हुपरीत उडाली खळबळ ; कोरोनाचा पारा वाढतोय...

बाळासाहेब कांबळे
गुरुवार, 16 जुलै 2020

दोनच दिवसांपूर्वी सीपीआर रूग्णालयात मृत्यू झालेल्या एका वृद्धेला कोरोना झाल्याचे आढळून आले होते.

हुपरी - दोनच दिवसांपूर्वी मृत्यू झालेल्या येथील एका महिलेला कोरोना संसर्ग झाल्याची घटना ताजी असतानाच आज एकाच वेळी येथील दोघा जणांना कोरोना संसर्ग झाल्याचे तपासणी अहवालात स्पष्ट झाले आहे. याबाबतचे वृत्त सकाळी धडकताच खळबळ उडाली.

यामुळे शहरातील कोरोना बाधितांची संख्या चार वर पोहोचली असून यापैकी एक उपचारानंतर पुर्णपणे बरा झालेला आहे. तर एक मयत आहे. दरम्यान, चंदेरी नगरी हुपरीत कोरोनाचा शिरकाव वाढू लागल्याचे चित्र ठळक होत चालले असून गेल्या चार महिन्यांपासून निर्धास्त असलेल्या शहरवासियांची मात्र झोप उडाली आहे.

वाचा - ते भेदभाव वेदनादायक ; वडील गेल्याचे दु:ख आवरायचे की लोकांच्या प्रश्नांना उत्तरे द्यायची?

गत जून महिन्यात पुण्याहून येथे आलेल्या एका निवृत्त शासकीय अधिकाऱ्यास कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र, औषधोपचारा नंतर तो ठणठणीत झाला होता. संबंधित व्यक्ती हुपरीची जरी असली होती तरी ती बाहेरगावाहून कोरोना बाधित होऊन येथे आली होती. त्यामुळे शहरवासियांना हायसे वाटले होते.

दरम्यान, दोनच दिवसांपूर्वी सीपीआर रूग्णालयात मृत्यू झालेल्या एका वृद्धेला कोरोना झाल्याचे आढळून आले होते. मृत महिला येथील स्थानिक होती. त्यामुळे लोकांत भिती व्यक्त होत होती. मृत महिलेच्या संपर्कात आलेल्या लोकांच्या कोरोना तपासणी अहवालाची एकीकडे प्रतिक्षा असतानाच आज आणखी दोघांना कोरोना लागण झाल्याचे स्पष्ट झाले. बाधित दोघेही स्थानिक आहेत.

वाचा - लई भाई ! आयटीआय शिकतानाच या 'रॅंचो' ने बनवली नऊ यंत्रे...

दोन दिवसात तीन रुग्ण आढळून आल्याने शहरात कोरोनाचा समुह संसर्ग होण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे लोकांत कोरोनाची धास्ती निर्माण झाली आहे.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी मृत कोरोना पाॅझिटिव्ह महिलेच्या सहा नातेवाईकांचा कोरोना तपासणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. तर आज सकाळी गावभागातील बिरदेव मंदिर परिसरातील एक साठ वर्षीय व माळी गल्लीतील ४७ वर्षिय पुरुष अशा दोघांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे पालिका व आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. पालिके कडून बाधित रूग्ण परिसर तत्काळ सील करून सॅनिटायझर व औषधाची फवारणी केली जात आहे.

 

संपादन - मतीन शेख


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona positive patient found in hupari