रांगा लावून नागरिकांनी दिवसभरात भरले दोन कोटी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 जुलै 2020

महापालिकेच्या तिजोरीत घरफळा जमेपोटी आज अखेर सुमारे 21 कोटी 3 लाख इतकी विक्रमी रक्कम जमा झाली आहे.

कोल्हापूर : शहरातील मिळकतधारकांना सन 2020-2021 या आर्थिक वर्षातील घरफाळा भरण्यासाठी आज दिवसभरात नागरी सुविधा केंद्रावर लोकांनी रांग लावून सुमारे 1 कोटी 93 लाख रक्कम जमा केली. तसेच ऑनलाईनद्वारे 29 लाख 22 हजार जमा झाले आहेत. दरम्यान घरफाळा बिलात सहा टक्के सवलतीची 30 जून ही अंतिम तारीख होती. 

दरम्यान, उद्यापासून (ता. 1) 4 टक्के सवलत योजनेचा प्रारंभ होत आहे. ज्या ग्राहकांना 6 टक्के सवलत योजनेचा लाभ घेता आला नाही, अशा नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन कर संग्राहक व निर्धारक संजय भोसले यांनी केले. 

घरफाळा विभागांकडून नियमित वेळेत कर भरणा करदात्यांना 6 टक्के सवलत योजनेची माहिती देऊन मिळणारी सवलत दर्शवून निव्वळ देय होणारी रक्कम भरण्याची विनंती स्वतंत्रपणे पत्राद्वारे केली आहे. त्यामुळे आज दिवसभरात दोन कोटी 22 लाख जमा झाले. 

महापालिकेच्या तिजोरीत घरफळा जमेपोटी आज अखेर सुमारे 21 कोटी 3 लाख इतकी विक्रमी रक्कम जमा झाली आहे. आजअखेर नागरी सुविधा केंद्रावर सुमारे 34065 तर ऑनलाईनद्वारे 11867 इतक्‍या नागरिकांनी कर भरून या सवलत योजनेचा लाभ घेतला. नागरी सुविधा केंद्रावर सोशल डिस्टन्सचे मार्किंग करण्यात आले असून, सॅनिटायझरची सुविधा ठेवली आहे. तरी नागरिकांनी चार टक्‍के सवलत योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेण्याच्या दृष्टीने आपला घरफाळा लवकरात लवकर भरणा करून महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. 

दृष्टिक्षेप 
- ऑनलाईनद्वारे 29 लाख 22 हजार भरले 
- महापालिकेच्या तिजोरीत आजअखेर 21 कोटींवर जमा 
- नागरी सुविधा केंद्रावर 34 हजारावर, ऑनलाईन 11 हजारावर बिले भरली 
- बिल भरण्यासाठी सोशल डिस्टन्स, सॅनिटायझरची सुविधा 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Citizens lined up and paid Rs 2 crore in a day