esakal | सर्वोच्च न्यायालयात सरकारने नांगीच टाकली ; चंद्रकांत पाटील यांची टीका. 
sakal

बोलून बातमी शोधा

chandrakant patil criticism on maharashtra government

सर्वोच्च न्यायालयाने ठणकावून सांगितले होते की, उच्च न्यायालयात सुनावणीसाठी किती दिवस लागले हे महत्त्वाचे नाही. तीन दिवसात सुनावणी होऊन मराठा आरक्षणाचा निर्णय देणार.

सर्वोच्च न्यायालयात सरकारने नांगीच टाकली ; चंद्रकांत पाटील यांची टीका. 

sakal_logo
By
ओंकार धर्माधिकारी

कोल्हापूर - मराठा आरक्षणाप्रश्‍नी सरकारने अद्याप आम्हाला पुरेशी माहिती दिलेली नाही. म्हणून आम्हाला मुदत वाढ द्या, अशी मागणी सरकारी वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात केली. एवढेच नव्हे तर सर्वोच्च न्यायालायाने त्यांना या कालावधीत तुम्हाला मराठा आरक्षणातून कोणतीच भरती करता येणार नाही. असे सांगितल्यावर युक्तीवाद करण्याऐवजी त्यांनी ते मान्य केले. सरकारने सर्वोच्च न्यायालयात नांगी टाकली असून त्याचा फटका मराठा तरूण, तरुणींना बसणार आहे. अशी टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. आज पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

चंद्रकांत पाटील म्हणाले, " सर्वोच्च न्यायालयाने ठणकावून सांगितले होते की, उच्च न्यायालयात सुनावणीसाठी किती दिवस लागले हे महत्त्वाचे नाही. तीन दिवसात सुनावणी होऊन मराठा आरक्षणाचा निर्णय देणार. त्यामुळे मराठा तरुण तरूणी डोळ्यात प्राण आणून आजच्या निर्णयाची वाट पहात होते. मात्र आम्हाला पुरेशी माहिती सरकारने दिली नाही आणि व्हर्च्युअल सुनावणी शक्‍य नसल्याने आम्हाला मुदत वाढवून द्या असे सरकारी वकिलांनी सर्वोच्च न्यायालयासमोर सांगितले. सरकारी वकिल मुकुल रोहतगे यांनी असे म्हणणे धक्कादायक आहे. मग सरकारने सगळी तयारी झाली आहे अशी घोषणा केली, त्याला काय अर्थ आहे. ही सुनावणी म्हणजे मराठा समाजातील 32 टक्के मुला, मुलींच्या जीवनमरणाचा प्रश्‍न आहे. त्याकडे गांभिर्याने पहावे. वकीलांच्या या मागणीवर सर्वोच्च न्यायालय असे म्हणाले की, मराठा आरक्षणाची पुढील सुनावणी 1 सप्टेंबरला घेऊ . तोपर्यंत तुम्ही सरकारकडून सर्व माहिती द्या. मात्र तोपर्यंत तुम्हाला मराठा समाजातील तरुण, तरुणींची कोण्यात्याही पदासाठी या आरक्षणातून भरती करता येणार नाही. याला विरोध करण्यासठी सरकारी वकिलांनी युक्तीवाद करणे आवश्‍यक होते मात्र सरकारने नांगी टाकली. सरकारी वकिल म्हणाले, कोरोनामुळे आम्ही 4 मे पासून भरती प्रक्रियेला भरती करणार नाही असा निर्णय घेतला आहे. असे सांगून त्यांची याबाबतचा शासकीय आदेश सर्वोच्च न्यायालयात दिला. याचा अर्थ असा होतो की आता 1 सप्टेबर पर्यंत कोणतीही भरती करायची म्हटली तर त्यामध्ये मराठा आरक्षणातून भरती होणार नाही. एवढेच नव्हे तर जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निकाल येणार नाही तोपर्यंत मराठा आरक्षणातून भरती होणार नाही. म्हणूनच हा चिंतेचा विषय आहे.

हे पण वाचा - मुख्यमंत्र्यांच्या वाढदिनी हा तर भाजपचा अपशकुन

त्यांचा सल्ला आपुलकीतूनच 
ऍड.प्रकाश आंबेडकर यांनी चंद्रकांत पाटील यांना विपष्यनेला जाण्याचा सल्ला दिला होता. या बाबत चंद्रकांत पाटील म्हणाले, प्रकाश आंबेडकर हे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत. त्यांच्याबद्दल मला आदर आहे. त्यांनी दिलेला सल्ला हा आपुलकीतूनच असणार मी नक्की विचार करेन. 

हिंदुत्त्व नव्हे खुर्ची महत्त्वाची 
राममंदिर हा जगभरातील हिंदूच्या आस्थेचा विषय आहे. शिवसेनेने याबाबत काहीही न करता यात आपला मोठा वाटा असल्याचा दावा केला. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर निवडक जणांना बोलावण्यात आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही निमंत्रण देण्यात आले आहे. परंतू अल्पसंख्यांकाचे लांगूनचालन करणाऱ्या आणि मुस्लीम व्होट बॅंकेची काळजी करणाऱ्या राष्ट्रवादीसोबत ते सत्ता राबवत आहेत. त्यामुळे अयोध्येला जायचे की नाही असा पेच त्यांच्यासमोर आहे. त्यांना हिंदूत्वापेक्षा खूर्ची महत्वाची आहे. 

संपादन - धनाजी सुर्वे