
पिराची वाडी... शहराला टेकलेले गाव; पण गावात खेळायला मैदान म्हणून फक्त एक रिकामा प्लॉट. त्यावरच खेळुन गावातील शिवाजी तालीम मंडळाच्या खेळाडूंनी गावच्या क्रिकेट, फुटबॉलच्या टीम तयार केल्या. आसपासच्या अनेक गावातील स्पर्धांमधून सहभाग घेवून या संघाने पारितोषकेही पटकावली.
कोल्हापूर : पिराची वाडी... शहराला टेकलेले गाव; पण गावात खेळायला मैदान म्हणून फक्त एक रिकामा प्लॉट. त्यावरच खेळुन गावातील शिवाजी तालीम मंडळाच्या खेळाडूंनी गावच्या क्रिकेट, फुटबॉलच्या टीम तयार केल्या. आसपासच्या अनेक गावातील स्पर्धांमधून सहभाग घेवून या संघाने पारितोषकेही पटकावली. पण दोन वर्षापुर्वी सदर जागेच्या मालकाने प्लॉट पाडले आणि गावाचे हे मैदान गायब झाले. कुठे खेळायचा हा प्रश्न तयार झाला. गावाजवळ असलेल्या पुईखडी टेकडीवरील पाणीपुरवठा विभागाच्या मोकळ्या जागेवर खेळ मांडला. याठिकाणी दगड आणि कचरा साठलेला असायचा. गावातील सुमारे 25 ते 30 मुलांनी खेळाच्या आवडीमुळे या जागेला मैदान करण्याचे ठरवले. पाहता पाहता एक सुबक क्रिकेट मैदान तयार झाले.
आज या मैदानावर हजारो रुपये बक्षीसाच्या क्रिकेट स्पर्धा रंगल्या आहेत. पाणीपुरवठा विभागाचा मोकळा माळ असलेल्या या ठिकाणी सुरवातीला एका कोपऱ्यात फुटबॉल खेळत खेळत थोडी साफसफाई सुरू केली. मैदानाचे थोडे रुप पालटल्यानंतर ग्रामीण संघांसाठी फुटबॉल स्पर्धा भरवल्या. आसपासच्या गावातील सुमारे 15 ते 20 संघ या स्पर्धेत सहभागी होत होते. दोन तीन वर्षे शिवाजी तालमीच्या सहकार्याने पीरवाडी स्पोर्टस् क्लब या स्पर्धाचे आयोजन करत आहे. करवीर तालुक्याप्रमाणे अगदी भूदरगड, राधानगरीपर्यंतच्या अनेक गावातील संघ स्पर्धेत सहभागी व्हायचे. यामुळे गावाचे नावही तेथपर्यंत पोहचत होते हाच आनंद होता. कोणतीही जाहिरात न करता आसपासच्या गावातील खेळाडू या मैदानावर यायचे. त्यामुळे या मंडळाच्या खेळाडूंनी सदर मैदानाची डागडूजी करण्याचा निर्णय घेतला. गावातील मैदान नसल्याने आता हेच आपले मैदान या हेतूने या खेळाडुंनी संपूर्ण मैदानावर दररोज साफसफाई सुरू केली. सायंकाळनंतर या परिसरात कोणाची येजा नसल्याने या ठिकाणी मदिराप्रेमींची उपस्थिती असायची. सकाळी खेळायला आल्यावर पहिल्यांदा बाटल्या काढण्याचे काम करायला लागायचे; पण दोन दिवस सलग साफसफाई सुरू केली. आणि फुटबॉल ऐवजी क्रिकेट स्पर्धा घेण्याचा निर्णय घेतला. यासाठी पारितोषक देणाऱ्यांनी उत्साहाने प्रतिसाद दिला. ग्रामीण असले तरी हौसेला मोल नसते अशा माणसांनी आपल्या आवडीच्या वाहनांच्या नंबरानुसार बक्षीसे जाहीर केली. पहिले बक्षिस 9393 मिळाले. दुसरे 8888 आणि तिसरे बक्षीस 7822 अशा रकमेत मिळाले. मग मैदानाची तयारी जोमाने सुरू झाली. संपुर्ण मैदानाची बाउंड्री तयार झाली. चौकार षटकार कळावेत यासाठी रिंगण आखून दगड लावले. टेनिस बॉलच्याच स्पर्धा असल्याने खेळपट्टी तयार करण्यासाठी अर्धी सिमेंट कॉक्रिट आणि अर्ध्या भागात मातीचा वापर केला. विकेट लावण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केली. या ठिकाणी पाणीपुरवठा विभागाने बांधकाम करतेवेळी वॉचमन आणि गोडावुन करिता केबिन उभारली होती. त्याच्या चौथऱ्याचा वापर करुन पॅव्हेलियन आणि प्रेक्षक गॅलरी तयार केली. क्रिडाप्रेमींना बसण्यासाठी पन्नास खुर्च्यांची व्यवस्था केली. राखीव खेळाडू, स्कोअरर आणि पुढच्या सामन्याकरिता आलेल्या खेळाडूंसाठी या सावलीचा वापर होत आहे. या स्पर्धेसाठी करवीर तालुक्यातील यवलूज, पडळ, हळदी, तसेच इस्पुर्ली, वाळवे, वाठार, रुकडी, शिरढोण आदि 30 गावातील संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतला आहे. गेले पाच सहा दिवस या स्पर्धा सुरु आहेत. मॅन ऑफ़ दि मॅच, बेस्ट बॉलर, फ़िल्डर, बॅट्समन असे अनेक वैयक्तीक बक्षीसेही देण्यात येत आहेत. हे मैदान तयार करण्यासाठी पिरवाडी स्पोर्टस्चे अमोल लाड, हिम्मत पोवार, सागर केळके,सागर जाधव अभिजीत चव्हाण,मनोहर खोत, सिध्दांत सातपुते, नितीन बोंद्रे, रणजीत लाड आदि कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
सज्जन सावर्डे ( शिवाजी तालिम मंडळ)
मुलांच्या आरोग्यासाठी मैदानी खेळ आवश्यक आहेत. पण गावात मैदानच नाही त्यामुळे पुईखडीच्या या माळावर यायला लागायचे, त्यामुळे गावातील मुलांनी या माळाचे मैदानात रुपांतर करण्यासाठी दगड धोंडे कचरा साफ़ केला. आता लोकप्रतिनिर्धीनी आसपास मैदान तयार करुन दिल्यास युवकांना खेळाची गोडी लागेल. मजबूत भावी पिढीसाठी असे मैदान गरजेचे आहे.