पन्हाळ्यावर रंगतोय ढग-वारा अन्‌ पावसाचा खेळ 

Clouds, wind and rain play on the panhala
Clouds, wind and rain play on the panhala
Updated on

पन्हाळा :  जूनचा मध्य चालू आहे.. आकाशात ढगांची लगबग वाढलीय... वारा त्यांना ढकलत ढकलत तटबंदीच्या बाहेर काढतोय.. पळणाऱ्या ढगांची जागा दुसरे ढग भरून काढताहेत...या ढगांच्या खालून धुक्‍याचे दाट थर हळूवारपणे गडाला आपल्या कवेत घेताहेत..ढग-वाऱ्यांचा हा खेळ पन्हाळगडी आठवडयापासून सुरु झालाय..

मधूनच एखादा ढग काळी कांबळ पांघरुन येतोय.. नि तीन दरवाजाला धडकत गडावर आसवांची बरसात करतोय..काळया पांढऱ्या ढगांना बाजूला सारत सुर्याची किरणे मधूनच गडाकडे डोकावून पाहताहेत.. आणि या दृश्‍यात रममाण व्हायला तरूणाई.. दुचाकी, चारचाकीतून वाघबीळची तीव्र वळणे लिलया पार करते..प्रवासीकर नाक्‍यावर येताहेत.. तेथे प्रवेश बंदचा फलक अन्‌ आडवी बॅरिकेड्‌स बघून चार दरवाजातील मोकळ्या जागेत आपल्या गाड्या पार्क करून शेजारील साधोबा तलावाच्या कठड्यावर बसून, आडवळणी पायवाटेने चढ चढून तटबंदीवर.. बुरुजावर वेगवेगळया पोज देत मोबाईलमध्ये आपल्या छब्या काढून घेतात. 
चार दरवाजा परिसरातही वाऱ्याला मोठा जोर असल्याने या तरुणाईला नेहमीपेक्षा वेगळे थ्रील मिळतेय..पन्हाळगडात प्रवेश बंद असला म्हणून काय झाले.?. परिसर तर आमचाच आहे नव्हे आमच्यासाठीच आहे या विचाराने ही तरूणाई निसर्गात रममाण होते आहे. 


मार्चच्या मध्यापासून पन्हाळगड पर्यटकांसाठी बंद आहे...लॉकडाउनमुळे मध्यंतरी सुना सुना वाटणारा वाघबीळचा घाट आता लॉकडाउन थोडासा शिथील झाल्याने पुन्हा वाहनांच्या गर्दीत आपली ओळख वाढवतोय.. वाघबीळपासून सुरु झालेली हॉटेलांची रांग कुलुपबंद असली तरी कोल्हापूरात पार्सलची सोय असल्याने हे खाद्यपदार्थांचे पार्सल घेवून मंडळी येताहेत. शनिवारी आणि रविवारी पन्हाळगडी येणारे ठराविक जण आहेत.. हे आपली वाहने घेवून आपल्या प्रिय जनांसोबत येण्याचा परिपाठ चुकवत नाहीत..

पन्हाळा नाक्‍यातून प्रवेश बंद असला तरी नागझरी मार्गे अगर गुरुवारपेठेतून चालत ही मंडळी रेडेघाट परिसर, विठोबामाळ परिसरात येतात आणि आपले इप्सित साध्य करतात. निसर्गात मुक्‍तपणे वावरत तटबंदीवरून कासारी-वारणा नदीचा परिसर, अफाट पसरलेल्या कोल्हापूर परिसराचा काही भाग निरखून पाहात ठराविक ठिकांणांची ओळख सांगण्याचा प्रयत्न करताना आढळत आहेत. मधूनच येणाऱ्या पावसाच्या सरी अंगावर झेलत पळापळीचा खेळ खेळताहेत. कोरोना संकटाची भीती काही काळ का होईना विसरून मोकळ्या हवेत फ्रेश होताहेत, नि पन्हाळ्याशी आपले नाते अधिक घट्ट करत पन्हाळा हा आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग असल्याचा पुरावा मागे सोडत सायंकाळच्या वेळी परतताहेत. 

दृष्टिक्षेप 
- पन्हाळ्याचे सौंदर्य न्याहाळण्यासाठी पर्यटकांची ये-जा 
- प्रवेश बंदमुळे बाहेरूनच निसर्गाचा घेतला जातोय आनंद 
- शिथिल झाल्याने वाघबीळ घाटात वाहनांची ये-जा 
- पायी फिरून घेतला जातोय निसर्गाचा आनंद 

कोल्हापूर

कोल्हापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com