esakal | Sakal - Read Latest Breaking Marathi News from Maharashtra India & Around the World
sakal

बोलून बातमी शोधा

crime cases in kolhapur two sisters wedding destroyed 8 people arrested by police

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने या प्रकरणी पोलिसांकडे धाव घेऊन सख्ख्या भावांसह इतरांवर गुन्हा नोंद करण्याची मागणी केली होती. 

धक्कादायक! कोल्हापुरात दोन बहिणींची कौमार्य चाचणी; विवाहानंतर पाठवलं माहेरी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : विवाहानंतर दोन बहिणींची कौमार्य चाचणी घेण्यात आली. त्यानंतर दोघींचा झालेला विवाह मोडून त्यांना माहेरी पाठविण्यात आले. याप्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी त्या दोन्ही बहिणींच्या पतींसह बेळगाव आणि कोल्हापुरातील आठ जणांविरुद्ध गुन्हा नोंद केला. हा प्रकार बेळगावात घडला. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने या प्रकरणी पोलिसांकडे धाव घेऊन सख्ख्या भावांसह इतरांवर गुन्हा नोंद करण्याची मागणी केली होती. 

याबाबत राजारामपुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सीताराम डुबल, तसेच अंधश्रद्धा निर्मूलन समितीने दिलेली माहिती अशी,  कोल्हापुरातील दोन सख्ख्या बहिणींचा विवाह गेल्या वर्षी (नोव्हेंबर २०२०) बेळगावातील दोन सख्ख्या भावांबरोबर झाला. त्यानंतर सासरच्या लोकांनी दोघींची कौमार्य चाचणी केली. त्यानंतर एका भावाने त्याच्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा शारीरिक आणि मानसिक छळ सुरू केला. लग्नानंतर तीनच दिवसांनी सासरच्या मंडळींनी तिला घरातून माहेरी पाठविले. मुलीच्या नातेवाईकांनी आणि समाजातील काहींनी त्यांचा संसार पुन्हा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केला. 

हेही वाचा - पक्षांची कोअर कमिटी शांत, निवडणूक जाहीर होईल तेव्हा पाहू, अशीच सदस्यांची भुमिका
 

दरम्यानच्या काळात सासरच्यांनी घराच्या बांधकामासाठी दहा लाख रुपयांची मागणी केली. पैसे देणे शक्‍य नसल्याने कोल्हापुरात जात पंचायत बसविण्यात आली. त्यात दोन्ही विवाह मोडण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या वेळीही दोन्ही मुलींना नांदविण्याबाबत मध्यस्थी करण्यासाठी जात पंचायतीच्या काही पंचांनी ४० हजार रुपये घेतले. त्यामुळे मुलीच्या नातेवाईकांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे धाव घेतली. 

समितीच्या सीमा पाटील, गीता हसूरकर, रमेश वडणगेकर, सुजाता म्हेत्रे यांनी आज दुपारी राजारामपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक सीताराम डुबल यांच्याशी चर्चा केली. तसेच, या प्रकरणी दोन भावांसह त्यांची आई, मामा यांच्यावरही गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यानुसार रात्री गुन्हा दाखल केल्याचे निरीक्षक डुबल यांनी सांगितले.

go to top