साखर हंगामासमोर हे आहे आव्हान ? जाणून घ्या काय ते ?

प्रतिनिधी
शनिवार, 4 जुलै 2020

श्री. निकम यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांचे स्वागत व यावर्षीच्या हंगामाचा आढावा घेण्यासाठी ही बैठक बोलवण्यात आली.

कोल्हापूर ः राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने यावर्षीच्या साखर हंगामासमोर तोडणी-ओढणी मजूर उपलब्धतेचे आव्हान रहाणार असल्याचे मत आज प्रादेशिक साखर सहसंचालक एन. आर. निकम यांच्या उपस्थितीत झालेल्या कारखाना प्रतिनिधींच्या बैठकीत व्यक्त करण्यात आले. 
श्री. निकम यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांचे स्वागत व यावर्षीच्या हंगामाचा आढावा घेण्यासाठी ही बैठक बोलवण्यात आली. हंगाम ऑक्‍टोबरपासून सुरू करण्याचे आदेश असले तरी प्रत्यक्षा नोव्हेंबरलाच उसाची मोळी गव्हाणीत पडेल, असे चित्र आहे. त्यात कोरोनामुळे तोडणी मजूर उपलब्ध होणे अवघड असल्याचे अनेक कारखानदारांनी बैठकीत सांगितले. 
जिल्ह्यात बीड, उस्मानाबाद, नाशिक, चाळीसगाव, मालेगाव, माजलगाव आदी भागातून तोडणी मजूर येतात. या सर्वच जिल्ह्यांत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढवलेला आहे. त्यामुळे संबंधित जिल्ह्यातून बाहेर जाण्यासाठी पास मिळत नाहीत. त्यामुळे अजून काही कारखान्यांचे तोडणी-ओढणीचे करारही झालेले नाहीत. जिल्ह्यात बाहेरून येणाऱ्यांचे 14 दिवस अलगीकरण केले जाते, मग अशा परिस्थितीत कर्मचारी कसे उपलब्ध करायचे, हा मोठा प्रश्‍न असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. 
कमी गाळप क्षमतेच्या कारखान्यात किमान तीन हजार कर्मचारी बाहेरच्या जिल्ह्यातून येतात. मोठ्या गाळप क्षमतेच्या कारखान्यात ही संख्याही मोठी असते. अशा परिस्थितीत यावर मार्ग काढण्याची विनंती कारखानदारांनी केली. त्यावर सर्व कारखानदारांच्यावतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्याचे या बैठकीत ठरले. यावेळी श्री. निकम यांचे कारखानदारांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. श्री. निकम यांनी कारखानानिहाय उसाची उपलब्धता, गेल्या हंगामातील थकीत एफआरपी, साखरेचा शिल्लक साठा, निर्यात साखर आदींचा आढावा घेतला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Is this a challenge ahead of the sugar season? Know what it is?