मोठा निर्णय : पिरनवाडी प्रकरण ; छत्रपती शिवाजी महाराज चौक नावासह रायण्णा पुतळाही कायम

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 29 August 2020

अखेर पडदा पडला.

कायदा व सुव्यस्था विभागाचे अतिरिक्‍त पोलिस महासंचालक अमरकुमार पांडे यांची शिष्टाई यशस्वी ठरली.

 

बेळगाव : गेल्या पंधरा दिवसांपासून संगोळी रायण्णा यांच्या पुतळ्यावरुन पिरनवाडीत सुरु असलेल्या वादावर अखेर शुक्रवारी (२८) रात्री पडदा पडला. गावाच्या प्रवेशव्दाराचे नाव छत्रपती शिवाजी महाराज चौक असे कायम ठेवून महामार्गावर रात्री प्रतिष्ठापित केलेला संगोळी रायण्णा यांचा पुतळाही न हलविण्याचा निर्णय ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीत घेतला. कायदा व सुव्यस्था विभागाचे अतिरिक्‍त पोलिस महासंचालक अमरकुमार पांडे यांची शिष्टाई यशस्वी ठरली.
 

पिरनवाडी गावाच्या प्रवेशव्दारावर गुरुवारी रात्री कर्नाटक रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी संगोळी रायण्णा यांच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना केली होती. छत्रपती शिवाजी महाराज चौकात रायण्णा यांचा पुतळा उभा करण्यासाठी ग्रामस्थांचा विरोध होता. हा विरोध डावलून रातोरात हे कृत्य केल्याने सकाळी गावात तणाव निर्माण झाला. ग्रामस्थांनी मोर्चा काढून आंदोलन केले. संतप्त जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. यावर तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेण्यात आली होती. 
तसेच परिस्थिती हाताळण्यासाठी राज्याचे कायदा व व्यवस्था विभागाचे अतिरिक्‍त पोलिस महासंचालक अमरकुमार पांडे यांना सरकारने बेळगावला पाठविले होते. त्यांनी दुपारी पिरनवाडीला भेट देऊन अधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेतली. त्यानंतर दोन्ही समाजाच्या प्रमुखांची व ग्रामस्थांच्या बैठकीचे आयोजन केले.

अधिकाऱ्यांनी दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतले. सायंकाळी सातपासून रात्री नऊपर्यंत चाललेल्या या बैठकीत ग्रामस्थांनाच निर्णय घेण्याची संधी देण्यात आली. यावेळी अनेक पर्याय सुचविण्यात आले. मात्र, दोन्ही गट आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने लवकर निर्णय झाला नाही. त्यानंतर सर्वांचे म्हणणे ऐकून घेऊन दोन्ही बाजूच्या प्रत्येकी पाच जणांना बाहेर पाठवून चर्चा करण्यास सांगण्यात आले. त्यानंतर या मुद्यावर तोडगा निघाला. चौकाचे नाव छत्रपती शिवाजी महाराज असे कायम ठेवून तसा फलक त्याठिकाणी उभारणे. तसेच संगोळी रायण्णा यांचा पुतळा आहे, त्याच ठिकाणी ठेवण्याचे ठरले. ग्रामस्थांच्या या निर्णयाचे अधिकाऱ्यांनी स्वागत करुन नंतर पत्रकार परिषदेत झालेल्या निर्णयाची माहिती दिली.

हेही वाचा- Video : तुम्हाला घरच्या घरी निर्माल्यापासून खत बनवायचे आहे तर मग ही बातमी वाचाच

१५० मराठी भाषकांवर गुन्हा
पिरनवाडीत रात्री बेकायदेशीररित्या संगोळी रायण्णा यांचा पुतळा उभारल्याप्रकरणी कन्नड रक्षण वेदिकेच्या २० जणांविरुद्ध तर दगडफेक प्रकरणी सुमारे १५० ग्रामस्थांविरुद्ध गुन्हा दाखल करून घेतला आहे. गुरुवारी पहाटे तीनच्या सुमारास कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी पिरनवाडी प्रवेशद्वारावर संगोळी रायण्णा पुतळ्याची उभारणी केली होती. गस्तीवर असणाऱ्या पोलिसांच्या निदर्शनास ही घटना आली. त्यामुळे, कॉन्स्टेबल गुरुराज लमानी यांनी फिर्याद दिली आहे. त्यानंतर ग्रामस्थ एकत्र आले. त्यावेळी काहींनी दगडफेक केली. त्यामुळे, जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. या पार्श्‍वभूमीवर गावात कडक बंदोबस्त आहे.

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: controversy started in Piranwadi statue of Sangolli Rayanna finally came light on Friday