इचलकरंजीत लवकर घरफाळा भरणाऱ्यांना रिबेट

पंडित कोंडेकर
Saturday, 17 October 2020

इचलकरंजी शहरातील मिळकतधारकांना दिलासा देणारा निर्णय आज पालिकेत झाला. 30 नोव्हेंबरपर्यंत घरफाळा भरणाऱ्या मिळकतधारकांच्या संयुक्त करातून 1 टक्के रिबेट देण्यात येणार आहे.

इचलकरंजी : शहरातील मिळकतधारकांना दिलासा देणारा निर्णय आज पालिकेत झाला. 30 नोव्हेंबरपर्यंत घरफाळा भरणाऱ्या मिळकतधारकांच्या संयुक्त करातून 1 टक्के रिबेट देण्यात येणार आहे. नगराध्यक्षा अलका स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब केले.

मिळकतधारकांना बिले दिल्यानंतर 15 दिवसांत घरफाळा भरल्यास एक टक्का रिबेट दिला जात होता. गेल्यावर्षी सुमारे आठ हजार मिळकतधारकांनी याचा लाभ घेतला होता. सुमारे 4 लाखांची सवलत मिळाली होती. यंदा मात्र तांत्रिक कारणामुळे रिबेट देण्यास प्रशासनाकडून नकार दिला होता. त्यामुळे मिळकतधारकांत नाराजी होती. यातून वादावादीचेही प्रसंग निर्माण झाले होते. 

दरम्यान, याबाबत ताराराणी आघाडीचे पक्षप्रतोद प्रकाश मोरबाळे यांनी मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांना निवेदन देऊन रिबेट देण्याची मागणी केली होती. त्यानुसार आज नगराध्यक्षा स्वामी यांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यामध्ये 30 नोव्हेंबरपर्यंत घरफाळा भरणाऱ्या मिळकतधारकांना संयुक्त करात 1 टक्के रिबेट देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला. बैठकीस उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, पक्षप्रतोद मोरबाळे, कर निरीक्षक आरीफा नूलकर आदी उपस्थित होते. 

घरफाळा भरण्याचा मार्ग मोकळा 
पालिकेकडून एक टक्का रिबेट मिळत नसल्यामुळे अनेकांनी घरफाळा भरला नव्हता. मात्र, याबाबतचा निर्णय आज झाल्यामुळे घरफाळा भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मुळात कोरोनामुळे अनेक मिळकतधारक आर्थिक अडचणीत आहेत. या पार्श्‍वभूमीवर या निर्णयामुळे शहरातील मिळकतधारकांना दिलासा मिळाला आहे. 

दीड कोटी घरफाळा जमा 
बिले मिळाल्यानंतर घरफाळा भरण्यास मिळकतधारक गर्दी करीत आहेत. सप्टेंबरअखेर 1 कोटी 27 लाख 50959 रुपये, तर 1 ते 15 ऑक्‍टोबरदरम्यान 55 लाख 62 हजार 270 रुपये घरफाळा जमा झाला आहे. 

रिबेटचा लाभ घ्यावा
आपण केलेल्या मागणीला यश आले आहे. मिळकतधारकांनी 30 नोव्हेंबरपर्यंत घरफाळा भरून संयुक्त करात एक टक्का रिबेटचा लाभ घ्यावा. 
- प्रकाश मोरबाळे, पक्षप्रतोद, ताराराणी आघाडी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Concession Scheme For Property Owners In Ichalkaranji Kolhapur Marathi News