‘कोरोना’ खरेदीत ३५ कोटींचा भ्रष्टाचार ; खरेदी समितीसह लोकप्रतिनिधींकडे बोट

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 3 March 2021


‘‘कोरोनासाठीची खरेदी सुरू झाल्यानंतर तत्काळ पत्र देऊन चुकीच्या पद्धतीने खरेदी करू नये, अशी सूचना केली होती.

कोल्हापूर : कोरोना काळात आतापर्यंत ८८ कोटींची खरेदी झाली असून, यात किमान ३५ कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजपचे जिल्हा परिषद सदस्य राजवर्धन निंबाळकर यांनी आज येथे केला. या सर्व खरेदी प्रक्रियेची कॅगमार्फत चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली. कोरोनासाठी आवश्‍यक साधनसामग्री पुरवण्याचा ठेका काही मंत्र्यांच्या नातेवाईक यांना दिल्याचा आरोप करतानाच ते म्हणाले, ‘‘योग्य वेळी त्यांची नावेही जाहीर करू.’

भाजप कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेस सरचिटणीस विठ्ठल पाटील व भगवान काटे उपस्थित होते. निंबाळकर म्हणाले, ‘‘कोरोनासाठीची खरेदी सुरू झाल्यानंतर तत्काळ पत्र देऊन चुकीच्या पद्धतीने खरेदी करू नये, अशी सूचना केली होती. खरेदी समितीचे अध्यक्ष असलेले जिल्हाधिकारी, सहअध्यक्ष असलेले तत्कालिन मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा लेखा व्यवस्थापक यांनी याकडे लक्ष दिले नाही. यातही मुख्य कार्यकारी अधिकारी व कंत्राटी असणाऱ्या जिल्हा लेखा व्यवस्थापक, स्टोअर इन्चार्ज यांनीच खरेदीत मोठा घोळ घातला आहे.’’

ते म्हणाले, ‘‘अमेय एजन्सीने १० हजार रुपयांना पल्स ऑक्‍सिमीटर दिले. काही पुरवठादारांनी ते १८०० रुपयांना दिले. कॉट, गाद्या खरेदीतही असाच प्रकार घडला आहे. मास्क, पीपीई किटमध्ये तर लूट केली आहे. इचलकरंजीतील लोकप्रतिनिधींशी संबंधित एका कंपनीने कोट्यवधी रुपयांचे पीपीई किट व मास्क दिले आहेत. टेक्‍सटाईल कंपनीकडून पुरवलेल्या थर्मल गनची चौकशी करावी.’’ 

हेही वाचा- नाराजी थोपवण्याचे गोकुळच्या सत्ताधाऱ्यांसमोर आव्हान

फौंड्री, स्पर्धा परीक्षा केंद्राकडून मास्क
एका प्रसिद्ध फौंड्रीतून तसेच स्पर्धा परीक्षा चालवणाऱ्या केंद्रांकडूनही मास्क खरेदी झाली आहे. अशा प्रकारे मास्क कसेही खरेदी, विक्री होऊ शकतात? खरेदीसाठी नवीन कंपन्या निर्माण करून एका दिवसात त्यांना कामे देण्यात आली आहेत. ज्यांचा जीएसटी नंबर नाही, अशांनाही काम दिले आहे. अधिकाऱ्यांचे नातेवाईकही या खरेदीत असल्याचे आढळून आल्याचा आरोपही निंबाळकर यांनी केला.

ही खरेदी संशयास्पद
पीपीई किट २२ कोटी, मास्क ९ कोटी, सॅनिटायझर ११ कोटी, थर्मल स्कॅनर, पल्स ऑक्‍सिमीटर ४ कोटी ५० लाख, बेड, गाद्या व साहित्य ५ कोटी, व्हेंटिलेटर ३ कोटी ५० लाख, टेस्ट किट व रेमडेसिव्हिर १० कोटी, ऑक्‍सिजन सिलिंडर ८ कोटी, इतर साहित्य १५ कोटी, असे साहित्य खरेदी करण्यात आले आहे. या खरेदीत काही राजकीय मंडळी, तर काही मंत्रीही असून त्यांच्या इचलकरंची व कोल्हापूर परिसरातील नातेवाईक, मित्र परिवार व खासगी पी. ए. यांच्या सूचनेनंतरच खरेदी झाली आहे, असे निंबाळकर यांनी सांगितले.

संपादन- अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corruption 35 crore in purchase of Corona covid 19 health marathi news