लाॅकडाऊनमध्ये चिअर्स गर्ल्सचा ठुमका: आयोजकाला घेतले ताब्यात

राजू पाटील
Friday, 11 December 2020

कोरोनाच्या काळात एकीकडे जमावबंदी असताना घडलेला हा प्रकार कायदा मोडणारा आहे.

राशिवडे बुद्रुक (कोल्हापूर) : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चौकार-षटकार मारल्यानंतर आनंदोत्सव साजरा करण्यासाठी चिअर्स गर्ल्स हा फंडा अलीकडे रुजलाय. त्याच धर्तीवर राधानगरी तालुक्यातील अतिदुर्गम असलेल्या गवशी पैकी पाटीलवाडी या छोट्याश्या वाडीत हाच प्रकार घडला आहे. रघुनाथ पाटील यांच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त घेतलेल्या क्रिकेट स्पर्धेत चक्क चिअरगर्ल नाचवल्या. याची संबंध जिल्ह्यामध्ये मोठी चर्चा असून या प्रकरणी रघुनाथ पाटील यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अन्य संशयित लवकरच ताब्यात घेतली जातील.

  राधानगरी तालुक्‍यातील अत्यंत दुर्गम असलेल्या म्हासुरली परिसरातील गवशी या गावात पाटीलवाडी अगदी पाच ते सहाशे लोकवस्तीचीे वाडी. या वाडीतील रघुनाथ पाटील या व्यक्तीच्या मुलग्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी क्रिकेट स्पर्धा भरवल्या होत्या आणि हा आनंद द्विगुणीत करण्यासाठी चक्क बाहेरून नृत्यांगना चिअर्स गर्ल म्हणून आणल्या. त्यांच्यासोबत उपस्थित असलेले युवक धिंगाणा घालत होते. कोरोनाच्या काळात एकीकडे जमावबंदी असताना घडलेला हा प्रकार कायदा मोडणारा ठरल्याने त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे. दुसरीकडे तालुक्यातून अनेक लोकांनी जाणकारांनी प्रतिक्रिया दिल्या. कोल्हापूर जिल्ह्यात आणि शाहूंच्या राधानगरी तालुक्यात अर्धनग्न नृत्यांगना म्हणून उघड्यावर नाचणे हा प्रकार निंदनीय असल्याचे मत सकाळ'कडे नोंदवले आहे.

हेही वाचा- आई, आजीची वेडी माया, 24 वर्षांपासून अंथरुणाला खिळलेल्या स्वरालीची करतात सेवा -

 एकीकडे कोरोनामुळे मोठे कार्यक्रम घेण्यास बंदी असताना आणि डॉल्बी, डीजे ला परवानगी नसताना धिंगाणे घालण्याला परवानगी दिली कुणी, कुणाचा वरदहस्त आहे. याची चौकशी करण्याचे आव्हान पोलिसांपुढे येऊन ठाकले आहे.

संपादन- अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cheers Girls funda crime case rashiwade kolhapur