कोविड सेंटरमध्ये बारसे : अन् बाळ, बाळंतिणीला मिळाला आधार

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 16 September 2020

कोरोना पॉझिटिव्ह माता कोविड सेंटरमध्ये झाल्या बऱ्या

कोल्हापूर : प्रयाग चिखली (ता. करवीर) येथील महिलेचे सासर मुंबई. तीन महिन्यांपूर्वी बाळंतपणासाठी त्या माहेरी आल्या.
 शहरातील खासगी रुग्णालयात गरोदरपणात त्यांच्यावर उपचार सुरू होते. गुरुवारी ( ३) त्यांना प्रसव वेदना सुरू झाल्या. त्यांना दवाखान्यात नेले मात्र कोरोना चाचणी केल्याशिवाय दवाखान्यात घेतले नाही. त्यामुळे स्वॅब टेस्ट केली. अहवाल पॉझिटिव्ह आला.

त्यानंतर मात्र दवाखान्याने त्यांना घ्यायला नकार दिला. अशातच एका सेवाभावी डॉक्‍टरांनी गांभिर्य ओळखून प्रसुती केली. रात्री एकच्या सुमारास कन्यारत्न जन्मले. कोरोना पॉझिटीव्ह असल्याने आता कोणत्या दवाखान्यात दाखल करायचे?, असा प्रश्‍न होता. महिलेच्या मामांनी व्हाईट आर्मीशी संपर्क साधला. प्रसूतीनंतर लगेचच त्याच रात्री दोन वाजता त्यांना व्हाईट आर्मी आणि मेडिकल असोसिएशनच्या कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल केले.

हेही वाचा- भांडाफोड : अखेर व्हिजन आले गोत्यात ; खुडेचा पर्दाफाश

 

या मायलेकी दोघीही बऱ्या असून आज त्यांना डिस्चार्जही दिला. या मातेचे नाव अमृता सचिन गुरव. त्यांचे मामा बाळकृष्ण गुरव यांनी व्हाईट आर्मीच्या कोविड सेंटरमध्ये त्यांना दाखल केले. अमृताला डॉ. आबाजी शिर्के व डॉ. अमोल कोडोलीकर यांच्या देखरेखीखाली उपचार केले. व्हाईट आर्मीच्या नर्स हिना यादवाड यांनी त्यांची काळजी घेतली. 

हेही वाचा- तरूणाने नदीतील दगडी दीपमाळेवरून  पाण्यात उडी मारताच पोलीसांच्या उरात भरली धडकी

 

 व्हाईट आर्मी कोविड सेंटरमध्ये बारसे
बुधवारी ( १६) व्हाईट आर्मीतर्फे नवजात कन्येचा नामकरण समारंभ साजरा होणार आहे. यात व्हाईट आर्मीच्या कोविड केअर सेंटरमधून जितक्‍या महिला कोरोनामुक्त झाल्या आहेत, त्या कोविड सेंटरमध्ये परत येणार आहेत.

संपादन -  अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona positive mothers born at the Covid Center