चंदगडला चार ठिकाणी कोरोना केअर सेंटर उभारणार...

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 मे 2020


सरपंच संघटनेचा पुढाकार ; प्रत्येक ग्रामपंचायत एक कॉट उपलब्ध करणार

चंदगड - तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. विस्तीर्ण क्षेत्रफळ विचारात घेता प्रत्येक विभागाला मध्यवर्ती चार कोरोना केअर सेंटर उभी करण्याच्या निर्णय घेण्यात आला.

येथे पंचायत समितीच्या सांस्कृतिक सभागृहात प्रशासनाने घेतलेल्या बैठकीत हा निर्णय झाला. तहसिलदार विनोद रणावरे, सभापती अॅड. अनंत कांबळे, गटविकास अधिकारी रमेश जोशी प्रमुख उपस्थित होते.

वाचा - क्वारंटाईन...छे !, हे तर मुंबईकरांचे घरच...

तालुक्यात रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक आहे. अशा वेळी रुग्णावर त्वरीत उपचार महत्वाचे आहेत. त्यासाठी प्रत्येक विभागाला मध्यवर्ती अशी चार कोरोना केअर सेंटर उभारण्याचा निर्णय झाला. सरपंच संघटनेने त्याची जबाबदारी घेतली. प्रत्येक ग्रामपंचायतीने एक कॉट देण्याचे ठरले. रविवार (ता.२४) पर्यंत चंदगड येथे त्या जमा करायच्या आहेत. दरम्यान बाहेरून येणाऱ्या व्यक्तींना क्वारंटाईन करणे आवश्यक असल्याचे सभापती कांबळे यांनी स्पष्ट केले. दक्षता समितीने आपला- परका असा भेद न करता योग्य ती कारवाई करावी अशी सुचना त्यांनी केली. क्वारंटाईन असताना बाहेर फिरणाऱ्यांवर पोलीसात तक्रार दाखल करा अशी सुचना तहसिलदार रणावरे यांनी केली. शाळेतील केंद्रावर नियुक्त केलेले शिक्षक कामावर येत नसतील तर लेखी तक्रार करण्यास सांगितले. संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ पारसे यांनी स्वागत केले. उपाध्यक्ष रमेश भोसले, कार्याध्यक्ष एकनाथ कांबळे, सचिव डी.जी. नाईक, सहसचिव नरसिंग पाटील उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Care Centers will be set up at four places in Chandgad