कोरोनाचा व्यापारी वर्चस्ववाद....

गजानन ज साळुंखे 
सोमवार, 6 एप्रिल 2020

कोरोना विषाणूचा प्रादुर्भावाचा जनमानसाचा आयुष्यावर आजपर्यंतचा जागतिक इतिहासात सर्वात अधिक परिणाम झाला आहे.

कोल्हापूर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भावाचा जनमानसाचा आयुष्यावर आजपर्यंतचा जागतिक इतिहासात सर्वात अधिक परिणाम झाला आहे. सामान्य माणसाचा मनात हा विषाणू म्हणजे जगातील दोन राष्ट्रांचा वर्चस्वाची लढाई आहे असे अंदाज बांधले जात आहेत. अंतर-राष्ट्रीय राजकारण हे अंतर-राष्ट्रीय व्यापाराच्या आधारावर चालत हे एक खूले रहस्य आहे, म्हणजेच समाज मनाला हे सर्वस्वी मान्य आहे कि युद्धाला व्यापाराचा आधार असतो. भारतीय इतिहासातील सुरत शहरावरची लुट हे खुले रहस्य अधोरेखित करते , त्यामुळे अगदी तळागाळातील माणसाला कोरोना विषाणू हे एक जैविक हत्यार असून जगातील व्यापार वर्चस्वासाठी चीनकडून वापरल गेल आहे यावर लगेच विश्वास बसतो. 

चीनचा व्यापारी वर्चस्ववाद 
चीनने गेल्या काही वर्षात व्यापार युद्धाच्या माध्यमातून अमेरिकेला  दिलेल्या आव्हानामुळे अनेक तज्ञांना कोरोना विषाणू हि चीनची आर्थिक वर्चस्वासाठीची नीती आहे हे देखील मान्य होत आहे. या विषाणूच्या प्रादुर्भावाला लढा देण्यसाठी चीन अनेक देशांना मास्क आणि औषधी साहित्याचा पुरवठा करीत आहे यातून चीनला आपण जगातील एका जबाबदार नेतृत्वाची भूमिका बजावत आहे अस भासवायचं आहे पण जागतिक स्तरावर हा चीनी व्यापार आहे असे मत उमटत आहे.

चीनचा या भूमिकेला आधार आला तो म्हणजे सर्बिया राष्ट्राचे राष्ट्राध्यक्ष आलेक्झान्द्र वूसिक यांचा विधानामुळे , सर्बियाचा राष्ट्राध्यक्षानि युरोपियन संघाकडे मास्क आणि इतर औषधी साहित्याची मागणी केली पण युरोपियन संघातील राष्ट्रांकडून हि मागणी पूर्ण होऊ शकली नाही कारण स्वतः युरोपियन राष्ट्रांना मास्क आणि इतर औषधी साहित्याची गरज आहे . सर्बियाची हि मागणी चीनने पूर्ण केली त्यामुळे वूसिक यांनी ‘युरोपियन एकता हि केवळ कागदावरील परीकथा आहे आणि या अडचणीच्या काळात केवळ चीन आपली मदत करू शकते’ असा उच्चार केला या विधानामुळे संपूर्ण जगाला असा संदेश गेला कि कोरोनाच्या संकटापासून वाचवण्याचे सामर्थ्य केवळ चीनकडे आहे.

जगाला  दिला असा संदेश

या घटनेनंतरच चीनने ज्या ठिकाणी कोरोनाचा सर्वात अधिक प्रादुर्भाव झाला तो वूहान प्रांत खुला करत असल्याचे जाहीर केले ज्यामुळे जगाला असा संदेश जावा कि चीनने  कोरोना  विषाणूचा प्रदुर्भावावर नियंत्रण मिळवले आहे. चीनने सर्बिया चा बाबतीत घेतलेली भूमिका हे सिद्ध करते कि चीनने केवळ स्वतचा नव्हे तर जगाचा गरजेपुरते उत्पादन केले आहे एव्हाना करण्याची क्षमता आहे. चीन यातून स्वतच्या मनुष्यबळाचा आधारावर जगाला आपले उत्पादन सामर्थ्य दाखवू पाहत आहे. सध्या चीनची माध्यमे असे सांगत आहेत कि चीन मध्ये कोरानाचे गेल्या दोन दिवसात अंतर्गत रुग्ण नाहीत म्हणजे जे काही नवीन रुग्ण आता चीनमध्ये आहेत ते बाहेरून आले आहेत.

या कृतीतून चीनला हे सांगायचे आहे कि आम्ही या विषाणूला चीनमधून पूर्ण नष्ट केले आहे. चीनचा या दाव्याचा हा सुद्धा मतितार्थ आहे कि कोरोनाचा प्रतीबन्धात्म्क साहित्याचा  मागणीचा पुरवठा करण्यसाठी चीन सक्षम आहे. चीनचा या दाव्यावर अनेकांची असहमती देखील आहे कारण चीनची सर्व माध्यमे हि सरकारी आहेत आणि चीन खरी माहिती लपवत असल्याच मत काही तज्ञ व्यक्त करत आहेत. चीनचा या दाव्याला छेद देणारी आणखी एक गोष्ट म्हणजे चीन कडून सध्या पुरवठा होत असलेल्या साहित्याचा गुणवत्तेबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत म्हणजेच चीनचा पुरवठा संख्यात्मक असला तरी गुणात्मक (गुणवत्ता) नाही. 

चीनची सारवासारव 
चीनला कोरोन विषाणूचा प्रादुर्भावाचा आर्थिक फटका बसला नाही अस चित्र चीन निर्माण करू पाहत आहे. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे चीनमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यापासून तो नियंत्रणात येई पर्यंत २ कोटी १० लाख मोबाईल सीम कार्ड चीनमध्ये निष्क्रिय झाले आहेत असा अहवाल चीनमधील वायरलेस नेटवर्क सेवा देणाऱ्या संस्थेने दिला आहे. हा आकडा विस्थापितांचा आहे अस देखील म्हटल जात  आहे.

मनुष्यबळाची हानी उत्पादानला  घातक 

चीनच्या माध्यमांनी केवळ ३२८७ लोकांचा कोरोनाचा देशातर्गत फैलावामुळे मृत्यू झाल्याचा दावा केला आहे, हि गोष्ट वरील गोष्टीला जोडून पाहिल्यास चीनच्या या दाव्यावर शंका उपस्थित होते. चीनचा दावा जर असत्य असेल तर हि मनुष्यबळाची प्रचंड हानी आहे हे दर्शवते. मनुष्यबळाची हानी हि उत्पादानला प्रचंड घातक आहे. तसेच संसर्ग  इतका मोठा असेल तर अशा उत्पादनचा वापर करताना देशांना भीती वाटणे निश्चित आहे. चीन माहिती लपवत असल्याचा आरोप अमेरिका अनेक वेळा करत आहे तर चीन काहीही माहिती लपवत नसल्याचा अमेरिकेवर प्रत्यारोप चीन करत आहे. अमेरिका आणि काही मोजकी राष्ट्रे सोडून इतर कोणताही देश चीनवर थेट आरोप करताना दिसून येत नाही. चीन वर आरोप न करण्यामागे अनेक राष्ट्रांचा उत्पादन क्षेत्रातला कमकुवत पणा आहे म्हणजेच इथे चीन आपल्या उत्पादन क्षमतेचा मक्तेदारीवर शिक्का मोर्तब करत आहे.

जागतिक बाजारपेठेतील अनेक निर्मिती करणारे साधन सामग्री आणि साहित्य हे चीनमध्ये आहे तर विकसित राष्ट्रामध्ये अशा साधन सामग्री आणि साहित्याचा तुटवडा आहे, याच बरोबरच विकसित राष्ट्रांच मनुष्यळ हे कोरोना पासून बचावात्मक पवित्र्यात आहे ज्यामुळे या मनुष्यबळाचा वापर उत्पादननिर्मितीसाठी होण्याची शक्यता फार कमी आहे. अमेरिका याला प्रत्युत्तर म्हणून डिफेन्स प्रोटेक्शन एकट अंतर्गत आपल्या नामांकित क्मप्न्याना व्हेन्टीलेटर बनवण्याची परवानगी देत आहे. 

चीन-अमेरिका आरोप प्रत्यारोप 
चीनने जागतिक आरोग्य संघटनेचा सदस्यांना चौकशीसाठी बोलावल्याने चीनने पुरावे नष्ट केले का ? अशी देखील शंका उपस्थित होत आहे, याउलट चीन अमेरिकेला आव्हान देत आहे कि अमेरिकेने जागतिक आरोग्य संघटनेच्या सदस्यांना अमेरिकेत येऊ द्यावे.  चीनच्या आरोपामुळे संशयाची सुई अमेरिकेकडे वळते. काही अंतरराष्ट्रीय माध्यमांनी चीनचे राष्ट्रपती शी झिन्पिंग यांच्या विरोधात चीनचा कम्युनिस्ट पक्षाच्या काही सदस्यांनी कोरोनाची परिस्थिती नीट हाताळली नसल्याचा आरोप केल्याचे वृत्त देखील पुढे आणले आहे.

म्हणजे ‘कोरोना हा झिन्पिंग यांचाविरोधातील कट होता का ?’ या सिद्धांताला देखील वाव मिळतो ज्यामुळे अमेरिकेवरील संशयाच्या दाव्याला काही ठिकाणी दुजोरा मिळत आहे. कारण व्यापार युद्धात चीन जास्त काळ अमेरिकेला आव्हान देईल असे अमेरिकेला सुद्धा वाटले नव्हते म्हणून आपल व्यापारी वर्चस्व टिकवण्यासाठी अमेरिकेन हा कट केला असण्याची शक्यता फेटाळता येत नाही. कोरोनाच्या विरोधात अमेरिका अजूनही लॅाकडाऊन चा विचार करत आहे.

अमेरिकेतील व्यक्तीस्वातंत्र्याच्या नागरी जाणीवेमुळे किंवा संघराज्य पद्धतीमुळे लॅाकडाऊनच्या निर्णयाला विरोध होईल आणि लॅाकडाऊन म्हणजे अमेरिकेसारख्या तंत्रज्ञानाने प्रगत राष्ट्राचे कोरोनाविरूद्धचे अपयश हि ट्रम्प प्रशासनाच्या मनातील भीती असू शकते , ज्यामुळे कोरोनाचा अटकाव करण्यात ट्रम्प प्रशासन असफल होत आहे. या सर्वातून अमेरिका तंत्रज्ञानात कमकुवत आहे असे देखील जाणवत आहे . तसेच आज कोरोना पासून वाचण्याठी लागणारी साहित्याची मागणी अमेरिका पूर्ण करू शकत नाही.

चीनची आर्थिक हानी
आर्थिक वर्चस्व मिळवण्यासाठी चीन स्वताची व्यापारी केंद्रे पुन्हा सुरु करत आहे आणि पाश्चिमात्य देशातील कंपन्यांचे शेअर्स विकत घेत आहे असे देखील काही दावे समोर येत आहेत. या दाव्याची सत्यता पडताळत असतान हे देखील लक्षात घेणे गरजेच आहे कि या विषाणूमुळे चीनच्या स्वताच्या तिमाही मधील आर्थिक वाढीचा दर ९ % पेक्षा खाली येईल असे अनेक आर्थिक संस्थांनी भाकीत केले आहे. जगातील दुसर्‍या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या चीनी अर्थव्यवस्थेत जीडीपीची वाढ सन २०१९ मध्ये ६.१ % वरून केवळ १% किंवा २% पर्यंत घसरू शकेल, असे चिनी सरकारच्या अर्थशास्त्र विश्लेषकांच्या ताज्या अंदाजानुसार वर्तवण्यात आले आहे.

जागतिक बँकेने या आठवड्याच्या सुरूवातीला चीनची १४  ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था अजिबात वाढू शकत नाही, असा इशारा दिला आहे . चीन अमेरीकेमध्ये दीर्घ काळ व्यापारयुद्ध सुरु होते याचा आर्थिक फटका देखील चीनला बसला आहे . चीनचा वूहान प्रांतात जगातील ५०% हून अधिक मेमरी डिस्क ची निर्मिती होते जिचा वापर लॅपटॅाप आणि संगणक या मध्ये माहिती साठवण्यासाठी होतो . कोरोना चा प्रादुर्भावामुळे हा प्रांत अधिक काळ बंद होता ज्यामुळे चीनला याचा आर्थिक फटका बसेल हे नक्कीच. चीन केवळ मास्क आणि औषधी साहित्याची व्यापारी निर्यात करून स्वताची आर्थिक घडी व्यवस्थित बसवेल या दाव्यावर विश्वास ठेवता येणार नाही. कारण कोरोनावरचे हे बचावात्मक साहित्य आहे उपचार नाही. 

चीनी व्यापाराचे प्रारूप 
चीन हा मुख्यत्वे नोन-ब्रांड वस्तूंमधला, कच्चा माल आणि यंत्रांचे भाग यामध्ये मोठा व्यापारी देश आहे याउलट पाश्चिमात्य प्रगत राष्ट्र हि त्यांचा ब्रॅडेड कंपन्याच्या गुणवत्तापूर्ण उतप्द्नामुळे आणि बौद्धिक संपत्तीच्या जीवावर निर्मित सेवांमुळे आर्थिक दृष्ट्या समृद्ध आहेत. सध्या स्थितीला जो दावा केला जात आहे कि चीन या नामांकित कंपन्यामधील शेअर्स विकत घेऊन या कंपन्या स्वताच्या मालकीचा करू पाहत आहे, अशा नीतीने चीनला यश येईल असे वाटत नाही, कारण जगावर आर्थिक मंदीचे संकट आल तर या नीती पासून चीनला लाभ होईल असे वाटत नाही.

जागतिक मंदीमुळे या कंपन्याच्या वस्तूंना मागणी नसेल तर केवळ उत्पादन/पुरवठा करून काय करणार ? अर्थशास्त्राचा मागणी आणि पुरवठा हा मुख्य सिद्धांत आहे. उदाहरणार्थ; चीनने एम जी हि इंग्लडची गाडी बनवणारी कंपनी विकत घेतली आहे पण जर भारतात मंदी आली तर या गाडीचा खप होणार नाही , म्हणजेच खप नसेल तर नफा कोठून येईल? त्यामुळे केवळ परकीय कंपन्या विकत घेतल्या तरी जगावरील आर्थिक अरिष्ट टळल्याशिवाय चीनला या नीतीचा लाभ त्यांना होईल असे सांगता येत नाहि. कोरोनामुळे होणाऱ्या जागतिक आर्थिक नुकसानीचा तीव्रतेचा अंदाज सुद्धा आपण आज लावू शकत नाही.

जागतिक व्यापारी संघटना , जागतिक बँक, अंतरराष्ट्रीय नाणे निधी या जगातील आर्थिक विकासाच्या मार्गदर्शक संस्था आहेत आणि यामधील पाश्चिमात्य देशांचे वर्चस्व सहज नाकारता येणार नाही. जगाला या आर्थिक संकटातून बाहेर काढण्यसाठी या संस्थाचा आधार हा घ्यावाच लागेल. यामुळे केवळ पाश्चिमात्य नावजलेल्या कंपन्या मिळवल्या तरी त्या कंपनीच्या मालविक्रीसाठी ग्राहक हवा आणि हा ग्राहक तेव्हाच मिळेल जेव्हा जगावरील आर्थिक संकट टळेल .

चीनचे नेतृत्व मान्य करतील का?

चीनचा आणि अमेरिकेचा व्यापरातील वर्चस्ववाद सिद्ध करण्यासाठीच  कोरोना विषाणूचा उगम आहे या दाव्याला समर्थन करणारी मांडणी जगभरातून अधिक आहे हे नक्की . दोन राष्ट्रामधील व्यापरी वर्चस्ववादाचा प्रभाव साऱ्या जगावर झालेला आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. जगातील प्रत्येक औद्योगिक क्षेत्र या पासून प्रभावित झाले आहे. या विषाणूपासून ज्या देशांना चीन औषधी साहित्य पाठवून वाचवेल त्यांचासाठी चीन हा संरक्षक असेल आणि दुसरीकडे स्वरक्षणासाठी प्रयत्न करणारे विकसित देश हे हतबल असतील. सध्या स्थितीला औषधी साहित्याचा पुरवठा म्हणजेच संरक्षण हाच व्यापाराचा मुद्दा राहील,  त्याचबरोबर ज्या देशांना चीन कोरोना विरूद्ध सहकार्य करेल ते देश भविष्यात चीनचे नेतृत्व मान्य करतील का? या प्रश्नाचे उत्तर हे जागतिक राजकारणाची भविष्यातील दिशा ठरवेल.

गजानन ज साळुंखे 

लेखक शिवाजी विद्यापीठाचे
(सहाय्यक संचालक/ सहाय्यक प्राध्यापक , 
कोल्हापूर )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona commercial supremacy kolhpur marathi news