मुंबईची मंडळी जंगलातल्या घरात 

सुधाकर काशीद
शुक्रवार, 10 एप्रिल 2020

दाजीपूर जंगलात प्रवेश करताना "ठक्‍याचा धनगरवाडा' नावाचे गेट लागते. या गेटमधून 22 ते 23 किलोमीटर आत जंगल विसावले आहे. या गेटच्या अलीकडून एक पायवाट जाते व ती थेट ठक्‍याच्या धनगरवाड्यात जाऊन पोहोचते. या धनगरवाड्यात फक्त एकच घर. आजूबाजूला जंगल. एवढ्या लांब इतर वस्ती, या घरात आजही लाईट नाही. दिवस मावळला की या घराचा दरवाजा बंद करावा लागतो. जो दुसऱ्या दिवशी तांबडं फुटल्यावर उघडतो. 

कोल्हापूर :  दाजीपूर जंगलात प्रवेश करताना "ठक्‍याचा धनगरवाडा' नावाचे गेट लागते. या गेटमधून 22 ते 23 किलोमीटर आत जंगल विसावले आहे. या गेटच्या अलीकडून एक पायवाट जाते व ती थेट ठक्‍याच्या धनगरवाड्यात जाऊन पोहोचते. या धनगरवाड्यात फक्त एकच घर. आजूबाजूला जंगल. एवढ्या लांब इतर वस्ती, या घरात आजही लाईट नाही. दिवस मावळला की या घराचा दरवाजा बंद करावा लागतो. जो दुसऱ्या दिवशी तांबडं फुटल्यावर उघडतो. 

या घरात ठकू धनगराचा मुलगा धाकू धनगर व त्याची बायको असे दोघेच राहतात; पण गेल्या महिन्याभरात मात्र चार-पाच चिल्ल्यापिल्ल्यांच्या कलकलाटाने हे घर भरून गेले आहे. ही चिल्ली-पिल्ली म्हणजे "कोरोना'चा पार्श्‍वभूमीवर ठकू धनगराची नातवंडे, परतवंडे मुंबईहून "गड्या आपला गावच बरा' म्हणून आली आहेत. महिना होऊन गेला ती इथेच आहेत. मुंबईहून परतलेली नातवंडे, परतवंडे महिनाभर जंगलाचा एक वेगळा अनुभव घेत आहेत. त्यांची वैद्यकीय तपासणी झाली. क्वारंटाईनचे शिक्के पोरांपासून आई बापापर्यंत सर्वांच्या हातावर मारले. आता क्वारंटाईनची मुदत संपली आहे; पण रस्ते बंद, गाड्या बंद यामुळे ही मुंबईची मंडळी जंगलातल्या घरातच आहेत. सुरुवातीला भेदरलेली लहान पोरं आता घरच्या अंगणात बागडत आहेत. जांभळं तोडत आहेत. कैरीच्या फोडी चाखत आहेत. मोठी मंडळी मात्र कधी "लॉक डाऊन' उठतोय. कधी पोटापाण्यासाठी कामावर जातोय या चिंतेत आहेत. 

ज्या ठकू धनगराच्या नावाने हा धनगरवाडा आहे. ती ठकू धनगर म्हणजे या परिसरातला जंगलाचा दाजीपूर अभयारण्य घोषित होण्यापूर्वीचा जाणकार. त्यांचे एकट्याचेच घर अभयारण्यात आहे. पूर्वी हे घर साधे झापाचे होते. आता विटांचे बांधकाम आहे. तीस, चाळीस गायी, म्हशींची निगराणी करत हा ठकू धनगर येथे राहात होता. रानगवतावर पोसल्या गेलेल्या त्याच्या गायी, म्हशीच्या दुधाचे दही, ताक, लोणी, तूप पंचक्रोशीतील चर्चेत होते.

आजूबाजूला जंगल, लाईट नाही, धड रस्ता नाही, आजूबाजूला गवे, वन्यजीवांचा वावर, पावसाळ्यात तर बाहेर पाऊल टाकायची सोय नाही. अशा परिस्थितीत ठकू धनगर आणि त्यांचे कुटुंबीय राहात आहे. वरी, नाचणे, भात व घराजवळ लावलेल्या भाज्या दुभदुभते यावर जगत होते. आज त्यांची सहावी पिढी राहते. सध्या तेथे मुलगा व सून आहे. काळाच्या ओघात नातवंडे मुंबई, ठाण्याला नोकरीसाठी गेली आहेत. एरव्ही कधी गणपतीला किंवा मे महिन्याला यायची, ती आता "कोरोना'मुळे आली आहेत. 

आम्ही मुंबईला असतो. "कोरोना'मुळे महिन्यापूर्वी दाजीपूरला आलो. मुले पहिल्यांदा भेदरली होती. आता जंगली वातावरणात रमली आहेत. आमचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण झाला आहे. तब्येती चांगल्या आहेत. 
- प्रणाली कोकरे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The church of Mumbai in the forest house

फोटो गॅलरी