शहराला दूषित पाण्यामुळे कावीळचा मोठा संसर्ग झाला होता. यातून अनेकांना जीवही गमवावा लागला होता. त्यामुळे शहरासाठी नव्याने काळम्मावाडी व वारणा योजना चर्चेत आली.

आर्थिक दृष्ट्या काळमवाडी योजना राबवणे शक्य नसल्यामुळे वारणा नदीतून शहरासाठी पाणीपुरवठा करण्याचा निर्णय झाला. त्यासाठी उपसा केंद्र दानोळी हे गृहीत धरण्यात आले. मात्र शिरोळ तालुक्यातील अनेक गावांनी या योजनेला विरोध केला. गेली दीड वर्षे चर्चेत असलेली ही योजना अखेर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. आता इचलकंजी शहरासाठी दूधगंगा नदीमधून पाण्याचा पुरवठा करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीस संबंधित सर्व शासकीय अधिकारी उपस्थित होते.

हे पण वाचा - ...तर आमदारकीची ही ब्याद आम्हाला नकोच...!  

 

हे पण वाचा - जोतिबा डोंगरावर वर्षा पर्यटनासाठी 'हे' खास पाॅईंट पण यंदा कोरोनाने प्लॅन फसला...  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cancel of Warna tap water scheme for Ichalkaranji city