
कोल्हापूर ः कर्नाटक पोलिसांचा आडमुठेपणा आणि किणी टोलनाक्यावरील सहाय्यक पोलीस निरीक्षकांने वरिष्ठांचा आदेश असूनही दाखवलेली अनास्था यामुळे गुजरातमध्ये मृत झालेल्या कर्नाटकातील तरूणाच्या मृतदेहाची आज मोठी हेळसांड झाली. शेवटी या मृतदेहावर कराड येथील सामाजिक कार्यकर्त्यांच्या पुढाकारामुळे दफनविधीचे सोपस्कर पूर्ण करावे लागले.
कर्नाटकातील असिफ लतीफ सैयद (वय 54) हे कामानिमित्त भरुच (गुजरात) येथे गेले होते. तेथे 17 मेरोजी त्यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. पोस्टमार्टमचे सोपस्कार पूर्ण करून त्यांचा मृतदेह रुग्णवाहिकेतून कारवार (कर्नाटक) या त्यांच्या मूळ गावी नेण्यात येत होता. सोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे होती, पण लॉक डाऊनच्या नियमांचा बागुलबुवा करीत कर्नाटक पोलिसांनी त्यांचा मृतदेह घेऊन आलेल्या रुग्णवाहिकेला कोगनोळी टोलनाक्यावरून प्रवेश देण्यास नकार दिला.
त्यानंतर मुस्लिम बोर्डींगचे अध्यक्ष गणी आजरेकर यांच्या विनंतीवरून कोल्हापूरचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी माणुसकी दाखवत या मृतदेहावर कोल्हापुरच्या कब्रस्थानात दफनविधी करण्याची परवानगी दिली. बागल चौकात तशी तयारीही केली होती.
डॉ. देशमुख यांनी संवेदनशीलता दाखवत याबाबत बेळगावच्या पोलीस अधीक्षकांशी चर्चा करू, असे त्यांना सांगितले.
पण ही चर्चा सुरू असतानाच कर्नाटक पोलिसांनी रुग्णवाहिकेचा चालक मकबूल आणि सामाजिक कार्यकर्ता मुबारक यांना असिफ सैयद यांच्या मृतदेहासह पुन्हा महाराष्ट्र राज्याच्या सीमेवर आणून सोडले आणि पुन्हा गुजरातला जाण्याचे फर्मान सोडले. ही रुग्णवाहिका पुन्हा किणी टोल नाक्यावर आल्यानंतर या दोघांनी पुन्हा गणी आजरेकर यांच्याशी संपर्क साधला.
आजरेकर यांनी तेथील सहायक पोलिस निरीक्षकांशी चर्चेचा प्रयत्न केला. पण त्यांनी त्यांचा फोनच घेतला नाही. उलट मुबारक आणि मकबूल यांना रूग्णवाहिकेत बसवून पाठीमागे एक पोलीस वाहन पाठवून देत त्यांना पेठवडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीबाहेर जाण्यास भाग पाडले.
सांगली जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रातील एका पोलीस चौकीच्या दारात थांबून त्यांनी पुन्हा श्री. आजरेकर यांच्याशी संपर्क साधला. श्री. आजरेकर यांनी पुन्हा डॉ. देशमुख यांच्याशी चर्चा केली, श्री. देशमुख त्या सहायक पोलिस निरीक्षकाकडे विचारणा केली असता त्यांनी चक्क वरिष्ठांची दिशाभूल करून वेळ मारून नेली.
शेवटी श्री. आजरेकर यांनी कराडचे नगरसेवक फारूक पटवेकर याचा संपर्क साधून विनंती केली. श्री. पटवेगर "यह नेक काम रह गया आप के नसीब मे था' असे सांगून त्यांची समजूत काढली. उशीर होईल, तशी पार्थिवाची अवस्थाही बिकट होत जाण्याचा धोका होता. कोल्हापूरचे मौलाना मुबिन यांनी श्री. आजरेकर यांच्या विनंतीला मान देत कराडमध्ये पोचलेल्या असिफ सैयद यांच्या पार्थिवावर इस्लामिक रीती रिवाजाप्रमाणे कराडच्या कबरस्थानात दफनविधी केला. यासाठी कराडचे हाजी बरकत पटवेगार, साबीर मुल्ला, इरफान सैयद, झाकीर शेख यांचे सहकार्य लाभले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.