कामासाठी बोलावणे आल्याने बिऱ्हाड गावांत ठेवून चाकरमानी मुंबापुरीला रवाना

अजित माद्याळे
Thursday, 10 September 2020

शासनाने परवानगी दिल्यानंतर गावाकडे बिऱ्हाडासह परतलेले चाकरमानी आता बोलावणे येवू लागल्याने हळूहळू पुन्हा मुंबापुरीत दाखल होत आहेत.

गडहिंग्लज : शासनाने परवानगी दिल्यानंतर गावाकडे बिऱ्हाडासह परतलेले चाकरमानी आता बोलावणे येवू लागल्याने हळूहळू पुन्हा मुंबापुरीत दाखल होत आहेत. परंतु, जाताना आपले बिऱ्हाड मात्र गावातच ठेवून जात आहेत. वारंवार कामावर बोलावणे येवू लागल्याने पोटाची खळगी भरण्यासाठी हे चाकरमानी कोरोनाला विसरून पुन्हा राजधानीकडे रवाना होत असतानाचे चित्र पहायला मिळत आहे. 

मार्चमध्ये राज्यात कोरोना संसर्ग सुरू झाला. त्यानंतर तातडीने शासनाने लॉकडाऊन जाहीर केले. या पार्श्‍वभूमीवर गडहिंग्लज, आजरा व चंदगड तालुक्‍यातील 30 हजाराहून अधिक चाकरमानी गावी परतले. पाच महिन्यांपासून हे चाकरमानी गावाकडे आहेत. काही चाकरमान्यांनी मुंबईचे नाव न काढता गावातच स्थिरस्थावर होण्याचा विचार करून काही व्यवसाय तर काहींनी शेतीत लक्ष घातले आहे. काही चाकरमान्यांनी शेती कसायलाही घेतली. पुन्हा मुंबई नाही, या इराद्यानेच चाकरमान्यांनी गावीच राहण्याचा निर्णय घेतला. 

दरम्यान, अनलॉक झाल्यानंतर कंपन्या, उद्योगधंदे, बाजारपेठ हळूहळू पूर्वपदावर येवू लागले. यामुळे चाकरमान्यांना वारंवार बोलावणे येवू लागले. सुरूवातीला कोरोना भितीने आई-वडील व कुटूंबाकडून चाकरमान्यांना पाठविण्यास नकार मिळू लागला. सध्या मुंबईतील कोरोना संसर्गही कमी आल्याचे चित्र आहे. त्यामुळे चांगले वेतन आणि राहण्याची व्यवस्था असलेले चाकरमानी मुंबईत दाखल होत आहेत. परंतु, शाळा सुट्टी असल्याने आणि कोरोनाच्या भितीने आपले कुटूंब गावीच ठेवले आहे.

भविष्यात आणखीन कोणती परिस्थिती उद्‌भवेल या चिंतेनेही बहुतांशी चाकरमानी आपले बिऱ्हाड नेलेले नाही. काही चाकरमानी केवळ आपल्या पत्नीला सोबत घेवून गेले आहेत. लहान मुले गावीच ठेवले आहेत. आता ई-पास रद्द केला आहे. त्याचाही लाभ उठवत अनेक चाकरमानी मुंबापुरीत दाखल होत आहेत. मुळात कामधंदा नसल्याने आर्थिक आवक थांबली आहे. गावाकडेही म्हणावे तसे काम मिळत नसल्याने बहुतांश चाकरमानी मुंबई गाठली आहे.

सध्या एसटी, ट्रॅव्हल्स ही सेवाही नियमित सुरू झाली आहे. त्याचाही परिणाम मुंबईला जाणाऱ्यांच्या संख्येवर होत असल्याचे चित्र आहे. कामाची परिस्थिती पाहून स्थिरस्थावर होण्यात अडचण नसल्याचे लक्षात आल्यानंतर बिऱ्हाड नेण्याचा काहींचा मनोदय आहे. शाळा सुट्टी असल्याने पाल्यांच्या शैक्षणिक प्रश्‍नही मिटला आहे. प्रत्यक्षात शैक्षणिक सत्र सुरू झाल्यानंतर बिऱ्हाडाला पुन्हा मुंबईला नेण्याचा विचार चाकरमान्यांचा आहे. 

काम करून पुन्हा गावी 
मुंबईत काम करणारे या भागातील तीस हजाराहून अधिक चाकरमानी आहेत. यातील अनेक चाकरमान्यांचे काम अंगावरचे आहे. मागणीचा कॉल आल्यानंतर सेवा देण्याचे काम करणारे बहुसंख्य कामगार आहेत. आता निर्बंध हटल्याने आठ-पंधरा दिवस जावून मुंबईत काम करून पुन्हा गावी येणाऱ्यांचीही संख्या नोंद घेण्यासारखी आहे. 

मुलांना गावीच ठेवले
कंपनीतून कामावर हजर होण्यासाठी वारंवार कॉल येत होता. मुंबईत आमची स्वतंत्र खोली आहे. मला तर जायलाच हवे होते. परंतु, कोरोनामुळे कुटूंबाला न्यावे की नको, या संभ्रमात होतो. अखेर मुलांना गावीच ठेवून पती-पत्नी मुंबईला आलो आहोत. सारे सुरळीत झाल्यानंतर पुन्हा मुंबईत स्थिर होवू. 
- संतोष पाटील, नरेवाडी

 

संपादन - सचिन चराटी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chakarmani Left For Mumbai Kolhapur Marathi News