कोरोनाबाधितांची लपवाछपवी; पत्ता शोधताना प्रशासनाच्या नाकीनऊ

गणेश शिंदे 
सोमवार, 13 जुलै 2020

कोरोना बाधितांकडून टेस्टवेळी पत्ता लपवालपवी प्रशासनाची डोकेदुखी बनली आहे. यामुळे पॉझिटिव्ह रुग्ण नसतानाही भितीचे वातावरणही निर्माण होत आहे.

जयसिंगपूर : कोरोना बाधितांकडून टेस्टवेळी पत्ता लपवालपवी प्रशासनाची डोकेदुखी बनली आहे. यामुळे विनाकारण पॉझिटिव्ह रुग्ण नसतानाही अनेक भागात भितीचे वातावरणही निर्माण होत आहे. रुग्णांकडून चुकीचा पत्ता दिला जात असल्याने त्याचा शोध घेण्याची कसरतही प्रशासनाला करावी लागत आहे. 

जिल्ह्यात काही ठिकाणी असे प्रकार घडल्याने टेस्ट घेतानाच आता रुग्णांचा ओळखपत्रावरुन पत्ता घेण्याची गरज आहे. मात्र, अनेक रुग्ण भाडेकरु असतात काही परराज्यातून आलेलेही असतात. त्यामुळे त्यांचा पत्ता घेण्यात अडचणी निर्माण होत आहेत. जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्‍यात कोरोना बाधीचांचा आकडा वाढत आहे. लॉकडाऊन शिथील केल्यानंतरची संख्या चिंताजनक आहे. सुरुवातीला परराज्यात गेलेले मजूर पुन्हा परतू लागल्याने तर प्रशासनाची डोकेदुखी अधिक वाढली आहे. 

भाडेकरु असणाऱ्या मजूरांनी जाताना खोल्या रिकाम्या केल्या होत्या. आता लवकरच परतायचे नाही या इराद्याने गेलेले मजूर तेथील अडचणींमुळे पुन्हा परतत असल्याने त्यांचे पत्तेही आता बदलले आहेत. मात्र, तपासणीवेळी पूर्वीचाच पत्ता देऊन ते टेस्ट देत असल्याने रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांचा शोध घेताना प्रशासनाची धावपळ होत आहे. रुग्ण नसतानाही अनेक भागात भितीचेही वातावरण निर्माण होत आहे. पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानंतर तो भाग प्रतिबंधीत केला जात असल्याने गैरसोयीचा सामना स्थानिकांना करावा लागतो. तसेच भितीही बाळगावी लागते. 

त्यामुळे आपल्या भागात रुग्ण सापडला, अशी माहिती समजली तरी भिती व्यक्त होत आहे. बऱ्याचदा आता सर्दी, खोकला झाला तरी अनेक जण तपासणी करत आहेत. तपासणीनंतर बऱ्याचदा अहवालास विलंब होतो. ज्यावेळी अहवाल येतो आणि संबंधित संशयीत बाधीत आढळतो त्यावेळी त्याला तातडीने शोधणे हे काम असते. अशावेळी पत्यातील घोळ प्रशासनाची तारांबळ उडविणारा ठरत आहे. यामुळे अनेक भागात भितीचे वातावरण स्थानिकांमध्ये निर्माण होत आहे. 

दृष्टिक्षेप 
- पॉझिटिव्ह रूग्ण नसताना अनेक ठिकाणी नागरिक भयभीत 
- पॉझिटिव्ह रूग्णाकडून चुकीचा पत्ता, प्रशासनाची घर शोधताना कसरत 
- टेस्ट घेतानाच ओळखपत्रावरून पत्ता घेण्याची गरज 
- परगावी गेलेले मजूर परतू लागल्याने, पण पत्ते बदलले 
- स्थानिकांना करावा लागतोय गैरसोयींचा सामना 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Coronation; difficulty of the while searching address