नोकरी जाण्याची धास्तीने संगणकीय अभियंत्याची आत्महत्या 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 21 November 2020

संगणकीय अभियंत्याने राहत्या घरात पंख्याला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार दुपारी उघडकीस आला

कोल्हापूर - नोकरी जाण्याच्या धास्तीने नैराश्‍य आलेल्या संगणकीय अभियंत्याने राहत्या घरात पंख्याला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार दुपारी उघडकीस आला. प्रविण गणेश जोशी (वय 33, रा. मंगळवार पेठ, संभाजीनगर) असे त्यांचे नाव आहे. याची नोंद जुना राजवाडा पोलिस ठाण्यात झाली. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती, जोशी कुटुंब मंगळवार पेठेतील संभाजीनगरातील प्रथमेश प्लाझा येथे राहते. ते मुळचे भुदरगड तालुक्‍यातील आहेत. कुटुंबातील प्रवीण जोशी हे सॉफ्टेवअर इंजिनिअर होते. ते गेल्या चार वर्षापासून बिबेवाडी, पुणे येथील एका आयटी कंपनीत नोकरी करत होते. कोरोना संकटामुळे 17 मार्च पासून ते मंगळवार पेठेतील घरी आले. ते घरातूनच ऑनलाईन कंपनीचे काम करत होते. पंधरा एक दिवसापूर्वी त्यांना कंपनीतून काही लोकांना कामावरून कमी केले असल्याचे समजले होते. त्याचबरोबर त्यांना 1 डिसेंबरला कंपनीने कार्यालयात बोलवले होते. कामावरून कमी केलेल्या लोकां प्रमाणे आपल्यालाही कामावरून कमी केले जाईल का? की कामावर कायम ठेवण्यात येईल? या विचारातून ते चिंतेत होते.

हे पण वाचा घागर मोर्चा काढून ग्रामपंचायतीला टाळे ; ग्रामस्थ संतप्त

दरम्यान, आज दुपारी साडेबारा वाजण्याच्या पूर्वी प्रवीण जोशी यांनी राहत्या घरातील हॉलमधील पंख्यास दोरीने गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. याबाबतचा प्राथमिक तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल ऋषिकेश ठाणेकर करीत आहेत. 

 

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: computer engineer Suicide in kolhapur