कनवाने केली लॉकडाउनमध्ये  400 पुस्तके वाचकांना  घरपोच 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 जुलै 2020

कोरोनामुळे शासनाने तीन महिने लॉकडाउन केले. या काळात अनेकांनी मनोरंजनासाठी मार्ग निवडला. पण, ग्रंथालये बंद असल्याने त्यांची अडचण झाली. यावर करवीर नगर वाचन मंदिराने "पुस्तक आपल्या दारी' हा अभिनव उपक्रम सुरू केला. त्यामुळे वाचकांना हवे ते पुस्तक घरबसल्या मिळाले. सुमारे 400 पुस्तके संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी वाचकांच्या घरी पोचवली.

कोल्हापूर :  कोरोनामुळे शासनाने तीन महिने लॉकडाउन केले. या काळात अनेकांनी मनोरंजनासाठी मार्ग निवडला. पण, ग्रंथालये बंद असल्याने त्यांची अडचण झाली. यावर करवीर नगर वाचन मंदिराने "पुस्तक आपल्या दारी' हा अभिनव उपक्रम सुरू केला. त्यामुळे वाचकांना हवे ते पुस्तक घरबसल्या मिळाले. सुमारे 400 पुस्तके संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी वाचकांच्या घरी पोचवली.

ज्येष्ठ नागरिकांना या उपक्रमाचा सर्वाधिक लाभ मिळाला. करवीर नगर वाचन मंदिर जुनी आणि साहित्य वैभव जतन करणारी संस्था आहे. समाजात वाचन संस्कृती वाढावी, यासाठी विविध उपक्रम राबविले जातात. लॉकडाउनच्या काळात ग्रंथालय बंद ठेवण्याचे आदेश शासनाकडून आले होते. सलग दोन ते तीन महिने वाचनालय बंद असल्याने सभासदांच्या वाचनात खंड पडणार होता. याचा विचार करून संचालक आणि कर्मचाऱ्यांनी "पुस्तक आपल्या दारी' हा उपक्रम सुरू केला.

यात सभासद संस्थेच्या संकेतस्थळावरून हव्या असणाऱ्या पुस्तकाचा क्रमांक पाहू शकतात. त्यानंतर ग्रंथालयात फोन करून पुस्तक नोंदवू शकतात. पुस्तकांच्या उपलब्धतेनुसार ही पुस्तके कर्मचारी थेट सभासदांच्या घरी नेऊन देतात. आधीचे पुस्तक जमा करून घेतात. अशा प्रकारे सुमारे 400 पुस्तकांची देवाणघेवाण झाली. 

पुस्तकांचे परिगणन 
लॉकडाउनमुळे ग्रंथालय बंद आहे. मात्र, या कालावधीत कर्मचाऱ्यांनी पुस्तकांचे परिगणन सुरू केले. यात पुस्तकांची मोजदाद, स्वच्छता, त्यांचे पेस्ट कंट्रोल, बाइंडिंग ही कामे केली जातात. पुस्तकांना कीड लागू नये म्हणून वेखंड आणि डांबराच्या गोळ्या यांचा वापर केला जातो. 

*करवीर नगर वाचन मंदिर... 
*168 वर्षांची परंपरा. 
*एकूण पुस्तके- 1 लाख 39 हजार. 
*संदर्भ ग्रंथ- 18 हजार. 

शासनाने लॉकडाउनच्या काळात ग्रंथालये बंद ठेवण्याचा आदेश दिला होता. त्यामुळे वाचकांची अडचण होणार होती. मात्र, पुस्तके घरी पोचवून सभासदांच्या वाचनात खंड पडू दिला नाही. या उपक्रमामुळे वाचन चळवळ अधिक बळकट झाली. 
- सतीश कुलकर्णी, कार्यवाह, करवीर नगर वाचन मंदिर. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Conway delivers 400 books to readers at Kelly Lockdown