हिम्मत असेल तर स्वतंत्र निवडणूक लढा ; चंद्रकांत पाटील यांचे कॉंग्रेस-राष्ट्रवादीला आव्हान

ओंकार धर्माधिकारी
सोमवार, 13 जुलै 2020

शिवसेनेना सोबत नसती तर भाजपच्या 40-50 जागाही आल्या नसत्या अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली होती.

कोल्हापूर - विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने 105 जागा जिंकल्या. तर कॉंग्रेस-राष्ट्रवादी एकत्र लढून त्यांच्या 98 जागा आल्या. यावरून भाजपची ताकद लक्षात येते. मी दोन्ही कॉंग्रेससह शिवसेनेला खुले आव्हान देतो की त्यांनी पुढची विधानसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढवून दाखवावी. मग कोणाची ताकद किती हे समजेल. असे आव्हान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिले. 

शिवसेनेना सोबत नसती तर भाजपच्या 40-50 जागाही आल्या नसत्या अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली होती. त्याला चंद्रकांत पाटील यांनी त्याला प्रत्युत्तर दिले. यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले,"2014 विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेना स्वतंत्र लढले होते. त्यावेळी भाजपचे 122 उमेदवार निवडून आले. त्यावेळी राष्ट्रवादीच्या 41 तर कॉंग्रेसच्या 42 जागा आल्या होत्या. युती सरकारच्या पाच वर्षाचा कारभार असा होता की 2019 च्या विधानसभेला दोन्ही कॉंग्रेसला नाईलाजाने एकत्र यावे लागले. या निवडणुकीतही आम्ही राज्यात सर्वाधिक म्हणजे 1 कोटी 40 लाख मते घेतली. तर शिवसेनेला 94 लाख मते मिळाली. राष्ट्रवादीला 92 लाख तर कॉंग्रेसला 82 लाख मते मिळाली. यावरून राज्यातील भाजपची ताकद दिसून येते. आम्हाला सत्तेचा माज आला आहे, असे महाराष्ट्रातील जनतेला वाटले नाही. म्हणूनच आम्हाला मतदारांनी पहिल्या क्रमांकाची मते दिली. मी दोन्ही कॉंग्रेससह शिवसेनेला अव्हान देतो की त्यांनी पुढची निवडणूक प्रामाणिकपणे स्वतंत्र लढवून दाखवावी. म्हणजे राज्यात कोणाची ताकद किती आहे ते जोखता येईल.' राज्य सरकारबद्दल पाटील म्हणाले,"सरकारच्या कारभाराबद्दल आता जनताच बोलू लागली आहे. संजय राऊत सरकार पाडूनच दाखवा असे आव्हान करत आहेत. महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी आम्ही काहीही करणार नाही. आम्ही अधिवेशनाची वाट पाहतो आहेत. जेथे सरकार चुकेल तेथे बोट ठेवणे, आंदोलन करणे हे विरोधी पक्षाचे कामच आहे.' 

हे पण वाचा - Video- छत्रपतींच्या पराक्रमाचे साक्षिदार ; पावनखिंड फरसबंदीचा मार्ग अन्‌ कासारी नदीची घळ...

 

"त्या' विषयी फडणवीसच बोलतील 
विधानसभा निवडणुकीनंतर भाजपने राष्ट्रवादीकडे पाठिंब्याची मागणी केली होती. असा खुलासा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला होता. याबद्दल चंद्रकांत पाटील यांनी बोलायचे टाळले. या बद्दल देवेंद्र फडणवीस लवकरच बोलतील. असे त्यांनी सांगितले. 

संपादन - धनाजी सुर्वे 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: chandrakant patil challenge to maharashtra government