
युवराज संभाजीराजे छत्रपती महाविद्यालयीन जीवनात कायनेटिकवर स्वार झाले. गाडीला फॅन्सी नंबर घेण्याचा विचार त्यांच्या डोक्यात शिरला नाही. अंकशास्त्राला नकारघंटा वाजवून गाडीवर 4000 आकडा रंगला.
कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याचा 4000 नंबर झाला सुपरहिट
कोल्हापूर : कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याला मोठा मान-सन्मान. गाड्यांचा शौक घराण्याला नाही. काळाप्रमाणे बदलताना न्यू पॅलेसच्या आवारात गाड्यांची चाके धावली. छत्रपती शहाजी महाराज यांच्या दिमतीला मर्सिडीज आली. छत्रपती प्रमिलाराजे यांनी इंडियन फियाटची खरेदी केली. इंपोर्टेडपेक्षा देशी बनावटीच्या गाडीची प्रमिलाराजेंची निवड अनेकांच्या भुवया उंचावणारी ठरली. जर्मन मेबॅक मोटारीचा क्रमांक कोल्हापूर-1. तत्कालीन नंबर देण्याची ही पद्धत होती. त्यातून तो गाडीवर झळकला. छत्रपती घराण्याला तो नंतरच्या कळात खरेदी केलेल्या गाड्यांवर झळकवणे अवघड नव्हते.
युवराज संभाजीराजे छत्रपती महाविद्यालयीन जीवनात कायनेटिकवर स्वार झाले. गाडीला फॅन्सी नंबर घेण्याचा विचार त्यांच्या डोक्यात शिरला नाही. अंकशास्त्राला नकारघंटा वाजवून गाडीवर 4000 आकडा रंगला. अंकांची वैशिष्ट्यपूर्ण बेरीज यावी, असं लॉजिक त्यामागे मुळीच नव्हतं. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुरोगामी विचारांच प्रतिबिंब त्यातून व्यक्त झालं. पुढे संभाजीराजे यांच्या झेनच्या नंबर प्लेटवर तोच नंबर झळकला.
श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी मर्सिडीजची खरेदी केली. त्या गाडीवरच्या नंबर प्लेटवरही 4000 हाच आकडा उमटला. महाराजांनी शहरातील छोट्या-मोठ्या कार्यक्रमांना या गाडीतून हजेरी लावण्यास सुरुवात केली. नागरिकांच्या डोक्यात हा नंबर फिट्ट बसला. छत्रपती शाहू स्टेडियमवरील फुटबॉल सामने पाहण्यास ते आजही याच नंबरच्या गाडीतून उपस्थित राहतात. तोच नंबर महाराजकुमार मालोजीराजे यांच्या गाडीवर फॉरवर्ड झालाय. विधानसभेचे मैदान मारल्यानंतर मालोजीराजेंची शहरासह जिल्ह्यातील विविध कार्यक्रमांना उपस्थिती अनिवार्य झाली. गाडीच्या नंबरावरुन ते कार्यक्रमाच्या ठिकाणी पोचल्याची खबर पंचक्रोशीत पसरण्याचे ते दिवस होते. तोच पायंडा आजही कायम आहे. शिव-शाहू यात्रेच्या निमित्ताने संभाजीराजे यांनी महाराष्ट्र पिंजून काढला. प्रत्येक जिल्ह्यातील संपर्कात गाडीचा नंबर कार्यकर्त्यांच्या चर्चेचा विषय राहिला. नंबर देण्यामागची चौकशी त्यांच्याकडे झाली.
रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी संभाजीराजे दरवर्षी हजेरी लावतात. गडपायथ्याच्या पाचाड, हिरकणीवाडी, छत्री निजामपूर, शिंदेकोंड, पुनाडेवाडी, नेवाळेवाडी, पोटलेवाडीतील ग्रामस्थांच्या स्मरणात राजेंच्या गाडीचा नंबर पक्का बसलाय. ते इतका सुपरहिट झालाय की, महाराष्ट्रातील शिवभक्तांना राजेंची गाडी त्यांच्या जिल्ह्यात आल्याची माहिती चुटकीसरशी कळते. कार्यकर्तेही नंबर प्लेटसाठी याच आकड्यावर शिक्कामोर्तब करत आहेत.
फॅन्सी नंबर घेण्याचा विचार कधीच केला नाही. त्यामागे अंकशास्त्रीय आकडेमोड असावी, असेही आम्हाला कधी वाटले नाही. आमच्या गाड्यांचा 4000 हा नंबर ब्रॅंड झालाय. छत्रपती घराण्यामुळे या आकड्याला वेगळी ओळख मिळाली आहे.
- संभाजीराजे छत्रपती, खासदार
Web Title: Chhatrapati Gharane Kolhapur Became 4000 Number Super Hit
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..