शिवरायांची कीर्ती सांगे, आईच माझा गुरू...! 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 फेब्रुवारी 2020

राष्ट्रमाता जिजाऊसाहेब यांचे संस्कार आणि प्रेरणा यामुळेच छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्य स्थापन करू शकले. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच या देशाला शिवछत्रपतींसारखा युगपुरुष लाभला.

कोल्हापूर ः राष्ट्रमाता जिजाऊसाहेब यांचे संस्कार आणि प्रेरणा यामुळेच छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्य स्थापन करू शकले. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच या देशाला शिवछत्रपतींसारखा युगपुरुष लाभला. त्यामुळे या दोघांचेही महात्म्य अधोरेखित करणारे तैलचित्र शिवाजी विद्यापीठाला प्रदान करताना होणारा आनंद अवर्णनीय आहे, अशी भावना भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळिक यांनी व्यक्त केली.

मराठा महासंघ आणि शिवभक्त लोकआंदोलन समितीच्या संयुक्त विद्यमाने शिवाजी विद्यापीठाच्या राजमाता जिजाऊसाहेब बहुउद्देशीय सभागृहात (दीक्षान्त सभागृह) लावण्यासाठी ही कलाकृती कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्याकडे सुपुर्द केली. त्यावेळी ते बोलत होते. 
इतिहास संशोधक इंद्रजित सावंत म्हणाले, ""विद्यापीठाचे पहिले कुलगुरू डॉ. आप्पासाहेब पवार यांनी छत्रपतींचा मूळ इतिहास सांगणारी विविध कागदपत्रे जगासमोर आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळे ही चित्रकृती शिवाजी विद्यापीठात असण्याला एक वेगळे औचित्य व महत्त्व आहे.''

कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी आभार व्यक्त करताना तैलचित्राला राजमाता जिजाऊसाहेब बहुउद्देशीय सभागृहात लावून योग्य तो सन्मान केला जाईल, अशी ग्वाही दिली. या वेळी प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, वित्त व लेखाधिकारी व्ही. टी. पाटील, डॉ. रत्नाकर पंडित, डॉ. प्रल्हाद माने, डॉ. गिरीष कुलकर्णी यांच्यासह इतिहास संशोधक गणेश नेर्लेकर-देसाई, शशिकांत पाटील, शंकरराव शेळके, शैलजा भोसले, प्रकाश पाटील, प्रताप नाईक, इंद्रजीत माने, अवधूत पाटील, शरद साळुंखे, कृष्णाजी हरगुडे, गुरुदास जाधव आदी उपस्थित होते. 

भव्य तैलचित्र
"शिवरायांची कीर्ती सांगे, आईच माझा गुरू' या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित असणारी ही कलाकृती आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ चित्रकार जे. बी. सुतार यांच्याकडून श्री. मुळिक व इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी तयार करून घेतली आहे. पंधरा वर्षांपूर्वी रेखाटलेल्या या तैलचित्राचा आकार आठ बाय दहा फूट इतका भव्य आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chatrapatti Shivaji Maharaj Poster presentatin in Shivaji University