esakal | जयसिंगपुरला सीसीटीव्ही बंद; चोऱ्यांचे सत्र सुरू
sakal

बोलून बातमी शोधा

CCTV Closed In Jaysingpur Kolhapur Marathi News

जयसिंगपूर शहरातील चोऱ्यांच्या घटनांसह गुन्हेगारीवर अंकुश राखण्यासाठी बहुद्देशाने कार्यान्वित केलेला सीसीटीव्ही प्रकल्प सध्या कुचकामी ठरला आहे.

जयसिंगपुरला सीसीटीव्ही बंद; चोऱ्यांचे सत्र सुरू

sakal_logo
By
गणेश शिंदे

जयसिंगपूर : शहरातील चोऱ्यांच्या घटनांसह गुन्हेगारीवर अंकुश राखण्यासाठी बहुद्देशाने कार्यान्वित केलेला सीसीटीव्ही प्रकल्प सध्या कुचकामी ठरला आहे. शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असताना तब्बल 21 लाख रुपये लोकसहभाग देऊनही नागरिकांना चोरट्यांच्या दहशतीखाली रहावे लागत आहे. ऐन सुट्यांच्या काळात घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांमध्ये धाकधूक निर्माण झाली असून नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्याचे आव्हान जयसिंगपूर पोलिसांपुढे निर्माण झाले आहे. 

तत्कालीन उपविभागीय पोलिस अधिकारी कृष्णात पिंगळे यांच्या पुढाकाराने सेफ सिटी अंतर्गत शहरात 21 लाख रुपये खर्चाचा सीसीटीव्ही प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला. तत्कालीन जिल्हा पोलिसप्रमुख डॉ. अभिनव देशमुख यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्‌घाटन करण्यात आले. सुरुवातीच्या काळात शहरात येणारे मार्ग आणि शहरांतर्गत मोक्‍याच्या ठिकाणांवर या प्रकल्पाच्या माध्यमातून वॉच ठेवला. नंतरच्या काळात मात्र यातील बहुतांश कॅमेरे अतिवृष्टीच्या काळात बंद पडले. तब्बल दोन महिन्यांपासून हे कॅमेरे बंद आहेत. त्यांच्या दुरुस्तीकडे गांभीर्याने पाहिले गेलेले नाही. 

गेल्या काही दिवसापासून शहराच्या विविध भागांत चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. बंद घरांमध्ये चोरीच्या घटना आणि मोटारसायकल चोरीच्या वाढत्या घटना नागरिकांमध्ये भीती निर्माण करत आहेत. शहराला सीसीटीव्हीचे सुरक्षा कवच असताना चोरांचा माग पोलिसांकडून काढण्यात येत नसल्याबद्दल नाराजी आहे. शहरात येणारे सर्व मार्ग सीसीटीव्हीच्या कक्षेत आहेतच शिवाय शहरातील प्रत्येक चौक आणि गुन्हेगार शहराबाहेर विविध मार्गाने शहराबाहेर जाऊ शकतील अशा सर्व शक्‍यता गृहीत धरून हा प्रकल्प कार्यान्वित केला आहे. मात्र, बहुतांश कॅमेरेच बंद असल्याने चोरट्यांकडून अनेक घरे आणि गाड्यांना लक्ष केले जात आहे. 21 लाख रुपयांचा हा प्रकल्प सध्या तरी शहराच्यादृष्टीने बिनकामाचा ठरला आहे. 

चोरटे सुसाट 
सेफ सिटी अंतर्गत सीसीटीव्ही प्रकल्पातील बहुतांश कॅमेरे गेल्या दोन महिन्यांपासून बंद असतानाही ते दुरुस्तीसाठी प्रयत्न करण्यात आले नाहीत. शहरातील मुख्य मार्गावरुन हातोहात मोटारसायकली चोरीला जात आहेत. तर अपार्टमेंटमधील दोन-दोन फ्लॅट फोडण्याचे प्रकार घडले आहेत. 

डीवायएसपी कार्यालयाजवळच चोरी 
जयसिंगपूर उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयालगतच मोटारसायकल चोरीच्या घटना घडली. शिवाय शहरातील वाढत्या चोरीच्या घटनांचा माग काढण्यासाठी सीसीटीव्हीची मोठी मदत पोलिसांना झाली असती. मात्र, बंद कॅमेरे वेळेत सुरू केले नसल्याने तपास कामात अडथळे निर्माण झाले आहेत. 

मोबाईल चोरटेही "आउट ऑफ कव्हरेज...' 
शहरात विविध भागात आठवडा बाजार भरतो. यात मोबाईल चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडत आहेत. अनेक तक्रारी दाखल होतात, तर काही तक्रारदारांची बोळवण केली जाते. चोरीएवजी गहाळच्या तक्रारी घेतल्या जातात. क्राईम रेट कमी करण्याऐवजी तक्रारी दाखल करून त्याच्या मुळाशी जाऊन तपास केल्यास गुन्हेगारांना चाप बसणे कठीण नाही. मोबाईल चोरीतील गुन्हेगारही पोलिस तपासापासून "आउट ऑफ कव्हरेज एरिया' आहेत. 

चोरट्यांचा माग काढून जेरबंद करू
शहरातील बहुतांश सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत. अतिवृष्टीच्या काळात ते नादुरुस्त झाले आहेत. बंद कॅमेऱ्यांची माहिती घेऊन ते सुरू करण्याबाबत प्रयत्न सुरू आहेत. शहरातील वाढत्या चोरीच्या घटनांचा तपास सुरू आहे. लवकरच चोरट्यांचा माग काढून त्यांना जेरबंद करू. 
- दत्तात्रय बोरिगिड्डे, पोलिस निरीक्षक, जयसिंगपूर, पोलिस ठाणे 

संपादन - सचिन चराटी