इचलकरंजीत गुढीसाठीच्या काठ्या, साखर माळा विक्रीस पण... 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 मार्च 2020

शासनाने जमावबंदीचा आदेश लागू केल्याने गुढी पाडव्याच्या खरेदीला बाजारात प्रतिसाद कमी असला तरी सणाच्या आदल्या दिवशी खरेदीस नागरिकांचा उत्साह दिसेल असे विक्रेत्यांनी सागितले.

इचलकरंजी - कोरोनामुळे उद्‌भवलेल्या भीषण परिस्थितीतही साडेतीन मुहूर्तापैकी एक असणारा गुढी पाडव्याचा सण साजरा करण्यासाठी नागरिक सज्ज झाले आहेत. बुरूड समाजातील विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणात गुढी उभारणीसाठी लागणाऱ्या काठ्या व व्यापाऱ्यांनी साखर माळा विक्रीस ठेवल्या आहेत. तसेच अनेक ठिकाणी गुढीला भगवे झेंडे लावण्यात येतात. या पार्श्‍वभूमीवर अनेक विक्रेत्यांजवळ हे झेंडे विक्रीस आहेत. 

शासनाने जमावबंदीचा आदेश लागू केल्याने गुढी पाडव्याच्या खरेदीला बाजारात प्रतिसाद कमी असला तरी सणाच्या आदल्या दिवशी खरेदीस नागरिकांचा उत्साह दिसेल असे विक्रेत्यांनी सागितले. गुढी पाडवा हा नव वर्षाचा पहिला दिवस अतिशय पवित्र आणि महत्वाचा मानला जातो. नववर्षातील पहिल्याच सणाला कोरोनाची नजर लागली आहे. त्यामुळे यावर्षी व्यापाऱ्यांची व्यापार करायची परिस्थिती अवघड झाली आहे. काही व्यापाऱ्यांचे तर पोट याच व्यवसायावर आहे. कोरोनाच्या भितीमुळे त्यांची मनस्थिती अस्वस्थ झाली आहे. बाजारात साखर माळ उपलब्ध झाल्या आहेत. मिळेल त्या जागेत, गल्लोगल्ली फिरून साखर माळांची विक्री होताना दिसत आहे. या साखर माळा विविध रंगात 10 ते 30 रूपयांपर्यंत विक्रीस आहेत. 

कोरोनाचे सावट असताना गुढी पाडवा बुधवारी कसा साजरा करायचा याची चिंता लोकांना लागली आहे. नववर्षाचा पहिला सण असल्याने बाजारात नागरीक इतर जीवनावश्‍यक गोष्टींबरोबर साखर माळाही खरेदी करत आहेत. नागरिकांना गुढी पाडव्याच्या खरेदीला फक्त दोन दिवस मिळणार आहेत. त्यामुळे पाडव्याच्या आदल्या रात्रीपर्यंत लागणाऱ्या वस्तूंची खरेदीसाठी नागरिकांची धावपळ होणार आहे. 
एकीकडे सणाचे आकर्षण तर दुसरीकडे कोरोनाची धास्ती अशा विचित्र परिस्थितीत नागरिक व व्यावसायिक अडकले आहेत. शहरातील मोठे तळे परिसरात गुढी उभारणीसाठी लागणाऱ्या बांबूच्या काठ्या मोठ्या प्रमाणात विक्रीस आहेत. शहर व परिसरातील नागरिक येथून काठ्यांची खरेदी करतात. दरवर्षी मोठी उलाढाल यातून बुरूड समाज करत असतो. यंदा काठ्यांचा मोठा स्टॉक ठेवला असून गुढी पाडवा दोन दिवसांवर आला असताना नागरिकांची गर्दी दिसत नाही. यंदा काठ्यांचे दर 20 टक्‍क्‍यांनी वाढले असून 50 ते 200 रूपयापर्यंत उपलब्ध आहेत. कोरोनामुळे माल आहे पण गिऱ्हाईक नाही असे बांबू काठी विक्रेते अशोक कुकडे यांनी सांगितले. 
 
कोट्यावधीची उलाढाल थंडावणार 

गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर सोने, चांदी, विविध प्रकारची वाहने, टिव्ही, फ्रिज, मोबाईल आदी इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तू, कपडे, भांडी व अन्य विविध घरगुती वस्तूंची खरेदी केली जाते. या दिवशी शहरात कोट्यावधी रूपयांची उलाढाल होते. पण यंदा कोरोना व्हायरसमुळे जनजीवनच विस्कळीत होत आहे. बाजारपेठेला एक प्रकारची मरगळ आली आहे. त्यामुळे यंदा उलाढाल ठप्प होणार आहे.  
 
 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: celebration gudipadwa ichalkaranji