रात्रीच्या कमाईवर उद्याचा दिवस, पण "त्या'आता करतात तरी काय? 

corona virus effect on prostitution business
corona virus effect on prostitution business

कोल्हापूर : त्यांना पोटासाठी रस्त्यावरच थांबावे लागते. रात्री उशिरापर्यंत त्यांची जगण्याची धडपड सुरू असते; पण लॉकडाउनमुळे आता महिना झाला त्या रस्त्यावर उभ्या नाहीत. संपर्काचा तर प्रश्‍नच नाही. मग त्यांच्या पोटापाण्याचं काय? आणि आता त्या करतात तरी काय? शहर व परिसरातील वारांगणांच्या वाट्याला रोज भेडसावणारा हा प्रश्‍न आहे. आज रात्रीच्या कमाईवर उद्याचा दिवस, असा त्यांच्या जगण्याचा हिशेब आहे; पण हा सारा हिशेबच विसकटला आहे आणि आता इथेच तुम्हा-आम्हा सर्वांची जबाबदारी आहे. 

शरीर विक्रय करणाऱ्या या प्रत्येक भगिनीची कथा आणि व्यथा वेगळी आहे. त्यांचा जगण्याचा संघर्ष इतर कष्टकऱ्यांच्या तुलनेत खूप वेगळा आहे. परिस्थितीचे फासे असे विचित्र की, त्यांना या व्यवसायात पडावेच लागले आहे. मान नाही, सन्मान नाही. उलट लोकांच्या विखारी नजरांना नजर देत देत त्यांचे आयुष्य कसेबसे चालू आहे; पण लॉकडाउनमुळे रात्री रस्त्यावर उभारणे बंद आणि पर्यायाने उदरनिर्वाहाचे साधन बंद झाले आहे.


कोल्हापुरात फोर्ड कॉर्नर, लक्ष्मीपुरी, लक्ष्मी रोड, स्टेशन रोड या परिसरात रात्री या भगिनी उभ्या असतात. आपण कल्पनाही करू शकणार नाही, असे आयुष्य जगत रोज कमी-अधिक कमाई करतात आणि कुटुंब जगवतात. शहरात त्यांना कोणी भाड्याने खोली देत नाही. त्यामुळे त्या शहरालगतच्या कमी भाडे आकारल्या जाणाऱ्या वस्त्यांत राहतात. रोज रात्री उशिरा घरी जातात. 

आता लॉडाउनमुळे त्या घराबाहेरही पडलेल्या नाहीत. रेशन कार्डावर मोफत मिळणारे धान्य आणायला गेल्या; पण बहुतेकींची रेशनकार्ड आधार लिंकिंग नसल्यामुळे त्यांना धान्य मिळालेले नाही. यांचे संघटन आहे; पण सगळ्या कधी एकत्र येऊ शकत नाहीत. त्यांची राहण्याची ठिकाणे वेगवेगळी व लांब लांब अंतरावर आहेत. त्यामुळे सर्वांना एकत्रित करणे शक्‍य होत नाही. अलीकडे त्यांच्या व्यवसायाचा संपर्काचा भाग म्हणून प्रत्येकीकडे मोबाईल आहे. त्यातून काही जणी एकमेकींच्या संपर्कात आहेत. लॉकडाउनमुळे बाहेर पडायचे नाही, एकमेकींच्या संपर्कात यायचे नाही, हे त्यांनाही मान्य आहे; पण पोट कसे चालवायचे, हा त्यांना क्षणाक्षणाला भेडसावणारा प्रश्‍न आहे. 

या महिला आम्हाला पोटासाठी काही तरी द्या म्हणून कोणापुढे हात पसरायलाही एकत्र येऊ शकत नाहीत. या भगिनींना किमान दोन महिने पुरेल एवढे धान्य, किराणा साहित्य कोल्हापूरकरांनी द्यावे व त्यांच्या जगण्याला थोडाफार हातभार लावावा. लॉकडाउन उठला की, पुन्हा त्यांचे "ते' जीवन त्यांच्या वाट्याला येणार आहे. ते भोगायची त्यांची मनाची तयारी आहे; पण आता खरोखर मदतीची गरज आहे. 

- शारदा यादव, अध्यक्षा, वारांगणा भगिनी 

या महिलांच्या आरोग्य व इतर सामाजिक प्रश्नांसाठी महिला जिल्हा सल्लागार समिती आहे. जिल्हाधिकारी त्याचे अध्यक्ष आहेत. दोनच दिवसांपूर्वी महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे या महिलांच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला. काही संस्था त्यांना मदत करताहेत; पण एकूण रेडलाईट क्षेत्रातील महिलांच्या भावी आयुष्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. 

- बी. जी. काटकर, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com