‘सकाळ’ स्टिंग ऑपरेशन : अन्य रुग्णांचा हकनाक बळी

सकाळ वृत्तसेवा
Friday, 14 August 2020

कोरोनाचे भूत रुग्णालयांच्या मानगुटीवर

 ‘सकाळ’कडे मांडले अनेकांनी कटू अनुभव
 

कोल्हापूर : जिल्ह्यात कोरोनाशिवाय इतर रुग्णांनाही कोरोनाची चाचणी केल्याशिवाय रुग्णालयांत घेतले जात नाही. या अलिखित नियमांमुळे इतर रुग्णांनी रुग्णालयांच्या दारात जीव सोडले. ‘सकाळ’ने शहरातील रुग्णालयांत रुग्णांचे नातेवाईक बनून फोन केले. मात्र, रुग्णालयांतून बेड शिल्लक नाहीत, अशी उत्तरे मिळाली. हे वृत्त आज प्रसिद्ध झाल्यावर अनेकांनी कटू अनुभव ‘सकाळ’ला सांगितले. 

रुग्णवािहकेतच जीव सोडला
माझे नातेवाईक शेतकरी होते. त्यांना शहरातील रुग्णालयात दाखल केले होते. सायंकाळी धाप वाढली. त्यामुळे तिथल्या डॉक्‍टरांनी ‘सीपीआर’मध्ये घेऊन जाण्यास सांगितले. ‘सीपीआर’मध्ये दाखल करून घेतले नाही. त्यानंतर, शहरातील इतर रुग्णालयांतही बेड शिल्लक नाहीत म्हणून सांगितले. शेवटी ‘सीपीआर’च्या दारात रुग्णवाहिकेतच त्यांनी जीव सोडला. त्यांना वेळेत उपचार मिळाले असते तर त्यांचा जीव वाचला असता, असे पाडळी खुर्द येथील तरुणाने सांगितले.

हेही वाचा- ‘मी चुकूच शकत नाही,  शौमिका यांच्या टि्वटची राजकीय क्षेत्रात चर्चा -

यंत्रणेला पाझरच फुटेना
तुमच्या वडिलांची कोरोनाची तपासणी केली आहे का, नसेल तर तपासणी करून घ्या, नंतर रुग्णालयात दाखल करून घ्यायचे की नाही, ते ठरवतो, असे प्रत्येक रुग्णालयात सांगण्यात आले. म्हणून रात्रभर वडिलांना रुग्णालयात घेऊन दवाखाने पालथे घातले. शेवटी चालकाला हाल पाहावले नाहीत, त्यांनी रुग्णवाहिका जिल्हाधिकाऱ्यांच्या घरी घेतो, त्यांनाच रुग्णाचे काय करू, अशी विचारणा करण्याचा सल्ला दिला. सैनिक दरबार येथील केंद्रात दाखल करून घेतले; पण व्हेंटिलेटर मिळाले नाही. त्यानंतर प्रकृती खालावत गेल्याने डोळ्यांसमोर वडिलांनी जीव सोडल्याचे फुलेवाडी येथील इरफान यांनी सांगितले.

हेही वाचा- बापरे हा काय प्रकार? बावीस दिवस उपचार घेऊन बरा झालेल्या तरूणाला तो फोन आला अन् पायाखालची जमीनच सरकली - ​

कोरोना नसतानाही आई गमावली
माझ्या आईला हृदयविकाराची लक्षणे होती. पण, त्यांची धाप वाढली म्हणून सांगितले. कदाचित कोरोना असावा म्हणून सांगितले. कोणतीही चाचणी न करता, कोणतेही उपचार न करता रुग्णालयातील एका यंत्रणेने ही माहिती द्यायला सुरवात केली. काहीही असो, पण आईवर उपचार करा, अशी विनंती करीत होतो; पण कोणीही दखल घेतली नाही. शेवटी रात्री उशिरा आईने घरच्यांसमोरच जीव गमावला, अशी प्रतिक्रिया संभाजीनगर परिसरातील एका तरुणाने दिली.

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus daily sakal sting operation Many told Sakal about the bitter experience