सहा जणांनी रचला कट : वर्चस्व वादातूनच 'तो' हल्ला , तरूण गंभीर जखमी

सकाळ वृत्तसेवा
Monday, 14 September 2020

संभाजीनगरजवळ पाठलाग करून मारहाण; पाच ते सहा जणांचे कृत्य

कोल्हापूर : संभाजीनगर स्टॅंडजवळील विजयनगरात तरुणावर पाच ते सहा जणांनी सशस्त्र हल्ला केला. त्यात तरुण गंभीर जखमी झाला. अमित उर्फ सोन्या हिंदूराव पाटील (वय २६, रा. शाहू सैनिक चौक परिसर जुना वाशीनाका) असे जखमी तरुणाचे नाव आहे. गजबजलेल्या रस्त्यावर रात्री साडेआठच्या घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात तणाव निर्माण झाला. घटनास्थळी जुना राजवाडा पोलिसांनी धाव घेतली. नातेवाईकांच्या मदतीने जखमी अमितला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध सुरू केला असून, याला वर्चस्ववादाची किनार असल्याची चर्चा परिसरात सुरू होती. 

याबाबत घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली माहिती, अमित ऊर्फ सोन्या पाटील जुना वाशीनाका येथे राहतो. देवकर पाणंद चौकात त्याचे चायनीज सेंटर आहे. वर्षाभरापूर्वीच त्याचे लग्न झाले आहे. त्याचा मित्र परिवार मोठा आहे. सेंटर बंद करून तो रात्री आठच्या सुमारास काळ्या रंगाच्या मोपेडवरून 
विजयनगर मार्गे घरी जात होता. दरम्यान, पाच ते सहा जणांनी एका रिक्षातून त्याचा पाठलाग केला. त्याच्या मोपेडला विजयनगर येथे रिक्षाने धडक दिली. त्यात अमित हा खाली पडला, त्यावेळी रिक्षात बसलेल्या पाच ते सहा हल्लेखोरांनी तलवारीसह धारधार शस्त्राने त्याच्यावर हल्ला चढविला. हा प्रकार पाहून परिसरातील नागरिकांनी ओरडा केला. तसे हल्लेखोर पसार झाले.

हेही वाचा-कोरोना योद्ध्यांना बळ देऊया! -

हल्ल्यात अमित यांच्या डोक्‍याला, मानेला व पाठीला गंभीर दुखापत झाली. नागरिकांनी याची माहिती पोलिसांना दिली. जुना राजवाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. नातेवाईकांच्या मदतीने जखमी अमितला रुग्णालयात हलविण्यात आले.  रुग्णालयाबाहेर नातेवाईक व मित्रपरिवाराने मोठी गर्दी केली होती. याबाबत संशयित हल्लेखोरांवर गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत जुना राजवाडा पोलिस ठाण्यात सुरू होते. 

हेही वाचा- ती आली जनू आमदारकी घेऊनच ; चार चाकीविषयी मुश्रीफांची भावना

 

शस्त्राची मूठ सापडली...
घटनास्थळी मोपेड कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ पडली होती. त्या शेजारी रक्ताचे थारोळे साचले होते. या ठिकाणचा पंचनामा पोलिसांनी केला. त्यात त्यांना तलवारी सारख्या शस्त्राची मूठ हाती लागली.

पोलिस बंदोबस्त...
जुना वाशीनाका परिसरात घडलेल्या या प्रकारामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तसेच जुना राजवाडा व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही तपासले जात होते.

वर्चस्ववादाची किनार 
चार दिवसांपूर्वी जुना वाशीनाका चौकात एकाचा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. यावेळी फटाकेही वाजविण्यात आले होते. यावरून तरुणांच्यात वादासह किरकोळ भांडणही झाले होते. याच रागातून भागात वर्चस्व निर्माण करण्याच्या हेतूने हल्लेखोरांनी हे कृत्य केले असावे, अशी चर्चा सुरू होती. त्या अनुषंगानेही पोलिसांनी तपास सुरू केला आहे. 

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chased and beaten near Sambhaji Nagar In Vijayanagar five to six armed men attack the youth