महापालिका कर्मचारी संघाचे होणार कॅन्टीन

डॅनियल काळे
शनिवार, 30 मे 2020

शहाजी कॉलेजजवळील महापालिकेच्या शंकरराव सावंत सभागृहामध्ये हे कॅंटीन सुरू केले जाणार आहे. महापालिका कर्मचारी संघाचे अध्यक्ष संजय भोसले आणि त्यांच्या सर्वच पदाधिकाऱ्यांकडून याबाबत विविध स्तरावर प्रयत्न केले जात आहेत. यामुळे महापालिका कर्मचाऱ्यांना दरमहा स्वस्तातला आणि चांगल्या दर्जाचा बाजार मिळणार आहे. 

कोल्हापूर,ः सैन्यदल आणि पोलिस जवानांसाठी असणारी कॅंटीनची व्यवस्था महापालिकेतील कर्मचाऱ्यांसाठीही सुरू करण्याची तयारी महापालिका कर्मचारी संघाने केली आहे. खासगी मॉलपेक्षाही चांगल्या दर्जाचा आणि स्वस्तात महापालिका कर्मचाऱ्यांना परवडेल, अशा दरात ही सेवा सुरू करण्याचा प्रयत्न सुरू आहे. 
शहाजी कॉलेजजवळील महापालिकेच्या शंकरराव सावंत सभागृहामध्ये हे कॅंटीन सुरू केले जाणार आहे. महापालिका कर्मचारी संघाचे अध्यक्ष संजय भोसले आणि त्यांच्या सर्वच पदाधिकाऱ्यांकडून याबाबत विविध स्तरावर प्रयत्न केले जात आहेत. यामुळे महापालिका कर्मचाऱ्यांना दरमहा स्वस्तातला आणि चांगल्या दर्जाचा बाजार मिळणार आहे. 
कोल्हापूर महापालिका ही स्थानिक स्वराज्य संस्था आहे. महापालिकेत आरोग्य, पाणी पुरवठा, पवडी, प्राथमिक शिक्षण मंडळासह विविध विभागांमध्ये सुमारे 4500 कर्मचारी आहेत. त्याचबरोबर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची संख्याही सुमारे दीड हजार इतकी आहे. महापालिकेकडील सर्वच विभागातील कामगार, सेवानिवृत्त कर्मचारी अशांची ही संख्या सुमारे सहा हजारांच्या घरात जाते. या सर्व कर्मचाऱ्यांना दरमहा लागणारा बाजार सध्या ते इतरत्र घेतात. ज्याला जसे जमेल त्या पद्धतीने ते खरेदी करतात. काही ठिकाणी कर्मचाऱ्यांना महागड्या वस्तू खरेदी कराव्या लागतात. तर बऱ्याच अधिकारी, कर्मचाऱ्यांना व्यस्त वेळापत्रकामुळे बाजारासाठी वेळही मिळत नाही. या सर्व गोष्टींचा विचार करता महापालिका कर्मचारी संघाने आता यामध्ये पुढाकार घेतला आहे. 
महापालिका कर्मचारी संघाचे अध्यक्षपद सध्या संजय भोसले यांच्याकडे आहे. कर्मचाऱ्यांसाठी स्वस्तात वस्तू मिळण्यासाठी कॅंटीन सुरू करण्याची संघाची एक महत्त्वाची योजना आहे. 
महापालिका कर्मचाऱ्यांचा पगार दर महिन्याच्या दहा तारखेपर्यंत होतो. प्रत्येकाला महिन्याचा बाजार घ्यावा लागतोच. त्यामुळे एवढ्या मोठ्या वर्गासाठी एकत्रित खरेदी केली आणि त्याचे योग्य नियोजन केले, तर प्रत्येक वस्तूच्या किमतीत मोठा फरक पडतो; वस्तू स्वस्तात मिळतात. त्यामुळे ही अभिनव योजना राबविली जाणार आहे. 
विशेष म्हणजे प्रत्येक कर्मचाऱ्याकडून बाजाराची एक यादी मागविली जाईल. या यादीप्रमाणे सर्व साहित्य त्याच्या घरी पोहच करण्यात येणार आहे. यामुळे वेळ आणि श्रमाची बचत होणार तर आहेच; पण कर्मचाऱ्यांना स्वस्त धान्य व इतर जीवनावश्‍यक वस्तू मिळणार आहेत, असा कर्मचारी संघाचा दावा आहे. 

महापालिकेचे सर्व कर्मचारी अतिशय सामान्य असतात. कर्मचाऱ्यांना घरच्या जबाबदाऱ्या सांभाळणे वेळेअभावी बऱ्याचदा शक्‍य होत नाही. तसेच गडबडीत महागड्या वस्तू खरेदी केल्या जातात. या सर्व बाबीचा विचार करून महापालिका कर्मचारी संघाने कॅंटीनची ही संकल्पना पुढे आणली आहे. पोलिस आणि सैन्यदलाच्या धर्तीवर हे कॅंटीन असेल. 
- संजय भोसले, अध्यक्ष महापालिका कर्मचारी संघ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The canteen will be for the municipal staff union