काळजावर दगड ठेवत मालकाने अख्खी सर्कस विकली भंगारात

Circus Equipment Sold In Scrap Due To Financial Crisis Kolhapur Marathi News
Circus Equipment Sold In Scrap Due To Financial Crisis Kolhapur Marathi News

गडहिंग्लज : कोरोना लॉकडाउनमुळे हजारो उद्योगांची चाके गाळात रुतली. परिणामी, लाखो कामगार आणि अभियंत्यांना रोजीरोटी गमवावी लागली. यात दुर्दैवाने सर्कस कलाकारांचीही भर पडली आहे. दहा महिन्यांपासून बंद असणारी येथील स्टार रॉयल सर्कस सुरू होण्याची शक्‍यता मावळल्याने मालकाने हा पांढरा हत्ती भंगारात घालण्याचा निर्णय घेतला. काळजावर दगड ठेवत सर्कशीचे सर्व साहित्य कवडीमोल दराने आज भंगारात घातले. त्यामुळे 40 कलाकार बेरोजगार झाले. 

डिजिटल मनोरंजनाच्या साधनांच्या जन्मापूर्वीपासून बालक ते ज्येष्ठापर्यंत सर्कस आकर्षणाचे केंद्र राहिली आहे. पूर्वी तर लहान मुलांना प्राण्यांची ओळखच या सर्कशीतून होत होती. मनोरंजन विश्‍वावर चित्रपट, टीव्ही यांची हुकमत झाली, तरी सर्कशीने आपले वेगळे स्थान टिकवून ठेवले होते. दोन दशकापूर्वी वन्यप्राण्यांच्या सहभागावर बंदी आल्यावर खऱ्या अर्थाने सर्कशीच्या वाटचालीला घरघर लागली. याला न्यू रॉयल सर्कसही अपवाद नव्हती. जीव धोक्‍यात घालून होणारे साहसी व्यायाम प्रकार, विदूषकांच्या भूमिकेच्या जोरावर सर्कशीचा अस्तित्वासाठी संघर्ष सुरू होता. 40-50 कलाकारांचा हा तांडा सांभाळताना मालकांनाही पदड्यामागे आर्थिक कसरत नित्याचीच झाली होती. 

येथील वि. दि. शिंदे हायस्कूललगत असणाऱ्या पटांगणात फेब्रुवारीत न्यू रॉयल सर्कस दाखल झाली. यात मणिपूर, बंगाल, केरळ, झारखंड, गुजरात येथील 40 कलाकार होते. मार्चपासून कोरोनामुळे सर्कसीचे खेळ थांबले. एखाद-दुसऱ्या महिन्यात खेळ सुरू होतील म्हणून कलाकार, कामगारांनी सर्कशीच्या साहित्याची दुरुस्ती करत दिवस ढकलले. तीन महिन्यांनंतरही परिस्थिती पूर्वपदावर न आल्याने मालकाने कलाकारांना आपापल्या गावी पाठवले. आता दहा महिने उलटले तरी अद्याप खेळ सुरू होण्याची शक्‍यता नाही. त्यामुळे मालक अजय माने यांनी भुर्दंड सोसण्याऐवजी सर्कसच बंद करण्याचा निर्णय घेतला. सर्कशीचे साहित्य ठेवून तरी काय करायचे, असा प्रश्‍न होता. नुकसान भरून निघणार नाही; पण दोन पैशांची मदत होईल, या अपेक्षेने सारे साहित्य आज भंगारात घातले. 

गडहिंग्लजकरांची माणुसकी... 
मार्चमध्ये लॉकडाउनमुळे सर्कशीचे खेळ थांबले. संचारबंदीने कलाकारांना गावी परतणेही मुश्‍कील झाले. त्यांच्या उपासमारीकडे "सकाळ'ने "सर्कशीच्या कलाकारांची कोंडी' या वृत्ताद्वारे लक्ष वेधले होते. त्यानंतर येथील दानशूर व्यक्ती, संस्था, महसूल विभाग, नगरपालिका यांनी धान्य, भाजीपाला, गॅसची व्यवस्था केली. त्याद्वारे कलाकार आणि कामगारांना मदत करत माणुसकी जपली. 

आठ लाखांचे साहित्य भंगारात 
सर्कस म्हणजे एक सिनेमागृहच. यात सहाशे खुर्च्या, टेबल, स्वागत कमान, विद्युत रोषणाईचे साहित्य, अनेक लोखंडी पाईप, बांबू, मौत की कुआ आणि त्याची गाडी, कुंपण, पत्रे अशा प्रकारचे सुमारे आठ लाख रुपयांचे साहित्य भंगारात विकले. कापडी पडदे, तंबू असे साहित्य घेण्यास भंगारवाल्याने नकार दिला. परिणामी, त्यातून कशीबशी 30 टक्के रक्कमच कर्ज भागविण्यासाठी मिळाली. 

नाईलाजाने निर्णय
कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर 1-2 महिन्यांत परिस्थिती सुरळीत होईल, या आशेने कलाकारांना पूर्ण मानधन देऊन ठेवले; परंतु त्यानंतरही परिस्थिती बिकट राहिल्यानंतर कलाकारांना आपापल्या गावी सोडले. अर्धे मानधन देत राहिलो. गेल्या दोन महिन्यांपासून सर्कस सुरू करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या चकरा मारल्या. मात्र, परवानगी मिळण्यात अडचणी येत आहेत. तोट्यातील आर्थिक डोलारा कोसळू लागल्याने नाईलाजाने सर्कस बंद करण्याचा निर्णय घेतला. 
- अजय माने, मालक, न्यू रॉयल सर्कस, सांगली 

संपादन - सचिन चराटी

kolhapur

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com