कोरोनाची दहशत आता वस्त्रोद्योगावर...

संजय खूळ
बुधवार, 4 मार्च 2020

कोरोनाचे वस्त्रोद्योगावर सावट..चीनमधील आयात-निर्यातीवर परिणाम होण्याची शक्‍यता; अस्थिरता कायम....
 

इचलकरंजी (कोल्हापुर) : चीनमध्ये आलेल्या कोरोना संसर्गाची देशातील वस्त्रोद्योगाने मोठी धास्ती घेतली आहे. अद्यापपर्यंत फारसा थेट परिणाम झाला नसला तरी आगामी काळात तेथे निर्यात होणारे कापड आणि तेथून येणारा कच्चा माल याबाबतची अस्वस्थता कायम आहे. त्यामुळे आगामी काळात त्याचा वस्त्रोद्योगावर काय परिणाम होतो याबाबत सध्या अस्थिरतेचे सावट आहे.

भारत आणि चीन वस्त्रोद्योगांमध्ये मोठे देश म्हणून ओळखले जातात. चीनमध्ये तयार होणारे मोठ्या प्रमाणात आधुनिक यंत्रमाग भारतामध्ये आहेत. त्याचबरोबर त्यासाठी लागणारे सुटे भागही चीनमधूनच येतात. सध्या तरी एक-दोन महिने पुरतील एवढे सुटे भाग असल्याने त्याचा फारसा परिणाम जाणवत नाही; मात्र चीनमधील परिस्थिती कधी सुधारणार आणि त्या ठिकाणाहून यंत्रमागासाठी लागणारे सुटे भाग कधी येणार यावर भविष्यातील संकट ठरणार आहे.

हेही वाचा- नाणार वाद पेटला ; भाजपच्या नेत्याचा गौप्यस्फोट....

कापडावर प्रक्रिया करणारे रसायन चीनमध्येच
चीनमधून मोठ्या प्रमाणात विविध देशांमध्ये कापड जाते. त्याचबरोबर बांगलादेशमार्गे भारतातही मोठ्या प्रमाणात कापड येते. तो पुरवठा सध्या बंद असल्यामुळे देशातील उत्पादकांना त्या ठिकाणी आगामी काळात संधी मिळण्याची शक्‍यता आहे; मात्र त्यानंतरची बाजारपेठेची परिस्थिती कशी असेल यावर बरेच काही अवलंबून आहे. कापडासाठी बाजारपेठेची संधी असली तरी कापडावर प्रक्रिया करणारे रसायन मोठ्या प्रमाणात चीनमधून येते. या रसायनांचा पुरवठा थांबल्यास त्याचा परिणाम प्रोसेस उद्योगावर होण्याची शक्‍यता आहे. 

हेही वाचा- सावधान ! रत्नागिरीत 902 वाड्यांना बसणार झऴ...

चीनमध्ये होणारी निर्यात ठप्प ​
यंत्रमागावर विणलेल्या कापडावर प्रक्रिया न झाल्यास त्या पुढील सर्व प्रक्रिया ठप्प होते. त्याचा मोठा फटका उत्पादनावर बसतो. त्यामुळे कापडावर प्रोसेस झालेच नाही तर त्याचा फटकाही बसण्याची शक्‍यता आहे. सध्या चीनमध्ये होणारी निर्यात काही प्रमाणात ठप्प आहे; मात्र चीनमध्ये आयात होणाऱ्या वस्तूंचा पुरवठा थांबल्यास उद्योगावर मोठा परिणाम होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे भविष्यात कोणती परिस्थिती निर्माण होईल याबाबत 
अस्थिरता आहे.

हेही वाचा- क्षणार्धात होत्याचं नव्हतं...काय घडलं?

भविष्यकाळात परिणाम

चीनवरील आलेल्या आपत्तीचा वस्त्रोद्योगावर सध्या तरी फारसा परिणाम जाणवत नाही; मात्र आयात-निर्यातीवर अशीच बंदी राहिल्यास त्याचा परिणाम भविष्यकाळात होण्याची शक्‍यता आहे.
- सतीश कोष्टी, अध्यक्ष, इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशन.

कापसाच्या दरात घट होण्याची शक्यता

चीनमधून बांगलादेशमार्गे मोठ्या प्रमाणात भारतात कापड आयात होते. ते बंद होईल. भारतातून निर्यात होणारे सूत आणि कापूस थांबेल. त्यामुळे सुताच्या आणि कापसाच्या दरात घट होईल, असे वाटते.
-विनय महाजन, अध्यक्ष, यंत्रमागधारक जागृती संघटना.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona virus watch on ichlkarnji city textile business kolhapur marathi news