in shivaji university hostels are reserved for isolation ward
in shivaji university hostels are reserved for isolation ward

शिवाजी विद्यापीठातील वसतिगृह होणार आयसोलेशन रुग्णालय : कोरोनाच्या पार्श्वभुमीवर निर्णय 

कोल्हापूर - देशात कोरोना विषाणू संसर्गाच्या अनुषंगाने उद्भवलेल्या अभूतपूर्व आपत्कालीन परिस्थितीमध्ये कोल्हापूर जिल्हा प्रशासनाच्या आवाहनाला सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून सकारात्मक प्रतिसाद देताना शिवाजी विद्यापीठाने आपले तंत्रज्ञान अधिविभागाचे वसतिगृह अधिग्रहणासाठी उपलब्ध करून दिले आहे. कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर हे या व्यवस्थेचे समन्वयक अधिकारी म्हणून काम पाहात आहेत, अशी माहिती शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी आज येथे दिली.

कुलगुरू डॉ. शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांची १एप्रिलला सकाळी विद्यापीठाच्या अतिथीगृहात जिल्हाधिकारी  दौलत देसाई यांच्यासमवेत सविस्तर चर्चा झाली. श्री. देसाई यांनी विद्यापीठातील विविध वसतिगृहांची अधिग्रहणाच्या अनुषंगाने पाहणी केली. त्यानंतर त्यांची कुलगुरू, प्र-कुलगुरू यांच्यासमवेत चर्चा झाली.

जिल्हाधिकारी देसाई यांनी कोरोना विषाणूबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता अतिरिक्त दक्षतेचा उपाय म्हणून उपचारांसाठी पर्यायी व्यवस्था करणे आवश्यक असून त्या दृष्टीने वसतिगृहांचे अधिग्रहण करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले.

त्यावर कुलगुरू डॉ. शिंदे व प्र-कुलगुरू डॉ. शिर्के यांनी विद्यापीठाच्या विविध वसतिगृहांत सुमारे ३००० विद्यार्थी-विद्यार्थिनी राहतात. लॉकडाऊन उठविल्यानंतर अर्थात १५ एप्रिलनंतर सदर विद्यार्थी स्थगित केलेल्या परीक्षांसाठी पुन्हा वसतिगृहांत दाखल होतील. त्यांची पर्यायी निवास व भोजन व्यवस्था करणे अशक्य असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले. विद्यापीठाच्या या विद्यार्थी हिताच्या भूमिकेचे स्वागत करीत जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी अतिरिक्त पर्यायी व्यवस्था म्हणून तंत्रज्ञान अधिविभागाकडील विद्यार्थी व विद्यार्थिनी वसतिगृहे अधिग्रहणासाठी उपलब्ध करण्याविषयी सांगितले. त्याला कुलगुरू डॉ. शिंदे यांनी संमती दिली.

कुलगुरू डॉ. शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, तंत्रज्ञान अधिविभागाच्या विद्यार्थी व विद्यार्थिनी वसतिगृहांत मिळून एकूण ५०० बेडची व्यवस्था आहे. ही वसतिगृहे जिल्हा प्रशासनाला अधिग्रहणासाठी उपलब्ध करून देण्यात येतील. उद्भवलेल्या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता सदर आपत्कालीन परिस्थितीत जिल्हा प्रशासनाला सर्वोतोपरी सहकार्य करण्यास विद्यापीठ प्रशासन सदैव तत्पर असल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, विद्यापीठातील वरिष्ठ अधिकारी, वसतिगृहांचे रेक्टर आदींशी चर्चा करून जिल्हा प्रशासनाच्या निर्देशानुसार सदर वसतिगृहे हस्तांतरित करण्याच्या दृष्टीने सर्व आवश्यक ती व्यवस्था करण्याच्या सूचना कुलगुरूंनी कुलसचिवांना केल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com