भावाला ताब्यात का घेतले म्हणत चक्क पोलिसालाच लगावली कानशिलात

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 16 January 2021

दरम्यान, चिपरी येथे एकावर कारवाई करण्यात आली. 

मुरगूड (कोल्हापूर) : जिल्ह्यात काल ग्रामपंचायतीसाठी शांततेत व चुरशीने मतदान झाले असले तरी काही केंद्रांवर निवडणुकीस गालबोट लागले. पिंपळगाव बुद्रुक (ता. कागल) येथे मतदान सुरू असताना पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसाच्या कॉलरला हात लावून कानशिलात लगावणाऱ्या यशवंत बचाराम सूर्यवंशी व केशव बचाराम सूर्यवंशी यांच्याविरुद्ध मुरगूड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, चिपरी येथे एकावर कारवाई करण्यात आली. 

पोलिसांतून मिळालेली माहिती अशी ः कागल तालुक्‍यातील पिंपळगाव बुद्रुक येथे मुरगूडचे पोलिस उपनिरीक्षक किशोर कुमार खाडे व त्यांचे सहकारी काल सकाळी साडेदहाच्या सुमारास मतदान सुरू असताना पेट्रोलिंग करत होते. याच दरम्यान येथील मतदान केंद्राच्या शंभर मीटर अंतराच्या आत मतदान सुरू असताना यशवंत बचाराम सूर्यवंशी व केशव बचाराम सूर्यवंशी (पिंपळगाव बुद्रुक) प्रचाराची वेळ संपलेली असताना डमी बॅलेट मशिनवर मतदान उमेदवारांची चिन्हे दाखवताना पोलिसांना आढळले.

हेही वाचा -   जिल्ह्यात कारभारी ठरवण्यासाठी एका एका मतासाठी चुरस - 

 

यावेळी किशोर कुमार खाडे यांनी ‘प्रचाराची वेळ संपली आहे आणि तुम्ही आता असे चिन्ह दाखवू शकत नाही, असे म्हणून डमी बॅलेट मशीन व केशव बचाराम सूर्यवंशी यास ताब्यात घेतले. त्या वेळी यशवंत सूर्यवंशी व पोलिसांत शाब्दिक चमकमक उडाली. या वेळी केशव सूर्यवंशी यास ताब्यात घेणाऱ्या पोलिस नाईक रामा कुंभार यांनी रागाने कॉलर पकडली. यशवंत सूर्यवंशी याने भावास ताब्यात का घेतले व मशीन कसे काय घेऊन जाता असे विचारत पोलिस नाईक कुंभार यांच्या कानशिलात लगावली. त्यामुळे पोलिसांनी दोघांही भावांविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याच्या कारणावरून गुन्हा दाखल केला 
आहे. 

चिपरीत एकावर कारवाई

जयसिंगपूर ः चिपरी (ता. शिरोळ) येथे मतदान केंद्राच्या १०० फुटांत पोलिसांशी हुज्जत घातल्याप्रकरणी अनिल बाळिकाई (वय ४०, रा. पश्‍चिम मळा भाग) याच्यावर कारवाई करण्यात आली. केंद्रासमोर १०० मीटरच्या आत बाळिकाई दुपारी दोनच्या सुमारास गर्दी करून उभे होते. पोलिसांनी हटविण्याचा प्रयत्न केला असता बाचाबाची झाली. यामुळे गैरवर्तणूक करून हुज्जत घातल्याप्रकरणी जयसिंगपूर पोलिसांनी ही कारवाई केली. याबाबतची फिर्याद कॉन्स्टेबल अभिजित भातमारे यांनी यांनी दिली असून, सहायक फौजदार सोमनाथ चळचुक तपास करीत आहेत.

हेही वाचा -  दुचाकी आणि चाकचाकीची समोरासमोर धडक

 

निवडे येथे कर्मचारी अस्वस्थ

कोल्हापूर ः निवडे (ता. पन्हाळा) येथे ग्रामपंचायत निवडणुकीत कर्तव्य बजावताना मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्याला अचानक अवस्थ वाटू लागले. त्यांना ‘सीपीआर’मध्ये दाखल केले. दीपक विष्णू जाधव (वय ३०, रा. आरळा, ता. शिराळा) असे त्यांचे नाव आहे. ते पाटबंधारे विभागात काम करीत असल्याचे पोलिसांनी सांगितले. याची नोंद ‘सीपीआर’ चौकीत झाली.

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: crime cases in kolhapur dispute between police and voters in kolhapur