
कोल्हापूर : जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या वाढू लागल्याने रुग्णांचे हाल सुरू आहेत. एकाचवेळी क्षमतेपेक्षा जास्त रुग्ण आल्याने रुग्णालय प्रशासनाबरोबरच जिल्हा प्रशासनही हतबल झाल्याचे चित्र आहे. आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण आहे. छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात बेड शिल्लक नसल्याने एका रुग्णाला वेळेत उपचार मिळाले नाहीत. या घटनेने उपचार करणाऱ्या यंत्रणेसमोर प्रश्न निर्माण झाले आहेत. जिल्ह्याला आरोग्य राज्यमंत्री लाभले असूनही अशी अवस्था तयार झाली आहे.
पूर्वी छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातील सर्वच्या सर्व ६०० बेड कोरोनाग्रस्तांसाठी राखीव होते; पण त्यात बदल करून फक्त २०० खाटांची व्यवस्था येथे करण्यात आली. कोरोनाग्रस्तांवर उपचार करणाऱ्या शहरातील इतर स्वयंसेवी संस्थांच्या
रुग्णालयाची क्षमताही संपली आहे. अशा परिस्थितीत वेगळ्या नियोजनाची गरज असताना ती होताना दिसत नाही. यावरून प्रशासन हतबल झाल्यासारखी स्थिती निर्माण
झाली आहे.
या चार दिवसांत जिल्ह्यात सुमारे १२०० ते १३०० नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यात शहरातील ३०० ते ४०० रुग्णांचा समावेश आहे. त्या तुलनेत उपचारासाठी उपलब्ध खाटांची संख्या वाढलेली नाही. सीपीआरमध्ये स्वॅब घेतल्यानंतर संशयित म्हणून दाखल केलेल्या रुग्णांसाठी स्वतंत्र इमारत आहे; पण त्यांच्या स्वॅबचे अहवाल लवकर येत नाहीत. त्यामुळे हे संशयित अस्वस्थ आहेत. दोन दिवसांपूर्वी या कक्षातच एका मधुमेही रुग्णाचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला.
दिवसेंदिवस रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता त्यांच्यासाठी यंत्रणा उभी करण्याची गरज असताना ते होताना दिसत नाही. मध्यंतरी शहरातील मंगल कार्यालये, मोठे हॉल भाडेतत्त्वावर घेऊन त्या ठिकाणी व्यवस्था करण्याचे ठरले होते; पण मे-जूनमध्ये रुग्ण संख्या घटल्याने आता जिल्हा कोरोनामुक्त होईल, अशी शक्यता गृहीत धरून याकडे दुर्लक्ष झाल्याचे एकूणच गेल्या तीन-चार दिवसांतील परिस्थितीवरून दिसते.
लक्षणे दिसत नसलेल्या कोरोनाबाधितांवर घरीच उपचाराची व्यवस्था करण्याची घोषणा झाली; पण त्याचीही अंमलबजाणी नाही. हा निर्णय राबवला तरी यंत्रणेवरील बराच ताण कमी होण्याची शक्यता आहे. सगळ्याच कोरोनाबाधितांना खासगी रुग्णालयात उपचार घेणे आर्थिक परिस्थितीमुळे शक्य नाही. अशा परिस्थितीत या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी झाली नाही, तर पुढील परिस्थिती हाताबाहेर गेल्याशिवाय राहणार नाही.
खासगी रुग्णालयांची टाळाटाळ
कोरोनावर उपचार करणाऱ्या खासगी डॉक्टरांना स्थानिक नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. त्यातून एका रुग्णालयावर दगडफेकही झाली. परिणामी, खासगी डॉक्टरही बाधितांना दाखल करण्यास तयार होत नाही. लोकप्रतिनिधींनी नागरिकांची समजूत काढण्याची गरज आहे.
राजकीय नेते आहेत कुठे?
जिल्ह्यात कोरोनाची संख्या वाढत आहे, मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे. सीपीआरला तर वालीच नसल्यासारखी स्थिती आहे. खासगी रुग्णालयात उपचार करणाऱ्यांना होत असलेल्या विरोधाकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष नाही. जिल्ह्यात तीन मंत्री, दोन खासदार, आमदार असूनही ही स्थिती आहे. जिल्ह्यात आरोग्य राज्यमंत्री असून, अशी परिस्थिती होत असेल, तर निश्चित नियोजनाचा अभाव मोठ्या प्रमाणात आहे, हेच स्पष्ट होत आहे.
जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढत आहे. लोकांनी घाबरून न जाता, प्राथमिक स्वरूपाची लक्षणे दिसल्यास तत्काळ दवाखान्यात उपचार घ्यावेत. लक्षणे दिसून जास्त दिवस झाल्यानंतर लोक उपचारासाठी आल्यामुळे, उपचार यंत्रणेवर ताण पडू शकतो.
- सतेज पाटील, पालकमंत्री
नागरिकांनी घ्यावी काळजी
मास्कशिवाय घरातून बाहेर पडू नका
वारंवार साबणाने हात स्वच्छ धुवा
सॅनिटायझरचा उपयोग करा
गटागटाने बसणे टाळा
कामाशिवाय घराबाहेर पडू नका
शक्यतो प्रवास टाळा
लक्षणे दिसताच रुग्णालय गाठा
संपादन - अर्चना बनगे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.