
कोल्हापूर : "खोल्या भाड्याने देणे आहे..', असा फलक नजरेस पडला तरी नेमक्या कोणाच्या खोल्या भाड्याने द्यायच्या आहेत, याची माहिती मिळते तसेच त्याची चौकशी केली जाते. फ्लॅट रिकामा व्हायचा अवकाश, त्यासाठीही उड्या पडायच्या. कोरोना संसर्गामुळे मात्र खोल्या किंवा फ्लॅट भाड्याने देण्याच्या व्यवहारांचे अर्थकारण बिघडले आहे.
लोक खोल्या भाड्याने द्यायला तयार नाहीत आणि ज्यांचा करार संपला आहे, ते फ्लॅट सोडायला तयार नाहीत, अशी स्थिती शहरात निर्माण झाली आहे. एखाद्या सोसायटीत शहरातील किंवा जिल्ह्यातील कोणी राहण्यासाठी येणार असेल तर त्याची तातडीने चौकशी सुरू होते. संबंधिताकडे वैद्यकीय प्रमाणपत्र आहे का? लोक कुठून आलेत? कोणाच्या सांगण्यावरून येथे आला? असा चौकशीचा ससेमिरा मागे लागतो. दरवर्षी शाळा सुरू होण्याच्या आधी मेमध्ये फ्लॅट भाड्याने देण्याच्या व्यवहारात वाढ होते. जे बदलीवर जाणार आहेत, ते फ्लॅट रिकामा करतात. मात्र, कोविडमुळे 11 महिन्यांचा भाडेकरार संपूनही त्यांनी फ्लॅट सोडलेला नाही.
लिव्ह ऍन्ड लायसननुसार पाच वर्षांपर्यंत घर, फ्लॅट भाड्याने देता येतो. प्रीमियम तसेच भाड्याचा विचार करून त्यावर मुद्रांक शुल्क आकारले जाते. ऑनलाईन पद्धतीने या व्यवहारांची नोंद होते. 99 वर्षांच्या करारानेही व्यवहार होतो; मात्र या पद्धतीने व्यवहार फारसे नोंदले जात नाहीत. मार्चपासून लॉकडाउन झाल्यानंतर ज्यांनी दुकानगाळे भाड्याने दिले त्यांची पंचाईत झाली. शटर डाउन असल्यामुळे भाडेकरूचा व्यवसाय बंद होतो. त्यामुळे तोही महिन्याचे भाडे देऊ शकत नव्हता. परजिल्ह्यातून बदली होऊन येणारे लोक त्या त्या ठिकाणी अडकून पडले आहेत. शाळा, महाविद्यालये बंद आहेत. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी लॉकडाउनमध्ये शहर सोडून गेले आहेत. त्यामुळे भाड्याच्या उत्पन्नाचा हा स्रोत थांबला आहे.
लिव्ह ऍन्ड लायसननुसार नोंदल्या जाणाऱ्या व्यवहारांची संख्या कमी झाली आहे. नोंदणी ऑनलाईन होत असली तर दुय्यम निबंधकांचे शिक्कामोर्तब व्हावे लागते. महिन्यातून एक ते दोन व्यवहारांची नोंद लिव्ह ऍन्ड लायसन या टायटलखाली होते आहे.
- बी. के. पाटील, प्रभारी दुय्यम निबंधक
कोरोनामुळे फ्लॅट भाड्याने घ्यायला कुणी तयार नाही. जाहिरात दिली तरी प्रतिसाद नाही. लोक चौकशी करतात, पुढे काहीच होत नाही. ज्यांची उपजीविका भाड्यावर आहे अशांची अडचण झाली आहे. शाळा-महाविद्यालये बंद असल्याने विद्यार्थी राहण्यासाठी येतील म्हटले तर तेही नाहीत.
- मिलिंद कुलकर्णी, ज्येष्ठ नागरिक
दृष्टिक्षेप
- करार संपला तरी भाडेकरू फ्लट सोडण्यास तयार नाहीत
- दुकानगाळे भाड्याने दिलेत त्यांचीही पंचाईत
- व्यवहारच नसल्याने भाडेकरून भाडे देण्यास असमर्थ
- विद्यार्थीही गावी गेल्यामुळे भाड्याच्या उत्पन्नाचा स्त्रोत थांबला
संपादन : प्रफुल्ल सुतार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.