आमची कोणतीही चाचणी घ्या पण आम्हाला घरी जाऊ द्या ओ... 

corona effect on sugarcane workers in ichalkaranji
corona effect on sugarcane workers in ichalkaranji

इचलकरंजी - आमची कोणतीही चाचणी घ्या, गावामध्ये गेल्यानंतर आम्ही तेथील प्रशासन सांगेल ते नियम पाळतो मात्र आम्हाला आमच्या मुळ गावी सोडा. आमचे वयस्क मायबाप आमची आतुरतेने वाट पाहत आहेत. अशी आर्त विनवणी हातकणंगले आणि शिरोळ तालुक्यात असलेले ऊस तोडणी कामगार करीत आहेत. या दोन्ही तालुक्यातील पाच कारखान्याचे तब्बल 950 टोळ्यामधून 15 हजारहून अधिक कामगार लॉकडाऊनमध्ये अडकले आहेत. त्यांना कोणत्याही स्थितीत आपल्या मुळ गावी पोहचायचे आहे.

दरम्यान यातील अनेक टोळ्या कर्नाटकमार्गे जत, पंढरपूरकडे जाण्यासाठी चोरवाटा शोधत आहेत. त्याचबरोबर रात्रीतून अनेक टोळ्या पसार होत आहेत. या पार्श्‍वभूमीवर आता कारखाना प्रशासनच आपापल्या कार्यक्षेत्रात असलेल्या टोळ्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. लॉकडाउन झाले तरी ऊस तोडणी हंगाम संपला की आपल्याला गावाकडे जायची परवानगी मिळणार अशीच भावना अनेकांची होती. मात्र एका जिल्ह्यातून दुसर्‍या जिल्ह्यात कामगार येताना प्रत्येक ठिकाणी नाकाबंदी सुरू झाली आहे. यामुळे जिथे आहे तिथेच कामगारांना ठेवण्यात आले आहे. दिवसभर कडाक्याचे ऊन, खायला जेमतेम धान्य आणि लहान मुलांची सुरू असलेली घुसमट कुटुंब प्रमुखाला पहावेना. दुसर्‍या बाजूस अनेक कामगारांचे जेष्ठ आई वडिल गावाकडे आपला मुलगा कधी परत येतो याकडे डोळे लावून बसले आहेत. कोरोना संसर्गाची भिती कामगारांच्या कुटुंबियांनाही लागून राहिली आहे.

या पार्श्‍वभूमीवर काही टोळ्या रातोरात कर्नाटकातील मंगसुळीमार्गे जत, पंढरपूरकडे प्रयाण होत आहेत. मात्र एका ट्रॅक्टरचा अपघात झाल्यानंतर आता कडक नाकेबंदी करण्यात आली आहे. दुसर्‍या बाजूस कारखाना प्रशासनावर खटला दाखल होत असल्याने आता कारखान्यांनीही अशा टोळ्या स्थलांतरीत होऊ नयेत यावर लक्ष केंद्रीत केले आहे.

तब्बल 40 ट्रॅक्टर परत

गेल्या दोन दिवसात हातकणंगले आणि शिरोळ तालुक्यात तब्बल 40 ट्रॅक्टरमधून टोळ्या आपल्या मुळ गावाकडे जात होत्या. मात्र या टोळ्या बार्शी आणि बीडच्या सीमेवरच अडविण्यात आल्या. त्यानंतर ज्या कारखान्यावर या टोळ्या आल्या होत्या त्यांना तिथेपर्यंत परत पाठविण्यात आले आहे. त्यामुळे चोरून गावाकडे जाण्याच्या वाटा बंद झाल्या आहेत.

मार्चच्या शेवटच्या आठवड्यात गावाकडे परतून शाळूची मळणी करायची अशा पध्दतीने नियोजन होते. आता आम्ही गावाकडे परत न गेल्याने आलेल्या पीकाला मुकावे लागणार आहे. दुसर्‍या बाजूस वयोवृध्द आई -वडिल आम्ही परत येण्याच्या मार्गाकडे डोळे लावून बसले आहेत. कोणत्याही तपासण्या करा मात्र आम्हाला आमच्या मुळ गावी पोहचवा.
किसन राठोड - पात्री, बीड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com