Video : 'एक रुपयाचा कडीपत्ता सरकार झाले बेपत्ता'' : कोल्हापुरात एक हजारांहून अधिक महिलांचा मोर्चा

संदीप खांडेकर
Tuesday, 22 September 2020

ताराराणी चौकातून मोर्चास सुरवात झाली. दाभोळकर कॉर्नर, रेल्वे स्टेशन मार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आला.

कोल्हापूर : मायक्रो फायनान्सचे महिलांचे कर्ज माफ झाले पाहिजे, या प्रमुख व अन्य मागण्यांसाठी छत्रपती शासन महिला संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर आज मोर्चा काढण्यात आला. भर पावसात एक हजारांहून अधिक महिलांनी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरील रस्त्यावर ठिय्या मारत मात्र सोशल डिस्टन्सचा फज्जा उडवला. "एक रूपयाचा कडीपत्ता सरकार झालंय बेपत्ता,' "आम्ही मागतो हक्काचे नाही कोणाच्या बापाचे,' "फायनान्स कर्जमाफी झालीच पाहिजे,' या घोषणा देत महिलांनी परिसर दणाणून सोडला. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. 

मायक्रो फायनान्समुळे महिलांना त्रास होत असून, फायनान्सचे कर्मचारी बेकायदेशीरपणे व्यवसहार करत असल्याची संघटनेची तक्रार आहे. त्याची दखल शासनाने घेतलेली नाही. महापूर व कोरोनामुळे समाजातील सर्व घटकांना फटका बसला आहे. शेजमजूर, कामगार, हमाल, घर कामगार, माथाडी कामगार यांचे हाल झाले आहेत. वसुलीला येणारे प्रतिनिधी अश्‍लिल बोलणे, धमकावणे, शिवीगाळ करण्यासह त्रास देत असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. त्या पार्श्‍वभूमीवर मोर्चाचे आयोजन केले होते.

हेही वाचा-गावभर कोरोनाचा प्रसाद : क्वारंटाईन व्यक्तीवर शिरोली ग्रामपंचायतीची करडी नजर -

ताराराणी चौकातून मोर्चास सुरवात झाली. दाभोळकर कॉर्नर, रेल्वे स्टेशन मार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आला. "सरकार तुपाशी जनता उपाशी,' "आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर खुर्च्या खाली करा,' "कर्जमाफी झालीच पाहिजे,' या आशयाचे फलक महिलांच्या हातात होते. शिरोळ, हातकणंगले, शाहूवाडी, पन्हाळा, चंदगड, आजरा, राधानगरी तालुक्‍यातून महिला मोर्चात सहभागी झाल्या. रस्त्यावरच त्यांनी ठाण मांडून घोषणाबाजी केली. पोलिसांनी शिष्टमंडळाला जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेण्याचे आवाहन केले.

हेही वाचा- कोल्हापुरात पावसाची पुन्हा एंट्री : दोन दिवस रिपरिप सुरुच राहणार -

सुरवातीला त्यांच्याकडून नकार आला. पोलिसांनी पुन्हा समजून काढल्याने शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी देसाई यांची भेट घेऊन चर्चा केली. कर्जमाफीचा प्रस्ताव शासनाला पाठविण्याचा व बेकायदेशीरपणे काम करणाऱ्यांवर मायक्रो फायनान्स संस्थांवर बॅन आणण्याचे आश्‍वासन देण्यात आले. त्यासह महिलांशी उद्धट वर्तन करणाऱ्यांवर कारवाई करण्याची ग्वाही देण्यात आली. 
शिष्टमंडळात महिला आघाडी प्रमुख दिव्या मगदूम, स्वाती माजगावे, बिस्मिला दानवाडे, मनीषा कुंभार, राणी कोळी, ए. ए. सनदी, अमोल कुंभार, समीर दानवाडे यांचा मोर्चात सहभाग होता. 

कोरोनाचे संकट पाहता महिलांनी सुरक्षित राहून आंदोलन करावे, ही पोलिस प्रशासनाची भूमिका होती. पोलिस यंत्रणा वारंवार त्यांना सोशल डिस्टन्स पाळण्याचे व तोंडावर मास्क लावण्यात आवाहन त्यांना करत होते. महिलांनी मात्र सोशल डिस्टन्स पाळण्याकडे दुर्लक्ष केले. पाऊस सुरू झाल्यानंतर काही वयोवृद्ध महिलांसह अन्य महिला छोट्या मुलांसह रस्त्याकडेला उभ्या राहिल्या. लहान मुले भिजू नयेत, असा त्यांचा उद्देश होता. प्रमुख कार्यकर्त्या महिलांनी त्यांनाही रस्त्यावर बसण्यास भाग पाडले. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chhatrapati Shasan Mahila Sanghatana staged a agitation at the District Collector Office kolhapur