गर्दी टाळा, ऑनलाईन चॉईस, बुक करा बाप्पा...! 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जून 2020

बाप्पांची मूर्ती ऑनलाईन चॉईस करण्याची संधी आर. के. नगरातील तरुणाने दिली आहे.

कोल्हापूर : बाप्पांची मूर्ती ऑनलाईन चॉईस करण्याची संधी आर. के. नगरातील तरुणाने दिली आहे. स्वतः बीएस्सीच्या तृतीय वर्षात शिकणाऱ्या ऋषीकेश ऊर्फ ओम जयदेव लोहार याने ही संकल्पना आणली आहे. त्याच्याकडे असलेल्या व्हॉटस्‌ऍपच्या क्रमांकावर त्याने कच्च्या मूर्तींची छायाचित्रे दिली आहेत. रंगकाम पूर्ण झाल्यानंतरही असेच फोटो तो अपलोड करणार आहे. गर्दी टाळा, ऑनलाईन चॉईस, बुकिंग करा, अशी जाहिरात त्याने केली आहे. 

आर. के. नगरातील श्री लॉनच्या मागील बाजूस भागत माता कॉलनी आहे. येथे लोहार कुटुंबीय राहते. ऋषीकेशला कलेची आवड आहे. मातीतील, प्लास्टरच्या मूर्ती तो तयार करतो. सध्या लॉकडाउन असल्यामुळे गर्दीत जाऊन बाप्पांची मूर्ती पसंत करणेही धोकादायक आहे. तसेच गणेश चतुर्थीला मूर्ती आणण्यासाठी मोठी गर्दी होते. ही गर्दी टाळण्यासाठी ऋषीकेशने आत्ता कच्च्या मूर्तींचे ऑनलाईन मार्केटिंग सुरू केले आहे. त्याला त्याचे भाऊ अथर्व, ओंकार सुतार सहकार्य करत आहेत. घरीच राहून त्यांनी मूर्तीचे काम सुरू असलेली छायाचित्रे व्हॉटस्‌ ऍपवर प्रसिद्ध केली आहेत. त्याखाली दोन मोबाईल क्रमांक दिले आहेत. या क्रमांकावर नोंदणी केली जात आहे. 

ऋषीकेशचे वडील मोटार बॉडी बिल्डरचे काम करतात, रंगकाम करतात. त्यांचे जवाहरनगरातील काका दत्तात्रय लोहार हे सर्पमित्र आहेत. त्यांचाही उपनगरात मोठा संपर्क आहे. त्यामुळे सर्वांनी मिळून ऑनलाईन बाप्पाचे बुंकिंग करण्याची विनंती व्हॉटस्‌ऍपद्वारे केली आहे. 

आठशे रुपयांपासून ते अडीच हजार रुपयांच्या दहा इंच ते अडीच फुटांपर्यंतच्या मूर्ती आहेत. कच्ची मूर्ती आणि रंगकाम झाल्यानंतरची मूर्तीही व्हॉटस्‌ऍपद्वारे सर्वांसमोर पोचविण्याचे काम करीत आहोत. आर.के.नगर परिसरातील नागरिकांसह जवाहरनगर, सुभाषनगर, मोरेवाडी, पाचगाव परिसरातील नागरिकांना येथे गणेशमूर्ती उपलब्ध आहेत. 
- ऋषीकेश लोहार, कारागीर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: choose online, Bappa ...!