इंधनातून होणाऱ्या प्रदूषणाला आळा घालत स्वच्छ  हायड्रोजनवर चालणाऱ्या गाड्याचे डॉ. सूर्यवंशी यांचे संशोधन 

नंदिनी नरेवाडी - पाटोळे 
Monday, 25 January 2021

ऑस्ट्रेलियातील युनिव्हर्सिटी ऑफ न्यू साऊथ वेल या संस्थेत ते सौरऊर्जेतून हायड्रोजनच्या निर्मितीबाबत संशोधन करतात

कोल्हापूर : रस्त्यावरून धावणाऱ्या वाहनांसह स्पेस रॉकेटला ऊर्जा पुरवण्यासाठी पेट्रोल किंवा डिझेलची गरज भासते, मात्र या इंधनाच्या वापरामुळे पर्यावरणात अनेक विषारी वायूचे प्रदूषण होते. त्यात नायट्रिक ऑक्‍साईड, कार्बन मोनॉक्‍साईड, कार्बन व सल्फर डायऑक्‍साईड आणि शिसे यांचा समावेश आहे. भविष्यात हे इंधन उपलब्ध होण्यात मर्यादाही आहेत. यासारख्या अडचणी लक्षात घेऊन नवीन स्वच्छ इंधनांचा शोध घेण्याचे प्रयत्न जगभर सुरू आहेत. या संशोधनात कोल्हापूरचा एक युवक अग्रभागी आहे. या युवकाचे नाव आहे, डॉ. महेश सूर्यवंशी. 

 सोलर पॅनेलबाबतीतही  संशोधन

ऑस्ट्रेलियातील युनिव्हर्सिटी ऑफ न्यू साऊथ वेल या संस्थेत ते सौरऊर्जेतून हायड्रोजनच्या निर्मितीबाबत संशोधन करतात. हे विद्यापीठ सोलर ऊर्जेबाबतच्या संशोधन करणाऱ्या जगभरातील नामांकित संस्थांमधील एक आहेत. सोलर ऊर्जेपासून तयार होणाऱ्या हायड्रोजनच्या वापरातून वाहनांसह स्पेस रॉकेट चालू शकणार आहेत.  सोलर पॅनेलमधून ऊर्जानिर्मितीचा प्रयोग सर्वांना माहीत आहे, मात्र हे सोलर पॅनेल सिलिकॉनपासून तयार केले जाते. हे सोलर पॅनेल सर्वसामान्यांच्या आवाक्‍या बाहेरचे आहे. याला पर्याय म्हणून इतर धातू-अधांतुच्या वापरातून सर्वसामान्यांना परवडेल, असे सोलर पॅनेलबाबतीतही ते संशोधन करत आहेत. 

डॉ. सूर्यवंशी मूळचे इचलकंरजीचे. दत्ताजीराव कदम आर्टस, सायन्स ॲण्ड कॉमर्स कॉलेजमधून त्यांनी पदवीचे शिक्षण घेतले. शिवाजी विद्यापीठातून भौतिकशास्त्र विषयातून एमएस्सी पूर्ण केली. तेथेच पीएच.डी.चे शिक्षण घेताना साऊथ कोरियाकडून त्यांना स्कॉलरशिप मिळाली. २०१२ पासून पुढे तीन वर्षे त्यांनी येथे सोलर सेलमध्ये संशोधन केले. याबद्दल त्यांना २०१५ मध्ये पीएच.डी. प्रदान केली. त्यांना शिवाजी विद्यापीठाचे प्र- कुलगुरू प्रा. डॉ. पी. एस. पाटील व प्रा. डॉ. ए. व्ही. मोहोळकर यांचे मार्गदर्शन लाभले.

ऑस्ट्रेलियात २.४ कोटींची फेलोशिप त्यांना ऑस्ट्रेलियन शासनाच्या रिसर्च कौन्सिलने डिस्कव्हरी अर्ली करिअर रिसर्चर ॲवॉर्डने गौरविले आहे. यात त्यांना स्वतःचा रिसर्च ग्रुप तयार करण्यासाठी २.४ कोटींची फेलोशिप मिळाली. या ग्रुपद्वारे सौरऊर्जेचा वापर करून कमी खर्चात वीज आणि हायड्रोजननिर्मितीबाबत संशोधन केले जाणार आहे. यासाठी त्यांना ऑस्ट्रेलियात ‘फादर ऑफ फोटोव्होल्टेइक्‍स’ अशी ओळख असणाऱ्या प्रा. मार्टिन ग्रीन व प्रा. शॉवजिंग हाऊ यांचे मार्गदर्शन मिळते.

संपादन- अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: control the pollution caused by fuel research Dr mahesh Suryawanshi kolhapur marathi news