कोल्हापुरात Covid 19 ची काय आहे स्थिती ; जाणून घ्या ग्राउंड रिपोर्ट

covid 19 kolhapur atmosphere health marathi news
covid 19 kolhapur atmosphere health marathi news

कोल्हापूर  : कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्‍वभूमीवर राज्य शासनाने सोमवारी नव्याने निर्बंध लागू केले. हॉटेल, रेस्टॉरंट तसेच सिनेमागृहे 50 टक्के क्षमतेने चालविण्याची अट घातली आहे. अनलॉकनंतर अशाच अटी घातल्या; मात्र नव्याचे नऊ दिवस, याप्रमाणे या अटींची अंमलबजावणी झाली. प्रत्यक्ष ग्राउंड रिपोर्ट पाहता, या अटी कुठेही पाळल्या जात नसल्याचे चित्र आहे. ना तोंडाला मास्क, ना सोशल डिस्टन्सिंग, यामुळे शहरातील सार्वजनिक ठिकाणे कोरोनासाठी हॉट स्पॉट ठरत आहेत. सध्याची स्थिती पाहता कुठेही क्षमतेचे नियम पाळले जात नाहीत. एका टेबलवर एक किंवा अंतर ठेवून दोघे बसायला हवेत; मात्र एका टेबलवर तिघे जण बसतात. 

मध्यवर्ती बसस्थानक परिसर 
एस.टी. गाड्यांची वर्दळ असलेले ठिकाण म्हणजे मध्यवर्ती बसस्थानक. एक तर बसस्थानकातील अंतर्गत रस्ता खराब झाला आहे. एखादी गाडी निघाली की जी धूळ उडते, ती प्रवाशांच्या नाकातोंडात गेल्याशिवाय राहत नाही. एस.टी. जाताना किंवा प्रवासी खाली उतरताना सोशल डिस्टन्सिंग राखले जात नाही. यात एखादा जरी कोरोनाची लक्षणे असलेला रुग्ण एस.टी.त बसला तर सर्व प्रवाशांना क्वारंटाईन व्हावे लागेल अशी स्थिती. सॅनिटायझरचा वापर करावा याचा विसर पडला की काय, असे येथे चित्र आहे. प्रवाशांना बसण्याची व्यवस्था आहे तेथेही सोशल डिस्टन्सिंग नव्हते. मध्यवर्ती बसस्थानक परिसर, रस्त्यावर भरणाऱ्या मंडया, खाद्यपदार्थांच्या गाड्या येथे सोशल डिस्टन्सिंग राखले जात नाही. एस.टी.त प्रवाशांची तोबा गर्दी होते. ठराविक मार्गावर केएमटीची अशीच स्थिती आहे. महालक्ष्मी चेंबर परिसरात चित्रीकरण सुरू होते, ते पाहण्यासाठी आज दुपारी गर्दी झाली. 

शिवभोजन थाळीलाही रांग 
कमी पैशात पोटभर अन्न, अशी ओळख असलेल्या शिवभोजन थाळीसाठी दुपारच्या सुमारास लोकांच्या रांगा लागतात. कोरोनाच्या काळात शिवभोजन थाळीच अनेकांचा आधार ठरली. त्यावेळी दोन व्यक्तीत काही फुटांचे अंतर राखले जात होते. आजचे चित्र निराळे होते. थाळी लवकरात लवकर मिळावी, यासाठी थाळीसाठी गर्दी करणाऱ्यांनी किमान अंतर राखले नव्हते. अनेक जणांच्या तोंडाला मास्क नव्हते. 

हॉटेल, खाणावळी फुल्ल 
कोल्हापूर हे खव्वयांसाठी प्रसिद्ध आहे. रात्री अकरापर्यंत मांसाहारी तसेच शाकाहारी जेवणाची हॉटेल फुल्ल असतात. काही हॉटेलमध्ये ग्राहक वेटिंगवर असतो. हॉटेल लवकर बंद होईल किंवा जेवण संपेल या भीतीपोटी रात्री 9 ते 11 या दोन तासांत हॉटेल तसेच खाणावळीत मोठी गर्दी होते. गर्दीची ठिकाणे कोरोनाच्या दृष्टीने धोकादायक ठरू लागली आहेत. 

भाजी मंडई पुन्हा रडारवर 
लॉकडाउनच्या काळात भाजी मंडया सुरू होत्या. या काळात उद्योग-व्यापार बंद असल्याने बहुतांश लोकांनी भाजीपाला व्यवसायाला प्राधान्य दिले. महापालिकेची गाडी येऊन गेली किंवा एखाद्याची पावती फाडली, की तेवढ्यापुरतेच विक्रेते सावध होतात. नंतर ना हॅण्डग्लोव्ह्‌ज ना तोंडाला मास्क, असे चित्र नजरेस पडते. रस्त्यावर मंडई भरते तेथे नियम पाळले जात नाहीत. लक्ष्मीपुरी मंडईसह अन्य मंडई बाजारपेठेत चिंता करावी अशी स्थिती आहे. 

बारमध्येही क्षमतेची अट नाहीच 
शहरातील बहुतांश बार, परमिट रूममध्ये 50 टक्के क्षमतेची अट पाळली जात नाही. रात्री सर्व टेबल फुल्ल असतात. ज्या बारमध्ये जागा कमी आहे, अशा ठिकाणी ग्राहक एका टेबलवर किमान दोघे-तिघे जण बसतात. सॅनिटायझरच्या वापराची सक्ती राहिलेली नाही. रात्री आठ ते साडेदहापर्यंत बारमध्ये गर्दी असते. येथेही लक्षणे आढळून आलेली व्यक्ती आल्यास त्याच्यापासून बाधित होणाऱ्यांची संख्या किती होईल, याचा अंदाज न बांधलेलाच बरा. 

दंडाच्या पावतीची अशीही भीती 
केशवराव भोसले नाट्यगृहासमोरील खाऊ गल्लीत सायंकाळी गर्दी असते. दुचाकी वाहनेही त्यात, खाद्यपदार्थांचा आस्वाद घेणारे त्यात, अशी गर्दी होते. महापालिकेने दंडाच्या पावत्या सुरू केल्यानंतर दुचाकी वाहने खाऊ गल्लीच्या बाहेर लावण्याची सक्ती केली गेली. त्यामुळे या गल्लीचा परिसर रिकामा जाणवू लागला आहे. 

हॉटेल मालक सोशल डिस्टन्सिंग राखण्याचा प्रयत्न करतात; मात्र लोकच ऐकत नाहीत तर करायचे काय? वेटरने काही सांगितले, की मालकाला बोलव, असा दम देतात. नव्या नियमांची काटकोर अंमलबजावणी करून कोल्हापूर सेफ राहील यासाठी प्रयत्न करू. 
- उज्ज्वल नागेशकर, अध्यक्ष, हॉटेल मालक संघ 

संपादन- अर्चना बनगे
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com