कोल्हापुरातील चंदगडमधील 'हे' गाव बनलय कोरोना हॉट स्पॉट ! 

सुनील कोंडुसकर 
मंगळवार, 30 जून 2020

सुमारे दहा गावांना मध्यवर्ती बाजारपेठ असलेल्या या गावात दक्षता समितीकडून योग्य काळजी घेतली गेली नाही असा प्रशासनाचा ठपका आहे.

चंदगड - महाराष्ट्र, कर्नाटकपासून मध्यप्रदेशपर्यंत जनावरांच्या बाजारासाठी प्रसिध्द असलेले अडकूर (ता. चंदगड) हे गाव सद्या कोरोनाचा हॉट स्पॉट बनले आहे. या एकाच गावात आठ जण पॉझीटीव्ह आले असून त्यापैकी एकाचा मृत्यू झाल्याने प्रशासनाने या गावावर लक्ष केंद्रीत केले आहे. बाधीतांच्या संपर्कातील शेकडो नागरिकांना तालुका कोरोना केअर सेंटरमध्ये क्वारंटाईन करण्यात आल्याने संपूर्ण गाव चिंतेच्या सावटाखाली आहे. 

सुमारे दहा गावांना मध्यवर्ती बाजारपेठ असलेल्या या गावात दक्षता समितीकडून योग्य काळजी घेतली गेली नाही असा प्रशासनाचा ठपका आहे. त्याचबरोबर स्थानिक काही नागरीक आणि काही व्यापाऱ्यांकडून समितीला दूर्लक्षित करण्याची चूक आता संपूर्ण गावाला भोगावी लागत आहे. बाजारपेठेतील व्यवहार कशा पध्दतीने केले जावेत याबाबत दक्षता समितीने नियम गठीत करण्याचा प्रयत्न केला. परंतु ते धाब्यावर बसवण्यात आले. यात बडे व्यापारी आणि त्यांना साथ देणारे काही लोक यामुळे समिती हतबल ठरली. सांगूनही ऐकत नसतील तर होऊ दे काय व्हायचे ते अशा प्रकारची मानसिकता तयार झाल्याने रान मोकळे झाले. केवळ आर्थिक लाभ विचारात घेऊन नियमांचे उल्लंघन करुन व्यापार, व्यवसाय करणारे निवांत आहेत. सर्वसामान्य माणूस, ज्याची कोणतीही चूक नव्हती त्याला मात्र त्रास सहन करावा लागतोय याबद्दल तीव्र भावना व्यक्त होत आहेत. 

दरम्यान अडकूरबरोबरच जवळच्या मुगळी गावात बाधीत रूग्ण सापडले आहेत. हे सर्वजण स्थानिक आहेत. बाहेरुन येणारे नागरीक संस्थात्मक क्वारंटाईन होते. त्यांचा इतरांशी संपर्क येत नव्हता. परंतु स्थानिक नागरीकांवर असा संशय घेण्याचा प्रश्‍नच नसल्याने त्यांचा वावर सहज होता. गावाबरोबरच परिसरातील गावात ते वावरले असल्याने शेकडो नागरीकांशी संपर्क आला आहे. त्यामुळे धोक्‍याची पातळी वाढली आहे. 

संपर्कातील प्रत्येक नागरिकांची तपासणी हवी 
अडकूरपासून अवघ्या सहा-सात किलो मीटरवर नेसरी (ता. गडहिंग्लज) हे बाजारपेठेचे गाव आहे. या परिसरातील नागरीक या दोन्ही बाजारपेठांशी संबंधीत असतात. समुह संसर्ग रोखायचा असेल, तर बाधीताच्या संपर्कातील प्रत्येक नागरिकांची तपासणी गरजेची आहे. प्रशासनावर याचा मोठा ताण आहे. त्यामुळे नागरीकांनी स्वतःहून काळजी घेण्याची गरज आहे. 

हे पण वाचा -   ...अन्यथा आंदोलन ; मराठा क्रांती मोर्चाचा इशारा

 

हे पण वाचा -   मोठी बातमी ; अंत्यसंस्काराहून परतत असताना त्याला कोरोना असल्याचे समजले अन्...

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona hotpot of Adkur kolhapur chandgad